computer

दुसऱ्या महायुद्धात बाँबवर शू करून तो निकामी करणारी श्वान ज्युलियाना!!

भटकी कुत्री घराजवळ येताच त्यांना दगड मारणारे महाभाग काही कमी नसतात. अनेकांना प्राण्यांचे वावडे असते, पण कदाचित त्यांना हे माहिती नसावे की माणसापेक्षा हे प्राणीच आपल्यासाठी कितीतरी जास्त उपकारक ठरू शकतात. घरात पाळलेले हे प्राणी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून आपल्या मालकाचे आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण करतात. अगदी छोटेसे मांजराचे पिल्लूदेखील घरात घुसू पाहणाऱ्या एखाद्या सापाला अडवून धरते. अशीच ही गोष्ट आहे, ब्रिटनमधील एका धाडसी कुत्रीची. या कुत्रीने आपल्या मालकाचा आणि परिसरातील शेजाऱ्यापाजाऱ्यांचाही जीव वाचवला. तेही एकदा नाही, तर दोनदा. दोन्हीवेळी तिने केलेल्या या कामगिरीसाठी तिला सन्माननीय ब्लू क्रॉस मेडलने गौरवण्यात आले होते.

कोण होती ही कुत्री आणि तिने नेमकी काय कर्तबगारी गाजवली होती जाणून घेऊया या लेखातून.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने ‘द ब्लीझ’ नावाचा एक प्रोग्राम आखला होता. या प्रोग्रामनुसार जर्मन सैनिक ब्रिटनमध्ये कुठेही बॉम्ब वर्षाव करत. असाच एक बॉम्ब ज्युलियानाने आपल्या मालकाच्या घराच्या छतावरून खाली घरंगळत येताना पहिला. त्या बॉम्बची वात जळत होती. तेवढ्यात ज्युलीयाना त्या बॉम्बवर जाऊन उभी राहिली आणि त्यावर तिने 'शू' केली. ज्यामुळे तो बॉम्ब विझला आणि मोठी जीवित हानी टाळली. ही ज्युलियाना ग्रेट डेन जातीची एक कुत्री होती. तिच्या या पराक्रमाची दखल घेऊन १९४१ साली तिला ब्लू क्रॉस मेडल देण्यात आले.

त्यानंतर १९४४ साली तिने दुसऱ्यांदा हे मेडल मिळवले. यावेळी तिच्या मालकाच्या दुकानात एके ठिकाणी आग लागली होती आणि मालकाचे त्याकडे लक्षच नव्हते. जोपर्यंत मालक आपल्याकडे लक्ष देत नाही आणि आपल्या मागून येत नाही तोपर्यंत ती त्याच्या शेजारी उभी राहून भुंकत राहिली. शेवटी तिचा मालक तिच्या मागोमाग गेला आणि तेव्हा त्याच्या लक्षात आले की किती मोठा अनर्थ घडला आहे. तिच्या सतर्कतेमुळे दुसऱ्यांदा एक मोठी जीवित हानी टळली होती.

रस्त्यावरील भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी, त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्याच्या उद्देशाने, लोकांमध्ये पाळीव प्राण्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी, ज्या मालकांना आपल्या प्राण्यांना खाजगी डॉक्टरांचे महागडे उपचार परवडत नाहीत, अशा लोकांच्या मदतीसाठी १८९७ साली युनायटेड किंग्डममध्ये ब्ल्यू क्रॉस ही एक धर्मादाय संस्था सुरु करण्यात आली. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवणारे प्राणी आणि प्राण्यांसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणारी माणसे अशा दोघांच्या धाडसी कृत्याच्या सन्मान करण्यासाठी या संस्थेने १९१८ सालापासून ब्ल्यू क्रॉस ॲवॉर्ड देणे सुरू केले.

ज्या घरात ज्युलियाना आपल्या मालकासोबत राहत होती ते घर काही काळ ओस पडले होते. २००३ साली त्याची साफसफाई करताना ज्युलियानाचे एक पोस्टर आणि तिचे हे दोन मेडल्स त्या घरात सापडले. या पोस्टरमध्ये ज्युलियानाचे कर्तृत्व चितारण्यात आले होते. या फोटोचा आणि मेडल्सचा लिलाव करण्यात आला. लिलाव करणाऱ्या व्यक्तीला अंदाज होता की किमान एका प्रत्येक वस्तूमागे ६० पौंडाची तर कमाई होईल. प्रत्यक्षात मात्र त्याला एकूण १,१०० पौंड मिळाले.

ज्युलियानाने आपल्या सतर्कतेने आणि प्रसंगावधानाने कित्येकांचे प्राण वाचवले होते. चांगल्या लोकांना शत्रू फार असतात हे तर आपल्याला माहितच आहे. तसेच या चांगल्या कुत्रीलाही शत्रू होते. कुणी तरी अनामिकाने तिच्या मालकाच्या लेटर बॉक्समध्ये विषाची पुडी ठेवली. ज्युलियानाने चुकून ते विष खाल्ले आणि ती मेली.

एका जनावराचे उपकारही माणसाने अशा प्रकारे अपकाराने फेडले.

आपल्या आजूबाजूला असलेले हे प्राणी नेहमीच धोक्याच्या वेळेला आपल्याला सूचना देत असतात, मदत करत असतात. मग प्राण्यांविषयी प्रेम नसले तरी किमान दयाभाव बाळगायला तरी काय हरकत आहे?

मेघश्री श्रेष्ठी.

सबस्क्राईब करा

* indicates required