computer

१५ महिन्यांची विश्रांती: .५०० किलोमीटर चालेल्या हत्तींनी अखेर विश्रांती घेतली... फोटो पाहा !!

हत्ती म्हटला म्हणजे सुखी जीव. ना कुणाच्या अध्यात न मध्यात. शांतपणे राहायचे, अन्नाच्या शोधात फिरायचे हा या प्राण्याचा नेहमीचा शिरस्ता आहे. थोडक्यात हत्ती म्हणजे निरुपद्रवी जीव. हाच जीव सध्या व्हायरल झाला आहे. का होतोय ती व्हायरल? नक्की काय घडलं आहे?

चीनमध्ये आशियाई हत्तींचा एक कळप गेले कित्येक महिने चालत आहे. हा कळप थोडे थोडके नाही तर तब्बल १५ महिन्यांपासून प्रवास करतोय. सध्या या हत्तींचा थकून झोपलेल्या अवस्थेतला  फोटो वायरल झाला आणि पूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे.

हत्तींचा हा कळप चीनच्या युनान प्रांतातील अभयारण्यातला आहे.  मार्च २०२० साली या हत्तींनी आपला प्रवास सुरु केला होता. डिसेंबरमध्ये त्यांनी अभयारण्य ओलांडून पळ काढला. तेव्हा देखील या विषयाची चांगलीच चर्चा रंगली होती. आज १५ महिने होऊन आणि तब्बल ५०० किलोमीटर चालून झाल्यावर या हत्तींना नेमके जायचे कुठे आहे याबद्दल मात्र संभ्रम आहे. 

प्रवीण कासवान नावाच्या एका आयएफएस अधिकाऱ्याने या हत्तींचा फोटो शेयर केला आणि तो लगेच व्हायरल झाला. त्यांनी लिहिले होते की सहसा हत्ती उभे असतानाच झोपतात. पण हत्तींना या पद्धतीने झोपलेला बघणे रंजक आहे.

हत्ती दौऱ्यावर निघाले म्हणजे ते शांतपणे चालत आहेत असेही नाही. या हत्तींच्या कळपाने आजवर तब्बल ७ कोटींपेक्षा जास्त गोष्टींचे नुकसान केले आहे. या कळपात एकूण १६ हत्ती होते. त्यातले २ परत गेले तर एका हत्तीणीने पिल्ल्याला जन्म दिला आहे. सध्या या कळपात ६ मादी, ३ नर, ३ किशोरावस्थेतील तर ३ लहान हत्ती आहेत. 

चीनमधील महत्वाच्या संस्थांचे मात्र या कळपावर बारीक लक्ष आहे. आराम करून झाल्यावर हे हत्ती जेव्हा पुन्हा चालायला लागले तेव्हा त्यांचा रस्ता मोकळा करण्यासाठी तब्बल ४१० कर्मचारी, ३७४ वाहने वापरण्यात आले. याखेरीज १४ ड्रोन्सच्या सहाय्याने त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.  तसेच या हत्तींना जेवण्यासाठी २ टन अन्नाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यांना निश्चित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी बाकी रस्ते बंद करण्यात आले आहेत. जेणेकरून ते बरोबर ठिकाणी पोहोचतील.

चीनमध्ये या प्रकारचे आशियाई हत्ती फक्त ३०० उरले असल्याने त्यांना काही हानी होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. तेथील अधिकाऱ्यांच्या मते हे चीनमधील सर्वात मोठे स्थलांतर आहे. या हत्तींचा नेता अनुभवहीन असल्याने कुठे जायचे याबद्दल स्पष्टता नसल्याने ते फक्त रस्ता दिसेल तसे चालत निघाले असावेत असा देखील अंदाज आहे.

काही असले तरी या हत्तींनी मात्र संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे हे देखील तितकेच खरे आहे. आता ते पुढचा प्रवास कुठे करतात आणि अखेर कुठे थांबतात हे पाहण्यासारखं असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required