रात्रीच्या वेळी ती मुलगी निर्मनुष्य रस्त्यावर एकटीच होती...यावर या ड्रायव्हर कंडक्टरने जे केले, त्याला आमचा सलाम!

रात्रीच्यावेळी एकटी मुलगी म्हणजे निमंत्रण नसून जबाबदारी आहे हे सिद्ध केलंय मुंबईच्या २ बस कर्मचाऱ्यांनी. दिल्ली असो वा मुंबई मुलींच्या सुरक्षेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केला जातो. पण शेवटी सगळे सारखे नसतात हेच खरं.

झालं असं की, रात्रीच्या १.३० वाजता बेस्ट बस क्रमांक ३९८ मधून एक मुलगी मुंबईच्या एका सुनसान भागात उतरली. बस कंडक्टरने तिला विचारलं की ‘तुम्हाला कोणी घ्यायला येणार आहे का ?’ तिने ‘नाही’ म्हटलं. कंडक्टरच्या लक्षात आलं की जोवर रिक्षा मिळत नाही तोवर तिला याच निर्मनुष्य जागी उभं राहावं लागेल. तिच्या सुरक्षेच्या जबाबदारीची जाणीव होताच कंडक्टर आणि ड्राईव्हरने बस बाजूला उभी करून तिला रिक्षा शोधण्यास मदत केली. रिक्षा मिळाल्यानंतर दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले.

मंडळी, प्रवाश्याला सुखरूपपणे त्याच्या इच्छित स्थळी सोडल्यानंतर दोघांची जबाबदारी संपली होती. पण एक माणूस म्हणून असलेली स्वतःची जबाबदारी त्यांनी ओळखली हे त्यांचं मोठेपण आहे. अशाच मोजक्या माणसांमुळे माणुसकीवरचा विश्वास आज टिकून आहे. दोघांनाही बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required