पंचवीस वर्षांहुन अधिक काळ लोटला तरी हिच्या मृत्यूचं कोडं अजून कुणाला सुटलं नाहीय..आज तिचा स्मृतीदिन

तुम्हाला सना नादियाडवाला माहितेय का ? तीच हो..अवघ्या चौदा वर्षांची असताना फिल्म इंडस्ट्रीत आलेली. शाळा आवडत नाही म्हणून अभिनेत्री बनलेली, ' सात समदंर पार मैं तेरे पिछे पिछे आ गयी ' असं गुणगुणत चंदेरी दुनियेत टॉपला गेलेली, अन वयाच्या फक्त एकोणिसाव्या वर्षी जीवनयात्रा संपवून चाहत्यांना कायमचं ' दिवाना ' बनवून टाकलेली. हो तीच ती दिव्या भारती....सना नादियाडवाला हे तिचंच लग्नानंतरचं नाव. तिनं जग सोडून आज 5 एप्रिल ला तब्बल पंचवीस हुन अधिक वर्षं झालीत. पण तिच्या दिलखेच अदांच्या स्मृती आजही टवटवीत आहेत.

स्रोत

दिव्या ओमप्रकाश भारती मूळची मुंबईचीच. सुखवस्तू कुटुंबातली. मुंबईच्या नामवंत शाळेची विद्यार्थिनी. पण म्हणतात ना कलेचा अन विद्येचा प्रवास फारसा कधी एकत्र होत नाही. दिव्याच्याबाबतीतही ते खरं ठरलं. सुंदर चेहरा अन आकर्षक बांधा लाभलेल्या दिव्यानं नववीतच शाळेला रामराम ठोकला. मॉडेलिंगकडं ती वळाली. अवघ्या चौदाव्या वर्षी तिला तेलगू चित्रपटाची ऑफर मिळाली. त्या ' बॉबीली राजा' या चित्रपटाला तिकीटबारीवर चांगलं यश मिळालं. टॉलिवूडमधल्या श्रीदेवीसारख्या भासणाऱ्या या फ्रेश चेहऱ्याकडं बॉलिवूडचं लक्ष गेलं.

स्रोत

राजीव रायनं ' विश्वात्मा' ची ऑफर तिला दिली, अन सनी देओल ची ती नायिका बनली. 1992 ला म्हणजे तिच्या वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी प्रदर्शित झालेला हा चित्रपट तर हिट झालाच. त्यातलं ' सात समदंर पार मैं तेरे पिछे पिछे आ गयी ' हे गाणंही तुफान गाजलं. त्या पाठोपाठ आलेल्या गोविंदासोबतच्या ' शोला और शबनम ' आणि ऋषी कपूर, शाहरूखसोबतच्या 'दिवाना' मुळं दिव्या रातोरात स्टार बनली.  तिला 'लक्स ' चा  बेस्ट डेब्यु ऐक्ट्रेस अवोर्ड मिळाला अन तिची किंमतही वधारली. नामवंत निर्माता, दिग्दर्शकांसोबत एकाच वर्षात बारा चित्रपट साइन करण्याचा विक्रम तिच्या नावे जमा झाला. दिल आशना है, दिल का क्या कसूर, जान से प्यारा, गीत, बलवान, दुष्मन जमाना असे तिचे चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतले. ' ऐसी दिवानगी देखी नही कही...' गाण्यावर थिरकणारी दिव्या रसिकांच्या मनात ठसली. तिचे हिंदी, तेलगू अन तमिळ चित्रपट देशभर गाजू लागले.

स्रोत

बॉलिवूडमधली कारकीर्द ऐन बहरात असताना 1992 ला नामवंत चित्रपट निर्माता साजिद नादियाडवाला याच्याशी विवाह करून दिव्या ओमप्रकाश भारतीची ती सना नादियाडवाला बनली. तिचा चित्रपट प्रवास काहीसा थबकला. ती अतिरिक्त मद्यपान करीत असल्याच्या, अमली पदार्थांच्या आहारी गेल्याच्या बातम्या माध्यमांमधून यायच्या. पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे 5 एप्रिल 1993 ला वर्सोव्याच्या राहत्या घराच्या बाल्कनीतून ती खाली पडली. पाचव्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळल्यानं  ती जागीच मरण पावली. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी दिव्याचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं अवघी चित्रपटसृष्टी हळहळली. रसिकांना मोठा धक्का बसला.

या रुपवान अभिनेत्रीने आत्महत्या केली, कुणी ढकलून देऊन तिचा खून केला की तो केवळ अपघात होता याबाबत त्याकाळात बऱ्याच उलटसुलट चर्चांना पेव फुटलं होतं. पंचवीस वर्षांनंतरही हे कोडं कायम राहिलं आहे.

लेखक : आबिद शेख, पुणे
(मो.8806706466)

सबस्क्राईब करा

* indicates required