कोरोनाग्रस्त असूनही तिने बंगळूरू ते दिल्ली आणि दिल्ली ते आग्रा प्रवास केला? बातमी खरी आहे का?

(प्रातिनिधिक फोटो)
कोरोना रोगाची लागण होऊनही एका नवविवाहितेने बंगळूरू येथून दिल्ली आणि मग आग्र्यापर्यंत प्रवास केला. ही बातमी काही दिवसापासून प्रचंड विनोदाचा विषय बनली आहे. लोकांनी या नवविवाहित स्त्रीला भरपूर ट्रोल केलंय. पण ही बातमी खरी आहे का?
सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी ही बातमी लावून धरली होती, पण आता समजतंय की ही बातमी खोटी होती. मग नेमकं काय घडलंय?
बातमी अशी होती, की गुगलमध्ये काम करणारा बंगळूरुचा इंजिनियर हनिमूनसाठी इटली, त्यानंतर ग्रीस आणि पुढे फ्रान्सला गेला. ७ मार्च रोजी हनिमूनवरून परतल्यावर बंगळूरु येथे त्याची चाचणी करण्यात आली. चाचणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं. बंगळूरूच्या डॉक्टरांनी नवीन जोडप्याला हॉस्पिटलमध्येच थांबण्याचा सल्ला दिला होता, पण डॉक्टरांचं न ऐकता नवरीने तिथून पळ काढला आणि ती दिल्लीमार्गे आग्र्याला आपल्या आईवडिलांकडे गेली.
खरी बातमी काय आहे?
खरी बातमी अशी की दोघेही स्वित्झर्लंड आणि ग्रीसला गेले होते. इटलीला नाही. नवऱ्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं १२ मार्च २०२० रोजी आढळून आलं. बातमीत दिलेली ७ मार्च ही तारीख खोटी होती. दोघेही ८ मार्च रोजी मुंबईहून बंगळूरूला गेले. ९ मार्च रोजी तिने बंगळूरू ते दिल्ली आणि तिथून आग्रा असा प्रवास केला. नवऱ्यामध्ये ९ तारखेला कोरोना रोगाची लक्षणे दिसू लागली. १२ मार्च रोजी झालेल्या चाचणीत त्याला लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
राहिला प्रश्न त्या मुलीचा, तर तिला आग्र्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे स्वच्छता नसल्याने तिने घरीच राहण्याची परवानगी मागितली. तिला तशी परवानगी मिळालीही, पण दुसऱ्याच दिवशी तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या सगळ्या भानगडीत चुकीची बातमी व्हायरल झाली.