computer

या माशाचा वापर चक्क वीज तयार करण्यासाठी होतोय....कसं शक्य झालं हे ?

इलेक्ट्रिक ईल प्राण्याच्या आत त्याच्या नावाप्रमाणेच वीज असते. या प्राण्याच्या शरीरात एका विशिष्ट प्रकारचे अवयव असतात जे वीज उत्पन्न करतात. हल्ला झाल्यावर या विजेचा वापर हत्यारासारखा होतो. आता कोणालाही वाटेल की ही वीज आपल्या घरातल्या विजेसारखीच असते का? या विजेचा वापर दिवा पेटवण्यासाठी होऊ शकतो का ? ही कल्पना आता सत्यात उतरली आहे.

अमेरिकेतल्या टेनेसी मत्स्यालयातील इलेक्ट्रिक ईलचा वापर ख्रिसमस ट्री वरचे दिवे पेटवण्यासाठी होत आहे. हा व्हिडीओ पाहा.

या इलेक्ट्रिक ईलचं नाव आहे मिगुएल वॉटसन. ख्रिसमस ट्री वर लावलेले दिवे एका विशिष्ट पद्धतीने मिगुएलच्या टँकशी जोडण्यात आलेले आहेत. मिगुएल जेव्हा अन्नाच्या शोधात असतो किंवा उत्तेजित होतो तेव्हा त्याच्या शरीरातून विजेचा झटका सोडला जातो. पाण्यात सोडलेल्या सेन्सॉरकडून हा विजेचा झटका स्पीकर्सकडे पाठवला जातो. हे स्पीकर्स त्या विजेचा वापर ध्वनी तयार करण्यासाठी आणि दिवे पेटवण्यासाठी करतात.

मेगुएलने झटका सोडला नाही तरी दिवे लुकलुकताना तुम्ही व्हिडीओ मध्ये पाहू शकता. याचं कारण म्हणजे इलेक्ट्रिक ईल अन्नाच्या शोधात असताना सतत विजेचे तरंग सोडत असते. हे कमी व्होल्टेजचे विजेचे तरंग असतात म्हणून दिवे लुकलुकतील एवढीच उर्जा पुरवली जाते.

तर, टेनेसी मत्स्यालयाला वाटतं की या अनोख्या प्रयोगामुळे इलेक्ट्रिक ईलला बघून जी भीती वाटायची ती कमी होईल. तशी  ती कमी होताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांनी इलेक्ट्रिक ईलबद्दल फक्त कल्पना केली होती, पण टेनेसी मत्स्यालयाने कल्पनेला सत्यात उतरवलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required