computer

खाद्यतेलाचे हे विविध प्रकार तुम्ही कधी वापरले आहेत का? त्यांचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

कुठल्याही पदार्थात तेलाशिवाय चव येत नाही. खास करून मसालेदार भाजी, मांसाहारी पदार्थ किंवा गरमागरम भजी, पापड बनवतानाही तेल लागतेच. मग प्रश्न पडतो की भाजीत कुठलं तेल आणि तळायला कोणतं तेल चांगलं आहे? बाजारात इतक्या प्रकारची तेलं मिळतात, त्यात रिफाइंड तेल वापरावे की घाण्याचे ? याबद्दल बर्‍याचदा संभ्रम असतो. सध्या रिफाइंड तेलाचा वापर वाढत असला तरी पुन्हा एकदा घाण्याच्या तेलाचे महत्व सांगितले जात आहे.

घाण्याचे तेल आणि रिफाइंड तेलामध्ये फरक :

घाण्यावरचं तेल म्हणजे तेलबियांना उष्णता न देता फक्त दाबून तेल काढलं जातं. हे तेल आरोग्यासाठी सर्वोत्तम असतं. या प्रकारे बनवलेल्या तेलाची जडणघडण बदलत नाही. त्यात रासायनिक, हानिकारक द्रव्यं मिसळलेली नसतात.. त्यातून नैसर्गिक पोषणमूल्य योग्य प्रमाणात मिळतात. कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. शेंगदाणा, मोहरी, खोबरे,करडी बर्याच प्रकारची तेल मिळतात. जाणकार सांगतात की घाण्यातून काढलेले खाद्यतेल कधीही आरोग्यासाठी उत्तम समजल जातं.

याउलट रिफाइंड तेल हे गंधरहित व्हावं यासाठी रासायनिक प्रक्रिया केलेले असते. हे तेल चांगलं दिसावं असा प्रयत्न असतो. हे तेल दोनदा फिल्टर होत असल्यानं त्यातील आवश्यक सत्व नाहीशी होतात. तसेच यातील रासायनिक घटकांमुळे हे तेल आरोग्यास घातक ठरू शकतं. हे आकर्षक पॅकिंगमध्ये येत असल्याने अनेकजण ते वापरतात.

आज आपण या लेखात सर्व प्रकारच्या तेलाची माहिती घेणार आहोत.

आजकाल वेगेवगळे डाएट सांगितली जातात. त्यात बहुतेक जण तेलाबद्दल वेगवेगळी माहिती सांगतात. तेल हे कसं हानिकारक आहे आणि तेलकट अन्नपदार्थ खाऊ नये सांगतात. पण तेल एकदम बंद करण्यापेक्षा तेलाचे सेवन किती करावे याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. प्रौढांच्या आहारात दोन ते तीन टी स्पून तेल असावे. स्त्री आणि पुरूष दोघांसाठीही हे प्रमाण सारखंच आहे. तेलाचे प्रमाण हे ७५०-९०० मिलिलिटर प्रतिव्यक्ती प्रति महिना असले तर आरोग्यासाठी चांगले असते. यापेक्षा जर तेलाचे प्रमाण वाढत असेल तर कोलॅस्टोरॉलचं प्रमाण वाढतं. आहारात प्रथिने खूप कमी असतील आणि शरीराला योग्य व्यायाम नसेल तर तर ते चरबीच्या रुपात साठते.

आपल्या भारतात विविध राज्यात भागांमध्ये विविध प्रकारचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. शेंगदाणा तेल प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम भारतात वापरले जाते, तर खोबरेल तेल दक्षिण भारतात, सूर्यफूल आणि तूप पंजाब-हरियाणामध्ये वापरले जाते. प्रत्येक तेलाची भिन्न विशेषता आहे.

मोहरीचे तेल
उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार इत्यादी ठिकाणी मोहरीचे तेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् (MUFAs)भरपूर असतात. आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् (PUFAs) चे प्रमाण खूप कमी असते. हे तेल आरोग्यासाठी चांगले समजले जाते. त्याच्या वापराने एकूण कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल कमी होते. या तेलाचा तळण्यासाठी ही तुम्ही वापर करू शकता. पण हे तेल इतर तेलाबरोबर मिश्र रुपात वापरावे.

सूर्यफुलाचे तेल
उत्तरेला पंजाब-हरियाणा, काश्मीर या ठिकाणी सूर्यफुलाचे तेल जास्त वापरले जाते. त्यात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट जास्त असते. विशेषतः लिनोलिक ऍसिड. हे आरोग्यासाठी चांगले समजले जाते . एलडीएल आणि एचडीएल दोन्हीचे प्रमाण कमी करते. पण तळण्यासाठी हे चांगले नाही, कारण पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स गरम होतात आणि ते हानिकारक बनतात. हे तेल पाम किंवा पामोलिन तेल सोबत वापरणे योग्य होईल.

सोयाबीन तेल
हे तेल मध्य भारतात वापरले जाते, या तेलामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, विशेषतः अल्फा लिनोलिक ऍसिड असते.आरोग्यासाठी हे पण चांगले आहे . हे चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉल या दोन्हीमध्ये संतुलन राखते. पण तळण्यासाठी हे तेल वापरू नये. कारण पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स गरम होतात आणि विषामध्ये बदलतात.

शेंगदाणा तेल
हे तेल पूर्ण भारतात सर्वाधिक वापरले जाणारे तेल आहे. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. आरोग्यासाठी हे चांगले आहे . हे एलडीएल पातळी कमी करते, परंतु चांगले कोलेस्ट्रॉल पातळी सामान्य ठेवते. तळण्यासाठी हे वापरले तरच चांगले आहे.

राईस ब्रान
अलीकडेच याचा वापर होऊ लागला आहे. हे जपान आणि कोरियामध्ये वापरल्या जाणार्‍या तांदळाच्या भुशातून काढले जाते म्हणून त्याचे नाव राईस ब्रान तेल आहे. यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते.आरोग्यासाठी हे उत्तम आहे . त्यात ओरिझोल देखील असते, जे एलडीएल कमी करते. यासोबतच नैसर्गिक व्हिटॅमिन ई आणि स्क्वेलीन देखील आहेत ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. तळण्यासाठीसुद्धा हे चांगले आहे.तळताना हे शेंगदाणा तेलापेक्षा १५ टक्के कमी शोषले जाते.

ऑलिव तेल
एकेकाळी केवळ स्पेन, अर्जेंटिना यांसारख्या देशांमध्ये वापरण्यात येणारे हे तेल आता चवीमुळे जगभर लोकप्रिय होत आहे. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. हे एक्स्ट्रा व्हर्जिन (ऑलिव्ह पहिल्यांदा काढलेले), व्हर्जिन (सेकंड प्रेसिंग), शुद्ध (प्रक्रिया केलेले) आणि कमी प्रक्रिया केलेले तेल अशा अनेक प्रकारचे असते. आरोग्यासाठी हे उत्तम मानले जाते . हे एकूण आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करते. शरीरातील चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. तळण्यासाठीही हे चांगले मानले जाते.

करडी तेल
पॉलिअनसॅच्युरेटेड करडी किंवा सफोलासारखे तेल देखील अनेक ठिकाणी वापरले जाते. हे आरोग्यासाठी चांगले आहे पण तळण्यासाठी योग्य नाही. हे मिश्र स्वरुपात वापरता येते.

खोबरेल तेल
हे वनस्पती तेल असल्याने त्यात कोलेस्ट्रॉल फार कमी किंवा नसतेच .आरोग्यासाठी हे ठीक आहे. तळण्यासाठी चांगले नाही. याचा वास उग्र असतो.

पामोलिव तेल
त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, परंतु लिनोलिक ऍसिडचे प्रमाण कमी असते. हे इतर तेलांच्या सोबत मिश्र स्वरुपात वापरता येते.

तुम्ही कोणते तेल वापरता ? हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required