जाणून घ्या मोबाईल हॅकिंगचे नवे प्रकार आणि त्यापासून वाचण्याचे उपाय!

तुमच्यापैकी किती जण मोबाईल वापरतात? जवळपास सगळेच. अनेक जणांसाठी मोबाईल एक व्यसन बनले आहे. पूर्वीच्या चित्रपटात काही डॉयलॉग कायम ऐकायला यायचे. नायक त्याच्या नायिकेला म्हणायचा... “मै तेरे बगैर नही जी सकता...” किंवा... “तुझे मुझसे कोई भी अलग नही कर सकता...” पण आज हेच डॉयलॉग माणूस त्याच्या मोबाईलला म्हणू लागतो. आणि समजा तुमचा इतका प्रिय मोबाईल बंद पडला किंवा कायमचा खराब झाला तर? किंवा तुमच्यासाठी तो डोकेदुखी ठरला तर? आणि हे शक्य आहे... मोबाईल हॅकिंग ही गोष्ट आजकाल खूप सर्वसामान्य बाब झाली आहे. या गोष्टी आजकाल अगदी नुकतेच शालेय शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थीही करू शकतात. त्यांच्यासाठी गंमत असते पण तुमच्यासाठी डोकेदुखी, त्यांच्यासाठी नवीन शिक्षण असते तर तुमच्यासाठी न आवडणारा अनुभव. बरे काही जण त्याचा तुमच्याविरुद्धचे शस्त्र म्हणूनही वापर करू शकतात.
जी गोष्ट मोबाईलची, काहीशी तशीच गोष्ट इमेलची. आजकाल विद्यार्थी असो वा व्यावसायिक... ईमेलचा वापर करतातच. अनेक गोष्टी या इमेलमुळे खूप सोप्या झाल्या आहेत. आणि समजा तेच इमेल हॅक झाले तर? अनेकदा तर त्यात तुमची खूप महत्त्वपूर्ण आणि खाजगी माहिती असू शकते. आणि तीच माहिती नको त्या व्यक्तीला समजली तर??? तुम्हाला आलेला इमेल तुमच्या ब्लॅकमेलचे साधन बनला तर?
आता तुम्ही म्हणाल... हा माणूस काय अशुभ बोलतोय? कोण का म्हणून आपले मेल किंवा मोबाईल हॅक करेल? पण आम्हांला फक्त एकच सांगावेसे वाटते की जिथे गाडी पुसण्याचे फडके चोरले जाऊ शकते, तिथे अशा गोष्टी नाही का घडू शकत? नक्कीच घडू शकतात.
आता परत तुम्ही म्हणाल, आम्ही सुरक्षा म्हणून नावाजलेला अँटी-व्हायरस वापरतो. मग आम्ही का म्हणून घाबरायचे? खरे आहे, काही घाबरायचे नाही. पण काळजी घ्यायला काय हरकत आहे? पावसाळ्यात घरून निघताना स्वच्छ उन पडलेले असतानाही आपण बाहेर जाताना सोबत रेनकोट घेतोच ना? का? कारण कधी पाऊस येईल हे सांगता येत नाही. तसेच हॅकिंग चे पण आहे. कधी आपल्या मोबाईलवर, कॉम्प्युटरवर हॅकिंगचा हल्ला होईल हे आज कुणीही सांगू शकत नाही. आणि त्यासाठीच हा आजचा लेख...
तुम्हाला हे माहित आहे का? होणाऱ्या एकूण हॅकिंगच्या हल्ल्यापैकी फक्त ३०% हल्ले हे टेक्निकल असतात आणि ७०% हल्ले हे वापरणाऱ्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे यशस्वी होतात. ते रस्त्याच्या कडेला लिहिलेले असते ना, “नजर हटी, दुर्घटना घटी” हेही काहीसे तसेच. निष्काळजीपणे एखादा क्लिक होतो आणि समोर येतो तो प्रचंड मनस्ताप. आपल्याला टेक्निकल नॉलेज नाही असे समजून ३०% हल्ल्याचाचा विचार केला नाही तरी होणारे इतर ७०% हल्ले तर आपण थोपवू शकतोच की. किमान आपल्या परीने प्रयत्न तर नक्कीच करू शकतो.
अनेकदा असे लक्षात आले आहे की २०% हल्ले हे आपल्याच माहितीच्या व्यक्तीने किंवा त्याच्या मदतीने केले जातात. एखादं भांडण किंवा प्रचंड गैरसमजानंतर तुमचीच जवळची व्यक्ती तुमचा मोबाईल किंवा इमेल हॅक करायला एखाद्या माहितगाराला विनंती करु शकते. हॅक करण्यासाठी लागणारी तुमची खाजगी महिती जवळच्या व्यक्तीकडे असते आणि हॅकिंगसाठी लागणारे स्किल्स त्या माहितगाराकडे. हा माहितगार Ethical Hacker हॅकर असेल तर तो सहसा या गोष्टीला तयार होत नाही. कारण त्याचे परिणाम, त्याची प्रोसिजर या सगळ्या गोष्टी शिकवताना त्याला त्याच्या जबाबदारीचीही शिकवण दिलेली असते. पण जर ती व्यक्ती Script Kiddie म्हणजे नवशिक्या असेल तर त्याच्यासाठी ही त्याचे ज्ञान तपासण्याची संधी असते. काही असो, आता आपला मोबाईल कुणी हॅक करेपर्यंत वाट न पाहता तो होऊ नये म्हणून काय करावे हे माहित असायलाच हवे.
म्हणून त्याआधी मोबाईल हॅक झाला तर समोरची व्यक्ती काय करू शकते याबद्दल थोडेसे.
मोबाईल हॅक करण्यासाठी प्रामुख्याने दोन पद्धती वापरल्या जातात.
१. Midnight Raid :
मोबाईल हॅक करण्यासाठी सगळ्यात जास्त वापरली जाणारी ही पद्धत आहे. यात हॅकरस्वतःच्या मोबाईलवर एक software install करतो. त्यानंतर या सॉफ्टवेअरमधून जो मोबाईल हॅक करायचा असेल त्यावर एक text मेसेज पाठवला जातो. त्या software मधील एक Option Check केलेले असेल तर तो पाठवलेला मेसेज ज्या मोबाईलवर sms केला आहे त्याच्या मेसेज बॉक्समध्ये मात्र दिसत नाही. आणि तो मोबाईल त्या मेसेजला प्रतिसाद देतो. या सगळ्या गोष्टी ज्याच्या मोबाईलवर हल्ला झाला आहे त्या व्यक्तीच्या नकळत घडतात.
एकदा का त्याच्या मोबाईल वरून प्रतिसाद आला की आपोआपच मोबाईलवर नियंत्रण मिळवले जाते. या software मध्ये तुम्ही हॅक केलेल्या मोबाईलवर येणारे आणि जाणारे ईमेल वाचू शकता, पाहू शकता, त्या मोबाईलवर येणारे कॉल ऐकू शकता तसेच स्वतःच्या मोबाईलवर रेकॉर्डही करू शकता. मोबाईल मधील फोटो, व्हिडिओ, व्हॉट्सअॅप मेसेज, फेसबूक मेसेज, मोबाईलचे लोकेशन, मोबाईलमधील संपर्क या सगळ्या गोष्टी पाहू शकता. इतकेच काय पण त्या मोबाईलचा कॅमेरा चालू करून त्या कॅमेऱ्याच्या रेंज मध्ये येणाऱ्या गोष्टी देखील रेकॉर्ड करू शकता. आणि हे सगळे घडते त्या व्यक्तीच्या नकळत. आहे की नाही डेंजर? तुमचाच मोबाईल तुमचीच जासुसी करतो आणि तुमच्या विरुद्ध शस्त्र म्हणून काम करतो.
२. Spy App :
या पद्धतीमध्ये मोबाईलवर एक app install केले जाते. आणि त्यानंतर त्या मोबाईलवर जी कोणती activity होईल ती त्या appच्या मालकाला कळवली जाते. अनेक software / app बनविणाऱ्या कंपन्या काही रक्कम घेऊन असे app बनवून देतात. मुख्यतः आजकाल अनेक पालक आपला पाल्य मोबाईलचा वापर कशासाठी करतो आहे हे माहिती करून घेण्यासाठी या app चा वापर करतात.
या दोन्ही पद्धतीत तुमचा मोबाईल इतरांच्या हातातले बाहुले आणि तुमच्या विरूद्धचे शस्त्र बनलेला असतो. मग आता याला उपाय काय? आहे... उपाय आहे. जसे मोबाईलकडून अशा गोष्टी करून घेणारे app बनलेत तसेच त्या app ला निष्प्रभ करणारे app ही बनले आहेत.
मोबाईल हॅकिंग यशस्वी होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?
सगळ्यात आधी तर तुमचा मोबाईल कुणाच्याही हाती सहसा देऊ नका. समजा द्यावाच लागणार असेल तर स्क्रीनरेकॉर्डर नावाचे app तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्या म्हणजे त्या व्यक्तीने तुमचा मोबाईल हातात घेतल्यावर काय काय केले ते सगळे तुम्ही नंतर पाहू शकता. समजा एखादी व्यक्ती तुमचा मोबाईल हॅक करण्यासाठी Midnight Raid पध्दत वापरत असेल तर त्याला पायबंद घालण्यासाठी तुमच्या मोबाईलवर ‘AppLock’ नावाचे app install करून घ्या. Google Play Store वर हे app तुम्हाला free मिळू शकते. हे app install केल्यावर तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप, फेसबूक, Contact List, फोटो, व्हिडीओ, मेसेज, कॉल या सगळ्या गोष्टी लॉक करू शकता. एखाद्याने तुम्हाला मेसेज पाठवला तरीही जो पर्यंत तुम्ही त्याला प्रतिसाद देत नाही तोपर्यंत तुमच्या मेसेजबॉक्समधून कोणतेही मेसेज जाऊ शकणार नाही. अपोआपच तुमच्या मोबाईलवर होणारा हल्ला निष्प्रभ ठरेल.

समजा तुमचा मोबाईल हॅक करण्यासाठी कुणी दुसरी पद्धत वापरली तर मात्र त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. दुसरी पद्धत वापरण्यासाठी हॅकरला तुमच्या मोबाईलवर त्याचे app install करावे लागणार आहे. अशा वेळी तो तुम्हाला एखादा मेल पाठवू शकतो ज्यात लिहिलेले असेल, दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि बक्षीस जिंका. क्लिक तुम्ही करता आणि बक्षीस तो जिंकतो. अशा वेळी कधीही कोणत्याही मेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. किमान जोपर्यंत आलेला मेल हा माहितगार आणि विश्वासार्ह व्यक्तीकडून आला आहे याची खात्री होत नाही तोपर्यंत तरी कुथेच क्लिक करु नका.
काही वेळेस आपल्या मित्राचे मेल अकाऊंट हॅक झाले असेल तर त्याच्याकडून देखील असा मेल येऊ शकतो, जो त्याच्याही नकळत असेल. अशा वेळी तो मेल डिलीट करणेच जास्त योग्य ठरते. समजा काही कारणाने तुमच्या असे लक्षात आले की आपला मोबाईल हॅक झालेला असू शकतो, त्यावेळी एखाद्या माहितगार व्यक्तीची मदत घ्या. कारण काही वेळेस आपण आपल्याला अनोळखी वाटणारे app डिलीट करतो आणि त्याने आपला मोबाईल व्यवस्थित काम करणे बंद करतो.
आज आपण इथेच थांबू... पुढील लेखात इमेल हॅकिंग आणि त्यावरील उपाय पाहू..
लेखक : मिलिंद जोशी (नाशिक)