हा आहे सचिनच्या बॅटचा डॉक्टर : भेटा राम भंडारी यांना..

सचिनच्या बॅटींगबद्दल आम्ही  काय बोलणार? ती बघतच आपण लहानाचे मोठे झालो. काहीजण म्हातारेही झाले, आणि काहीजण त्याला खेळताना बघत बघत मरूनही गेले. गेली कित्येक वर्षे सचिन आपल्या बॅटनं प्रत्येक क्रिकेटवेड्या आत्म्याला तृप्त करतोय. पण सचिनच्या या अदभूत खेळाचा अविभाज्य घटक असणार्‍या त्याच्या जादूई बॅटमागे एक वेगळा माणूस आहे. नाव आहे राम भंडारी...

या राम भंडारींनी सचिनच्या २० हून अधिक बॅट मेन्टेन केेल्या आहेत. म्हणजे या माणसाला अगदी बॅटचा डॉक्टरच म्हणायला हवं. याच माणसानं सचिनच्या बॅटचं वजन १३५० वरून १२५० ग्रॅमपर्यंत कमी केलं होतं. त्यामुळं सचिनची पाठदुखी आणि कोपरांमधील वेदना कमी होण्यासही मदत झाली. अर्थात खेळात सचिनचं स्वतःचं अंगभूत कौशल्य तर आहेच, पण कदाचित राम भंडारींकडून रिपेअर झालेल्या बॅटचाही सचिनच्या यशात मोलाचा वाटा आहे हे खुद्द सचिनही नाकारणार नाही. सचिन तेंडुलकरच नव्हे तर ख्रिस गेल, रिकी पॉन्टिंग, केरॉन पोलार्ड, मॅथ्यू हेडन अशा दिग्गज विदेशी फलंदाजांनी आपली बॅट भंडारींकडून रिपेअर करून घेतली आहे.
राम भंडारी मूळचे बिहारी आहेत. दहावीत नापास झाल्यानंतर यांनी गाव सोडून कामासाठी बेंगळुरू गाठलं. इथेच ते सुतारकाम शिकले, इथे छोट्या मोठ्या बॅट रिपेअर करतानाच राहूल द्रविडला त्यांच्या कामाने भुरळ पाडली. आणि द्रविडनं सचिनसोबत त्यांची भेट घालून दिली. सचिनही त्यांचं गुणगान गातो. आज धोनी, विराट, रैनाही आपली बॅट राम भंडारीच्या ताब्यात देतात. मात्र इतकं असूनही भंडारींनी कोणाकडे पैशाची मागणी केलेली नाही. एका बॅट रिपेअरसाठी जास्तीत जास्त ८००-१००० रूपये त्यांना मिळतात. मिळेल त्या पैशात समाधान मानणार्‍या वृत्तीमुळे राम भंडारी आजही गरिबच आहेत. पण त्यांच्या कामाने अनेकांना श्रीमंत बनवलं हे मात्र खरं... 
 

सबस्क्राईब करा

* indicates required