सर्व भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अमृतसरच्या सुवर्णमंदिराबद्दल या १० गोष्टी जाणून घ्या!!
भारत हा विविध धर्मपंथाच्या लोकांचा धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे सर्वच धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा सारखाच आदर केला जातो. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर हे शिखांचे गुरुद्वारा असले तरी तिथे भेट देणाऱ्या इतर धर्मीय भाविकांची संख्याही खूप मोठी आहे. या गुरुद्वाराला मंदिर म्हणूनच ओळखले जाते, यावरूनच इथली सांकृतिक विभिन्नता किती एकरूप झालेली आहे याचा अंदाज येतो.
इसवी सन १५७४ मध्ये या गुरुद्वाराचा पाया रचला गेला आणि १६०४ मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. याला श्री हरमिंदर साहिब मंदिर म्हणूनही ओळखले जाते. याला सुवर्ण मंदिर म्हटले जाते कारण या मंदिराचा कळस सोन्याने मढवलेला आहे. हे मंदिर म्हणजे देश-विदेशातील भाविक आणि पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र आहे. या सुवर्ण मंदिराशी निगडीत काही रोचक गोष्टी आज आम्ही या लेखातून घेऊन आलो आहोत.
१) या पवित्र स्थळी बुद्धाने ध्यानधरणा केली होती.
या सुवर्ण मंदिराच्या ठिकाणी बुद्धाने काही काळ वास्तव्य केले असल्याच्या नोंदी सापडतात. हे ठिकाण साधू संतांसाठी ध्यानधारणा करण्यास अतिशय योग्य असल्याचे बुद्धाने म्हटले होते. त्याकाळात या ठिकाणी घनदाट जंगल होते.
२) पाचव्या शीख गुरुंनी या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली होती.
शिखांचे प्रथम गुरु गुरुनानक यांनी ध्यानधारणा करण्यास याच जागेची निवड केली होती. शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जन यांनी श्री हरमंदीर साहिबांचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. या मंदिराची रचना कशी असावी याचा आराखडा त्यांनीच तयार केला होता.
३) सोन्याचा मुलामा
मंदिर बांधल्यापासून दोन दशकानंतर महाराजा रणजीत सिंह यांनी १८३० मध्ये या मंदिरावर सोन्याचा मुलामा चढवला. यासाठी संपूर्ण २४ कॅरेटचे ५०० किलो वजनाचे सोने वापरले होते. त्याकाळात यासाठी १५० कोटींपेक्षाही जास्त खर्च आला होता. या मंदिराच्या छताच्या बांधकामात मौल्यवान रत्नांचा आणि दगडांचा वापर करण्यात आला आहे.
४) वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम
या मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली स्थापत्यशैली ही हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही स्थापत्यशैलींचा अद्भुत संगम आहे. सुवर्ण मंदिर आणि ताजमहालची रचना थोडीफार सारखीच वाटते.
५) चहुबाजूंनी वेढलेला तलाव
हे मंदिर चारी बाजूंनी पवित्र अमृत सरोवराने वेढलेले आहे. या तलावातील पाण्यात औषधीय गुणधर्म आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविक या पाण्याने हातपाय धुतात, कधीकधी एक डुबकी देखील मारतात. मंदिरात प्रवेश करण्यासाठी या तलावावरूनच जावे लागते.
६) सर्वात मोठा लंगर
देशभरातल्या अनेक गुरुद्वारांमध्ये लंगर भरवला जातो, पण सुवर्णमंदिरात होणारा लंगर हा देशातील सर्वात मोठा लंगर असल्याचे मानले जाते. दररोज जवळपास ५०,००० भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. एखाद्या सणादिवशी तर हा आकडा लाखांच्यावर जातो. इथल्या लंगरमध्ये चपाती, भाज्या, डाळ आणि खीर असे पदार्थ बनवले जातात. जेवण देताना धर्म, पंथ, संप्रदाय, वंश, असा कुठल्याच पद्धतीचा भेदभाव केला जात नाही. सर्व भाविक एकाच ठिकाणी जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेतात. जगातील सर्वात मोठे अन्नछत्र सुवर्ण मंदिराच्या वतीनेच चालवले जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात इथे जेवण बनवले जाते, पण जेवणाचा स्वाद अतिशय रुचकर असतो. शिवाय काटेकोरपणे स्वच्छताही ठेवली जाते.
७) चारही बाजूंनी दरवाजे
या मंदिराला चारही बाजूला प्रवेशद्वारे आहेत. यावरून या मंदिराची उदारता आणि स्वागतार्हता दिसून येते. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे मग तो कुठल्याही धर्माचा, वंशाचा, जातीचा, पंथाचा असो त्याचे खुल्या मानाने स्वागत केले जाते. जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी हे मंदिर खुले आहे.
८) तळघरात देवघर
अनेक हिंदू मंदिरात प्रवेश करताना तुम्हाला जाणवले असेल की गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते. इथे मात्र नेमके उलटे आहे, इथे गाभाऱ्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या उतराव्या लागतात. यावरून माणसाने नेहमी आपल्या मनातील मी पणा, मोठेपणा त्यागून खाली उतरण्याची तयारी ठेवावी असा संदेश दिला जातो.
९) मोफत सेवा देणारे स्वयंसेवक
इथल्या लंगरसाठी दिवसरात्र जेवण बनवण्याचे काम सुरूच असते. दूरवरून आलेले भाविक देखील इथल्या लंगरमध्ये सेवा देण्यास आतुर असतात. कोणताही भेदभाव न करता हे लोक इथे सेवा करतात. कोणी चपाती बनवते, कोणी भाजीची तयारी करण्यात मदत करते, कोणी भांडी धुते, अशी सगळी कामे इथे मोफत करणारे स्वयंसेवक आहेत. या लंगरचा सगळा खर्च भक्तांच्या देणगीतूनच केला जातो.
१०) शहीद बाबा दीप सिंग यांचा मृत्यू
परकीय आक्रमकांचा नेहमीच या मंदिरावर डोळा राहिला. १७५७ साली जहान खानने या मंदिरावर हल्ला केला. त्यावेळी मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी बाबा दीप सिंग यांच्याकडे होती. पाच हजार सैनिकांनीशी त्यांनी जहान खानच्या सैन्याशी लढा दिला. या युद्धात त्यांचे शीर तुटले तरी मंदिराच्या पवित्र प्रांगणात प्रवेश करेपर्यंत त्यांनी आपला प्राणत्याग केला नव्हता. आपल्या तुटलेल्या शिराला एका हाताने आधार देत दुसऱ्या हाताने शत्रूवर वार करत ते मंदिरात पोहोचले आणि मगच त्यांनी देहत्याग केला अशी कथा आहे. त्यांच्या शौर्याचे आणि हौतात्म्याचे प्रतिक म्हणूनही या मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे.
इथल्या प्रसन्न आणि भक्तीभावपूर्ण वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी सुवर्ण मंदिराला भेट दिली पाहिजे.
मेघश्री श्रेष्ठी




