computer

एका बांधकाम मजुराला डॉक्टरेट पदवीपर्यंत पोचवणारी 'इरॅस्मस मुंडस' स्कॉलरशिप! तुम्ही ही कशी मिळवू शकाल?

नुकताच ११ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’ येऊन गेला.  सध्याच्या एकूण बातम्यांच्या पुरांमध्ये या दिवसाबद्दल तुमच्या काहीच कानावर पडलं नसेल. या दिवसानिमित्त आम्ही तुमची  ओळख अशा एका आंतरराष्ट्रीय  शैक्षणिक शिष्यवृत्ती कार्यक्रमासोबत करून देणार आहोत ज्याचा फायदा अनेक भारतीय विद्यार्थ्यांना झालेला आहे. खेदाची गोष्ट अशी की महाराष्ट्रात मुंबई-पुणे या सारखे शहरी विभाग वगळता ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ‘इरॅस्मस‘ शिष्यवृत्तीबद्दल काहीही माहिती नाही. चला तर आज जाणून घेऊया इरॅस्मस म्हणजेच ‘युरोपियन कम्युनिटी अॅक्शन स्कीम फोर  दि मोबिलिटी ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट्स’ या शिष्यवृत्तीबद्दल.

हे इतकं लांबलचक नाव तयार करण्याचं उद्दिष्ट काही वेगळंच आहे. १५ व्या शतकात संपूर्ण युरोपला शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या ‘डेसिडीरीयस’ या रोमन कॅथलिक संन्याशाच्या स्मृतीप्रित्यर्थ हे नाव देण्यात आलंय. त्यानंतर काही वर्षानंतर १९८७ नंतर युरोपियन कमिशनमधील अनेक देशांनी एकत्र येऊन मोठी आर्थिक तरतूद निर्माण केली. अनेक शिष्यवृत्तींचे आयोजन करण्यात आले. भारताच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ‘इरॅस्मस प्लस २०१४-२०२०’ हा कार्यक्रम सध्या राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना युरोपातील अनेक देशांपैकी एखाद्या देशात जाऊन संशोधन पूर्ण करता येते. या कार्यक्रमात भारताचा अंतर्भाव ‘टार्गेट-३’ यामध्ये होतो.

या कार्यक्रमाचे खरे फायदे आपल्याला २००९ सालपासून मिळायला लागले. याचे श्रेय आपले राष्ट्रपती ‘अब्दुल कलाम’ यांच्याकडे जाते. २००९ साली त्यांनी युरोपियन युनियनसोबत केलेल्या शैक्षणिक करारानंतर भारताचे अनेक विद्यार्थी संशोधन करण्यास युरोपातील अनेक देशात गेले. २०१४ सालचेच आकडे सांगायचे झाले तर एकूण ४००० विद्यापीठे आणि ३१ देश या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. २०१९ साली भारतातून एकूण ४५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यापैकी ४८ विद्यार्थिनी आणि ४१ विद्यार्थ्यांना १००% अनुदानित शिष्यवृत्ती मिळाली आहे. बऱ्याचवेळा अशा अनेक शिष्यवृत्ती कार्यक्रमांबद्दल आपण ऐकतो पण आपल्या परिचितांपैकी कोणालाही अनुभव नसल्यामुळे त्याचा फायदा घेऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका दाम्पत्याची ओळख करून देत आहोत ज्यांनी ‘इरॅस्मस मुंडस’ या शिष्यवृत्तीचा फायदा मिळवून स्पेनमधून डॉक्टरेट मिळवली आहे.

(डॉ. अनिल रामचंद्र कुर्‍हे)

डॉ. अनिल रामचंद्र कुर्‍हे यांचं संपूर्ण शैक्षणीक जीवन संघर्षाची कहाणी आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या सिमेवर असलेल्या हिंगोली जवळच्या दिग्रस या एका छोट्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. दहावीची परीक्षा संपली तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की यापुढचे शिक्षण घरच्या आर्थिक परीस्थितीमुळे शक्य होणार नाही. पण शिकायचं तर होतं, मग करायचं काय ? अनिल कुर्‍हे त्या दहावीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला आले.नोकरी शोधण्याचं वयही नव्हतं, वेळही नव्हता. घाटकोपरच्या एका झोपडपट्टीत रहाण्याची सोय झाली. दुसर्‍या दिवशीपासून बांधकाम मजूर म्हणून कामाला सुरुवात केली. सुट्टी संपली. जमा  झालेल्या पैशातून अकरावीचं वर्ष पार पडलं.

जे दहावी पास झाल्यावर केलं तेच दरवर्षी सुरु झालं. बारावीच्या नंतर एका साइटवर काम करताना दिवसभर विमानं हवेत झेप घेताना दिसायची. त्या विमानांकडे बघताना त्यांच्या  महत्वाकांक्षेला पंख फुटले. आता शिक्षण सोडायचे नाही. एक ना एक दिवस अशाच विमानातून परदेशी शिक्षण घायचं. ही घटना १९९७ ची पण पुढची बारा वर्षं औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात डिग्री, नंतर मास्टर्स आणि त्यानंतर रत्नागिरीच्या सागरी संशोधन केंद्रातून डॉक्टरेट आर्थिक तंगी, सरकारी दिरंगाई, हाल उपेक्षा यांनी भरली होती. अशाच एका दिवशी पेपर चाळताना त्यांना इरॅस्मस मुंडस फेलोशिपची माहिती मिळाली आणि सोबत आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली.

त्यांनी सागरी जीवांच्या जैव विविधतेवर एक नवे संशोधन करायचे ठरवले. त्यांच्या या प्रोजेक्टला इरॅस्मस मुंडस ची मान्यता मिळाली पण ते ज्या महाविद्यालयात कार्यरत होते तिथून शिक्षणासाठी रजा मिळेना, शेवटी विखे पाटील यांच्या थेट हस्तक्षेपानंतर एकदाची परवानगी मिळाली. आता पुढचे संकट होते व्हिसा मिळवण्याचे ! पहिलाच परदेश प्रवास, व्हिसाची माहिती नाही. तब्ब्ल दोन महीन्याच्या धडपडीनंतर जेव्हा अनिल कुर्‍हे स्पेनच्या सांतियागो विद्यापिठात पोहचले तेव्हा त्यांचे स्वागत झाले. आता समस्या भाषेची होती. मार्गदर्शकाला स्पॅनीश खेरीज दुसरी भाषा येत नव्हती आणि कुर्‍ह्यांना आपल्या भारतीत इंग्रजी खेरीज दुसरी भाषा येत नव्हती.  एका मित्राने दुभाषा म्हणून काम करण्याची तयारी दाखवली. संशोधन पूर्ण झाले.

(सौ सागरिका कुर्‍हे)

या संपूर्ण शिक्षणाचा खर्च इरॅस्मस मुंडसच्या शिष्यवृत्तीतून झाला. यानंतर त्याच्या अंगात एक वारंच संचारलं. त्यांनी भारतातल्या चौदा विद्यापिठांसोबत इरॅस्मस मुंडसचा करार घडवून आणला. परीणामी पुढच्या दोन वर्षात भारतातून ५६ विद्यार्थी युरोपात  शिक्षण घेण्यास पोहचले. या सर्वांना इरॅस्मस मुंडसने आर्थिक पाठबळ दिले होते. या दरम्यान डॉ अनिल कुर्‍ह्यांच्या पत्नी सौ सागरिका यांना पण समाजशास्त्र या विषयात संशोधन करण्यास स्पेनला जायची संधी मिळाली. पुढच्या दोन वर्षांमध्ये त्यांनाही डोक्टरेट मिळाली. त्यांचे मित्र डॉ. सोपान डाळींबे पण इरॅस्मस मुंडसच्या कार्यक्रमात सहभागी झाले. आज डॉक्टर कुर्‍हे अनेकांना प्रेराणा देत प्रवरा विद्यापीठात कार्यरत आहेत. 

एक बांधकाम मजूर ते इरॅस्मस मुंडस फेलो हा प्रवास शक्य झाला केवळ डॉक्टरांच्या महत्वाकंक्षेला पंख आणि बळ देणार्‍या इरॅस्मस मुंडसच्या शिष्यवृत्तीने !! 

आमच्या वाचकांना अशा शैक्षणीक उपक्रामाची माहिती मिळावी या उद्देशाने हा लेख आम्ही बोभाटावर प्रकाशित केला आहे. तुम्ही डॉक्टर अनिल कुर्‍हे यांच्याशी संवाद साधायचा असेल तर या इमेल अ‍ॅड्रेस्वर संपर्क करू शकता.

[email protected]

सबस्क्राईब करा

* indicates required