computer

५००० वर्षे जुनी बियर फॅक्टरी सापडली आहे...इथला इतिहास काय सांगतो पाहा !!

इजिप्त. काहीसा गूढ वाटेल असा देश. इथल्या ममीजनी न जाणो इतिहासाची कोणकोणती रहस्यं आपल्यात बंदिस्त करून ठेवलीयेत! पिरॅमिडचंही तसंच. त्या वातावरणातच प्राचीन संस्कृती अनुभवत असल्याचा फील आहे. सध्या मात्र हा देश चर्चेच्या केंद्रस्थानी आहे तो तिथे सापडलेल्या पुरातन अशा बियर फॅक्टरीमुळे. 

अमेरिकन आणि इजिप्शियन पुरातत्वशास्त्रज्ञांना हा कारखाना सापडला आहे, उत्खननासाठी प्रसिद्ध असलेल्या इजिप्तमधील अबिडोस या प्राचीन ठिकाणी. हा कारखाना आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व कारखान्यांमध्ये सर्वात पुरातन असू शकतो, अशी माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. इजिप्तच्या पुरातत्व विभागाच्या सर्वोच्च परिषदेचे सरचिटणीस, मुस्तफा वजीरी यांनी ही माहिती दिली आहे.

अबिडोस हे कैरोच्या दक्षिणेला साधारण ४५० किलोमीटर (सुमारे २८० मैल) वर, वाळवंटात, नाईल नदीच्या पश्चिमेला असलेलं ठिकाण. मुळात ही एक प्राचीन दफनभूमी आहे. हे ठिकाण, पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासकांसाठी नंदनवन मानलं जातं. पहिल्या राजवंशाचा संस्थापक राजा नर्मर आणि त्याचे वंशज यांची थडगी अबिडोस येथे आढळतात. इथली दफनभूमी तिसाव्या राजवंशाच्या काळापर्यंत सतत उपयोगात होती. प्राचीन इजिप्शियन समजूतीनुसार ओसिरिस  हा पाताळाचा स्वामी आणि मृतात्म्यांच्या कर्माचा न्यायनिवाडा करणारा देव आहे. अबिडोस हा प्रदेश याच देवतेचे स्मारक म्हणून ओळखला जात असे. अबिडोस येथील दफनभूमी, प्रागैतिहासिक काळापासून रोमन काळापर्यंत वापरली जात होती.

वजीरी यांच्या मते, हा कारखाना याच राजा नर्मरच्या अधिपत्याखालील प्रांतातील असावा. या राजाचा काळ इसवी सन पूर्व ३१५० - २६१३ च्या दरम्यानचा मानला जातो आणि त्याला प्राचीन इजिप्तच्या एकीकरणाचा जनक मानलं जातं.

पुरातत्वशास्त्रज्ञांना येथे एकूण आठ विशाल उत्पादनकेंद्रं सापडली आहेत – प्रत्येक उत्पादनकेंद्र २० मीटर (सुमारे ६५ फूट) लांब आणि २.५ मीटर (सुमारे ८ फूट) रुंद आहे. प्रत्येक केंद्रामध्ये, दोन ओळींमध्ये, सुमारे ४० मातीच्या रांजणांचा समावेश आहे. वजीरी यांच्या म्हणण्यानुसार, या रांजणांचा उपयोग प्रामुख्याने धान्य आणि पाण्याच्या मिश्रणावर प्रक्रिया करून, त्यापासून बिअर तयार करण्यासाठी केला जात असे.

प्राचीन इजिप्तमध्ये, बिअर विविध विधींमध्ये वापरली जात असावी असं काही पुराव्यांवरून दिसून येतं. हॅथोर या देवतेच्या जन्मकहाणीमध्ये बिअरचा उल्लेख आहे, तसंच इजिप्तमधील काही थडग्यांमध्येही बिअरच्या कारखान्यांच्या छोट्या प्रतिकृती सापडल्या आहेत. बहुधा या कारखान्याची उभारणी, मुख्यत्वे राजघराण्यातील सदस्यांना, विविध विधींसाठी लागणारी बिअर उपलब्ध करुन देण्यासाठी झाली असावी! याला तसं कारणही आहे. प्राचीन इजिप्शियन लोकांच्या बलिदानाविधीमध्ये बिअरचा वापर दर्शविणारे पुरावे पुरातत्वशास्त्रज्ञांना सापडले आहेत. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञांनी अशा कारखान्याच्या अस्तित्वाचा उल्लेख केला होता, परंतु ते त्याचं स्थान निश्चित करू शकले नव्हते.

आता इजिप्तला एकदम हे उत्खनन करायचे कुठून सुचलं? यामागचं कारण अगदीच मुलखावेगळं आहे. ते म्हणजे पर्यटकांना आकर्षित करणं. 

इजिप्तने गेल्या काही वर्षात डझनभर प्राचीन शोधांची घोषणा केली, जेणेकरून अधिकाधिक पर्यटक इजिप्तकडे आकर्षित होतील.

२०११ मध्ये झालेल्या प्रसिद्ध उठावानंतर, अनेक वर्षं सत्तेवर असलेले, होस्नी मुबारक यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आणि त्यानंतरच्या राजकीय उलथापालथीमुळे इजिप्तमधील पर्यटन उद्योग धोक्यात आला. त्यातच भर म्हणून मागील वर्षी कोरोनाव्हायरस साथीमुळे पर्यटन उद्योगाला मोठाच फटका बसला. या पार्श्वभूमीवर सतत नवे शोध जाहीर करून पर्यटन उद्योगाला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न इजिप्तमध्ये चालू आहे. 

त्यांची ही कल्पना कितपत यशस्वी होते हे येणारा काळच ठरवेल. 

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required