computer

समागमानंतर मादी नराला खाऊन टाकते? प्राणघातक 'ब्लॅक विडो स्पायडर'विषयी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

जगभरात कोळ्यांची ओळख म्हणजे जाळे विणून त्यात कीटकांना अडकवणारा आणि त्यांची शिकार करणारा अशीच आहे. कोळी म्हणजे एक निरुपद्रवी, त्रास न देणारा प्राणी, हो ना? तो घरात जाळे विणतो आणि मग आपण झाडूने साफ करून टाकतो. पण एका विषारी कोळ्याच्या जातीविषयी तुम्हाला माहिती आहे का? एक कोळ्याने चावा घेतल्यावर विष अंगभर पसरून मृत्यूही होऊ शकतो. या कोळ्याच्या जातीचे नाव आहे "ब्लॅक विडो स्पायडर". हा अमेरिकेच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील भागात सहज आढळतो. या भागांत ब्लॅक विडो स्पायडरची विषारी आणि जीव घेणारा म्हणून दहशत आहे. पण यामागचे सत्य काय आहे? आज आपण या ब्लॅक विडो कोळ्याविषयी माहिती करून घेऊयात.

या कोळ्याचे शास्त्रीय नाव लाट्रोडेक्टस आहे. अमेरिकेत आढळणार्‍या सर्वात विषारी कोळ्यांपैकी तो एक आहे. हे कोळी अंधाऱ्या जागेत राहतात, जुने फर्निचर, खूप दिवस न वापरलेले बूट, दगडी कपारी, खुर्चीच्या खाली हे आढळून येतात. पण तरी ब्लॅक विडो स्पायडर हे जगातील सर्वात एकमेव प्राणघातक कोळी नाहीत. ऑस्ट्रेलियाचे फनेल-वेब कोळी आणि ऑस्ट्रेलियन redback कोळी हेही तितकेच विषारी आहेत.

ब्लॅक विडो स्पायडरचे विष खुळखुळ्या सापाच्या विषापेक्षा १५पट अधिक विषारी असते. या विषात अल्फा-लॅटरोटॉक्सिन नावाचे रसायन असते, हे रसायन मज्जातंतूंच्या पेशींवर आक्रमण करते आणि त्यामुळे प्रचंड वेदना होतात. जेव्हा अल्फा-लॅटरोटॉक्सिन एखाद्या व्यक्तीच्या मज्जातंतू पेशीपर्यंत पोहोचते, तेव्हा आसपासच्या सर्व पेशी मृत होऊन जातात. त्यामुळे चावल्यावर तीव्र वेदना तर होतातच, शिवाय जखमेभोवती सूज येणे, स्नायूला गोळा, घाम येणे आणि थंडी वाजणे हेही होऊ शकते. परंतु कोळी सापांपेक्षा खूपच लहान असतात आणि एकाच वेळी सर्व विष सोडत नाहीत. त्यामुळे या विषाचा धोका लहान मुले आणि वृद्ध लोकांना जास्त धोका असतो.

दरवर्षी अंदाजे २५०० लोक या कोळ्याच्या चावा घेतल्याने बाधित होतात. पण यांच्यासाठी औषध उपलब्ध आहे. या कोळ्याच्या (Antivenom) अँटीवेनममुळे मृत्यू येत नाही. फक्त त्यासाठी ते वेळेत मिळणे गरजेचे असते. अँटीवेनम पहिल्यांदा १९३० साली बनवले गेले होते. रुग्णाची परिस्थिती पाहून अँटीवेनम दिले जाते.

ब्लॅक विडो असे विचित्र नाव देण्यामागचे ही एक कारण आहे. ते म्हणजे यांचा असलेला चमकदार काळा रंग आणि नर मादी संभोगानंतर मादी नराला खाऊन टाकते. पण जेव्हा याविषयी संशोधन झाले तेव्हा असे आढळले की केवळ २ टक्के मादया नराला खाऊन टाकतात. संशोधकांचे असे म्हणणे आहे की जर सर्व नरांना असे खाल्ले असते तर जंगलात नरांची संख्या मादी कोळींएवढीच समान नसती.

ब्लॅक विडो मध्ये अनेक प्रजाती देखील आहेत. त्या त्या भागाप्रमाणे त्यांचे नाव बदलते. पण सामान्यपणे ब्लॅक विडो हे नावच जास्त वापरले जाते. यात अजून एक गंमत म्हणजे नर कोळ्याचा आकार हा मादी कोळ्यापेक्षा अर्धा असतो. मादी ही चमकदार आणि काळ्या रंगाची असते. तिच्या पोटावर चमकदार लाल खूण असते. तर नराचा रंग फिकट असतो. त्याच्या अंगावर लाल किंवा गुलाबी डाग असतात. कुठलाही धोका जाणवतो तेव्हा मादी पोटावरील लाल खुणेने संदेश पाठवते. लाट्रोडेक्टस हेरस्पर्स, लाॅट्रोडेक्टस व्हेरोलस, आणि लाट्रोडेक्टस मॅकटन्स ही इतर प्रजातींची नावे आहेत.

ब्लॅक विडो कोळी हे लहानपणापासूनच शिकार करू शकतात किंवा चावा घेऊ शकतात. उलट मोठ्या कोळ्यांपेक्षा हे लहान कोळी जास्त आक्रमक असतात. एका संशोधनात असे दिसून आले आहे की जेव्हा ब्लॅक विडो कोळी एकत्र येतात, तेव्हा मोठे कोळी छोट्या कोळ्यांना लगेच खाऊन टाकतात. असेही केव्हा केव्हा होते की मादी जेव्हा ३०० अंडी घालते तेव्हा त्यापैकी १च अंडे जगते आणि २९९ खाल्ली गेली असतात.

ब्लॅक विडो कोळी यांची समशीतोष्ण (जिथे उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमानात फारसा फरक नसतो) अशा हवामानात भरभराट होते. जास्त थंडीत ते जगू शकत नाहीत. वसंत ऋतू हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. थंड वातातवरण सहन होत नसल्याने ते अमेरिकेच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील भागात अधिक प्रमाणात आढळतात. आता वातावरण बदलांमुळे यांच्या प्रजाती इतर भागातही दिसून येत आहेत. एक अभ्यासात असे दिसून आले आहे की १९६० ला कॅनडाच्यामध्ये आढळून आलेले ब्लॅक विडो कोळी आज ३१ मैल दूरपर्यंत पसरलेले आहेत. म्हणजेच वातावरणानुसार ते त्यांचे अस्तित्व वाढवत आहेत.

या विषारी ब्लॅक विडो कोळ्यांची माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि शेयर करायलाही विसरू नका.

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required