computer

८१% लोकांचे पैसे महिना संपायच्या आधीच संपलेले असतात. तुम्ही त्यापैकी एक आहात का ?

महिना संपत आलाय.पगाराला अजून वेळ आहे.काही खर्च आज उद्याच करायला हवे आहेत. अशावेळी तुम्ही काय करता ? 
 शक्य असेल खर्च तर पुढे ढकलता  किंवा उधारीवर काम निभावून नेता.उधारीचा हिशोब सगळीकडेच चालत नाही. मग काय करणार ? शेठकडे उचल मागणार ,बरोबर ?काही वर्षांपूर्वीपर्यंत अशी उचल मागणं म्हणजे एक गुन्हा समजला जायचा.शेठकडे उचल मागितली की तो रागावून डोळे गोल गोल फिरवायचा.चार शेलक्या शब्दात लाज काढायचा.उचल द्यायचा पण इज्जतीचा फालूदा करायचा.

आता मात्र हा सीन-शॉट बदलला आहे.सुरुवातीला ज्या बँकेत तुमचे पगाराचे खाते असेल त्या बँकांनीच काही प्रमाणात उचल द्यायला सुरुवात केली.त्यावरून धडा घेऊन बर्‍याच कंपन्यांनी हसत हसत पगाराची उचल द्यायला सुरुवात केली . त्याला म्हणतात Earned Wage Access म्हणायला सुरुवात केली ! आता असं इंग्रजी नाव दिलं की पैशे उचलताना पण थोडं बरं वाटतं हे खरं असलं तरी बर्‍याच कंपन्या अशी उचल स्वतःच्या खिशाला खार न लावता परभारे म्हणजे थर्डपार्टीकडून उचल देतात. हा एक झाकलेला खड्डा असतो.थोडं लोड वाढलं की खड्ड्यात पडायला वेळ लागत नाही. 

Refyne-EY या  दोन कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ८१% लोकांचे पैसे महिना संपायच्या आधीच संपलेले असतात. 

अशी वेळ का येते ? कितीजणांवर येते ? कोणत्या कारणाने येते अशा प्रश्नांची उत्तरं शोधायला Refyne-EY या कंपन्यांनी ३०१० लोकांचा एक सर्व्हे केला.

आता खरं सांगायचं तर 'बोभाटा'नेच असा सर्व्हे काही महिन्यांपूर्वी केला होता.आता या दोन्ही सर्वेक्षणात काय उत्तरं मिळाली ती  तुमच्यासमोर ठेवतो आहेच. आमच्या सर्वेक्षणात मात्र हे प्रमाण इतके मोठे आढळलेले नाही. तरीपण बर्‍याचजणांना महिनाभर पैसे पुरत नाहीत ही सत्यस्थिती आहे.खर्चाचा अंदाज येत नाही.नियोजन करता येत नाही.अचानक संकटे उभी राहतात.अनेक वेगवेगळी कारणे समोर येतात.आमचे सर्वेक्षण काय सांगते ते आता बघा ! सोबत या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट्मध्ये दिलीत तर सर्वेक्षणाला अधिक मान्यता मिळेल.

भारतात महिना संपला की पगार मिळतो,अमेरिकेसारख्या देशात काही आस्थापनांमध्ये प्रत्येक आठवड्यात पगार देण्याची पण व्यवस्था असते.तुम्हाला काय आवडेल ? सर्वेक्षणात मिळालेली उत्तरे  वेगवेगळी आहेत पण महिन्याच्या शेवटी पगार मिळावा असे म्हणणार्‍यांची संख्या जास्त आहे.

बचतीचा विचार करण्याची दोन समिकरणे आहेत. 
१उत्पन्न वजा खर्च = बचत. 
२ उत्पन्न वजा बचत = खर्च 
यापैकी कोणता मार्ग तुम्ही वापरता असा प्रश्न विचारल्यावर जी उत्तरे मिळाली त्यामध्ये बचत न करण्याची शक्यता असलेल्यांची संख्या अधिक आहे. तुम्हीच सांगा तुम्ही काय करता ? 

महिना संपायच्या आधीच पगाराची रक्कम संपते का ? आमच्या सर्वेक्षणात १४% लोकांचे पैसे महिन्याच्या सुरुवातीलाच संपतात तर ४७% लोकांचे पैसे महिनाअखेरीस संपतात.तुमचे बजेट किती दिवस चालते ? 

अचानक खर्च उभा राहिला तर ? आम्हाला मिळालेल्या उत्तरातून बर्‍याचजणांची बचत अचानक खर्चात संपून जाते.बर्‍याचजणांना क्रेडीटकार्डचा आधार असतो. मित्र आणि परिवाराकडून उसने पैसे घेणे हा पर्याय ४०%च्या आसपास आहे. 

आतापर्यंत कोणीही न अनुभवलेले कोव्हीडचे  संकट गेली जवळजवळ दोन वर्षे  आपल्या डोक्यावर आहे त्यामुळे हातात पैसे जपून ठेवण्याची गरज ८१% लोकांना वाटते आहे पण गरजेनुसार ते पैसे हातात आहेतच असे फार कमी दिसले.

अनपेक्षीत खर्चाच्या सर्वेक्षणात आढळले ते असे की घर-कुटुंब आणि वैद्यकीय समस्या यामुळे जास्तीतजास्त लोकांचे पैसे खर्च झालेत.यापैकी वैद्यकीय समस्या निवारणासाठी कितीजणांकडे विम्याचे संरक्षण आहे या प्रश्नाचे नकारार्थी उत्तरच जास्त मिळाले. 

आर्थिक स्थितीबद्दल किती लोक समाधानी आहे ? या प्रश्नाचे उत्तर देताना 'नक्की सांगता येणार नाहि' हे उत्तर देणार्‍यांची संख्या जास्त होती. फक्त २३% लोक आहे त्या स्थितीत समाधानी असल्याचे आढळले.

आता काही महत्वाचे : कोणतेही सर्वेक्षण एका मर्यादेत सत्य असते. सर्वेक्षणात किती लोक भाग घेतात हे फार महत्वाचे असते. आमच्या वाचकांनी आजचा हा लेख सर्वेक्षण आहे समजून कमेंटद्वारे आपले मत नोंदवावे ही विनंती. 

सबस्क्राईब करा

* indicates required