computer

रॉयल‌ एन्फील्डच्या या स्कूटर बद्दल ऐकलंय का तुम्ही?‌ नसेल तर हे नक्की वाचा...

रॉयल एन्फिल्ड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ‌येतात‌ त्या त्यांच्या पॉवरफुल आणि नावाप्रमाणेच रॉयल लूक असणाऱ्या दमदार बाईक्स. पूर्वीच्या ब्रिटिश आणि आताच्या ‌या अस्सल भारतीय मोटारसायकल कंपनीनं एकापेक्षा ‌एक आकर्षक आणि दर्जेदार‌ बाईक्स बाजारात आणून ‌लोकांच्या मनात आपली एक वेगळीच जागा बनवलीय. अगदी मोटारसायकल प्रेमीच‌ नव्हे, तर भारतीय सेना आणि पोलीस खात्यातही या बाईक्सना प्राधान्य दिसतं. पण याच रॉयल एन्फिल्ड कंपनीनं एकेकाळी एक स्कूटरही लॉन्च केली होती. 

देशातल्या स्कूटर बाजारात आपलं स्थान बनवण्यासाठी रॉयल एन्फिल्डनं १९४० मध्ये या स्कूटरची निर्मिती सुरू केली होती. पण प्रत्यक्ष भारतात ती लॉन्च झाली २० वर्षानंतर, १९६२ मध्ये. या स्कूटरचं‌ नाव होतं "Fantabulous". कंपनीचा दावा होता की ही बाईक परफॉर्मन्समध्ये Fantastic आणि किंमतीच्या बाबतीत Fabulous होती. आणि म्हणूनच तीला नाव दिलं होतं "फॅन्टाब्युलस".

Villiers ने डिझाईन ‌केलेलं १७५ सीसीचं २-स्ट्रोक इंजिन या स्कूटरमध्ये होतं. हे इंजिन ७.५ हॉर्सपॉवरची शक्ती निर्माण करत होतं. ही‌‌ स्कूटर ताशी ९६.५ की.मी या सर्वोच्च वेगानं धावू शकत होती आणि तिचं‌ डिझाईन हे १९७२ मध्ये आलेल्या बजाजच्या 'चेतक' स्कूटरशी मिळतंजुळतं होतं. महत्वाचं म्हणजे या स्कूटरमध्ये इलेक्ट्रीक सेल्फ स्टार्टरही दिला गेला होता! हा असा स्टार्टर त्याकाळात मोजक्याच मोटारसायकल्समध्ये असायचा. 

कंपनी या स्कुटरची‌ बॉडी मद्रासमध्ये बनवायची आणि तिचं इंजिन‌ हे इंग्लंडमधून आणलं जायचं. बघायला‌ गेलं तर‌ रॉयल एन्फिल्डची ‌हि फॅन्टाब्युलस स्कूटर अगदी पॉवरफुल होती. पण दुर्दैवानं ती हवी तितकी लोकप्रिय होऊ शकली नाही आणि त्यामुळे १९७० मध्ये कंपनीनं तीची निर्मिती थांबवली. आता ही स्कुटर फक्त जुन्या‌ विन्टेज बाईक्सचा संग्रह ‌करणाऱ्या काही हौशी ‌लोकांकडे आहे‌.

तुमच्या ओळखीत आहे का कुणाकडे अशी विन्टेज बाईक? असेल तर तिचे फोटोज आमच्यासोबत नक्की शेअर करा.