computer

जनावरं घाणेरी का खात नाहीत? हे झाड आलं कुठून आणि त्याचे नक्की काय फायदेतोटे आहेत?

मोकळ्या रानावर, रस्त्यांच्या कडेला, कुंपणाजवळ वाढणारं हिरवट बसकट रंगीबेरंगी झुडुप म्हणजे घाणेरी आपल्यापैकी बहुतेकांन सुपरिचित आहे. उग्र दर्प येणारं, रंगीबेरंगी लहान फ़ुलांचा गुच्छ मिरवणारं हे झाडं अनुभवत मागच्या दोन-तीन पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. आश्चर्य वाटेल, पण लँटाना कॅमारा [Lantana camara] असं शास्त्रीय नाव धारण केलेली ही वनस्पती भारतीय नाही. ही घाणेरी अमेरिका आणि पश्चिम अफ्रिकेतून आपल्याकडे आलीय. साधारण दोनेक मीटर्सची उंची गाठणारी ही वनस्पती भारतात शोभेच्या लागवडीसाठी आणली गेली. तशी घाणेरी मूळ उष्णकटिबंधीय प्रदेशातली. त्यामुळे या वनस्पतीला आपल्याकडचं उष्ण वातावरण उत्तम मानवलं. अमेरिकेत बागेत लागवड करण्यात येणारी ही वनस्पती आजमितीस आपल्या स्थानिक वनस्पतींना भारी पडतेय.

बहुतेकांनी या झाडाला अगदी जवळून अनुभवलेलं असतं. याची खरखरीत चरबट पानं, काटे असलेल्या सडसडीत फ़ांद्या या झुडूपाचं ठळक वैशिष्ठ्यच म्हणता येईल. लहान लहान वीसएक फुलांनी मिळुन या फुलाचा एक फुलोरा बनतो. लाल, पिवळे, गुलाबी, पांढरे, केशरी रंगाचे भरपुर फुलोरे ही वनस्पती अंगभर मिरवत असते. याच मुख्य रंगाच्या संकरीत कलमांमधुन नंतर निळे, जांभळे, पांढरे गुलाबी रंग असलेली झुडूपं बनवली गेली. या फुलांखेरीज नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे लँटानाच्या फळांचे घोस. सुरुवातीस सहा सात मिलीमीटर आकाराचे कच्चे हिरवट-पोपटी रंगाच्या बियांचे घोसच्या घोस झाडाला लगडलेले दिसतात. कालांतराने पिकल्यावर हेच घोस काळे बैंगणी रंगाचे होतात. पुर्णपणे सुकल्यावर या घोसातली प्रत्येक बी गळून पडते. 

अनेकांनी लहानपणी घाणेरीची तुरट गोड चवीची फळं खाल्ली आहेत. खरी गंमत इथेच आहे. आपण मारे ही फळं खातो, पण कधी कुठल्या जनावराला ह्या झुडुपाला तोंड लावताना किंवा त्यावर ताव मारताना पाहिलंय का? उत्तर नाही असंच असणार आहे. याचं कारण हे झुडुप विषारी असल्याची उपजत जाणीव त्यांना असते. याच्या फळांमध्ये लँटाडेनी ए आणि बी नावाचे विषारी घटक आढळतात. या व्यतिरिक्त pentacyclic triterpene acids, including reduced lantadene A, dihydrolantadene A, and icterogenin या सारखी अनेक विषारी द्रव्यघटक आढळतात. यांच्या जास्त सेवनाने जनावरांच्या शरीरावर दोनेक दिवसात परिणाम होऊन कावीळ, रक्ती आव, अशक्तपणा, वजन झपाट्याने घटून जनावरं मृत्युमुखी पडल्याच्या घटना अनेक ठिकाणी नोंदवल्या गेल्या आहेत.

या वनस्पतीच्या सेवनाने तोडाला बधीरपणा येणे, फोड येणे, नाका तोंडाची आतली नाजूक त्वचा गळून जाणे सारखे यातनाकारक प्रकार सुरु होतात. अर्थात, घाणेरी कमी प्रमाणात सेवन केली तरी याच प्रकारची अनेक सौम्य लक्षणं दोन तीन आठवडे जनावरांमध्ये दिसत रहातात. घोडे, बैल, गायी, मेंढ्या, म्हशी व इतर हिरवे खाणे खाणाऱ्या प्राण्यांना या वनस्पतीचा त्रास होत असल्याने बहुतांशी  प्राणी ही वनस्पती खाणं टाळतात. 

मध्यंतरी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पात केल्या गेलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला की या विषारी वनस्पतीमुळे वाघांच्या संख्येवर अनिष्ट परिणाम होऊ लागलाय. या अभ्यासात मुख्य मुद्दे काढले गेले की लँटाना ही वनस्पती अतिवेगाने वाढतेच, पण इतर स्थानिक वनस्पतींना ती वाढू देत नाही. याचा परिणाम तृणभक्षकांवर म्हणजेच गवत खाणाऱ्या प्राण्यांवर होतो. त्यांची उपासमार होते. सहाजिकच अन्नाच्या शोधार्थ हे प्राणी स्थलांतर करतात. या स्थलांतरामुळे मांसाहारी प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर अन्नानदशा सुरु होते. नीलगायी, गवे, चितळं, भेकरं ही वनस्पती खात नसल्याने फक्त मुदुमलाईच नाही तर नागरहोळे, बंदीपूर अभयारण्यांमध्येही हीच अवस्था आहे. तिथल्या मांसाहारी प्राण्यांचं नागरी वस्तीकडे वळण्याचं प्रमाण वाढलंय.

दुष्काळाच्या काळात ही वनस्पती नाईलाजास्तव खाऊन मृत झालेल्या प्राण्यांची संख्या अतिशय मोठी आहे. फक्त दक्षिणेकडेच नाही, तर जोडीला उत्तराखंडातील जिम काॅर्बेट राष्ट्रीय उद्यानातही अतिशय बेसुमार अशी पसरलेली ही वनस्पती वनविभागाला त्रासदायक ठरली आहे. २०१९ साली मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या बोटॅनिकल सर्व्हेच्या अंकात नोंदवलं गेलंय की भारतात घाणेरीच्या सात जाती आहेत आणि जंगलांखेरीज सुमारे तेरा लाख हेक्टरहून जास्त चराऊ जमिन ह्या वनस्पतीमुळे बाधित झालीय. 

भारतात साधारण दिडेकशे वर्षांपूर्वी घाणेरी पहिल्यांदा हिमालयात लावली गेली. आता मात्र ही वनस्पती देशात सर्वत्र पसरली आहे. आज हिमालयातल्या अनेक स्थानिक वनस्पती, वनौषधी या लँटानामुळे विस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत. हिमाचल प्रदेशातील सोलन, मंडी आणि हमिरपुर जिल्ह्याला या लँटानाचा सर्वात जास्त फटका बसलाय. अशीच अवस्था शिवालिक टेकड्यांमध्ये झाली असून स्थानिक मेंढपाळ या वनस्पतीच्या त्रासाने हैराण झाले आहेत. जमिनीचा कस घालवून लागवडीचं क्षेत्रफळ कमी करणाऱ्या या वनस्पतीचा आपल्याला उपयोग काय? यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. 

आता कुणालाही हा प्रश्न पडू शकतो की जर ही एवढी त्रासदायक आहे तर तिचं उच्चाटन का करत नाही देशातून? दुर्दैवाने ह्या वनस्पतीच्या वाढीपुढे जगभर भल्याभल्या उपायांनी हात टेकलेत. विविध रासायनिक औषधं, जाळपोळदेखील या वनस्पतीची वाढ खुंटवू शकले नाहीत. हिरव्या झाडांवर पडणारा पांढरा ढेकूण काही अंशी या वनस्पतीला ताब्यात ठेवू शकतो, पण त्या ढेकणाची वाढ आपल्या इतर वनस्पतींना धोकादायक आहे. फुलं येण्याच्या अवस्थेतच तोडल्यास आणि जाळल्यास ह्या वनस्पतीची वाढ काही काळासाठी कमी होते. पण पुन्हा पावसाळ्यानंतर ती वाढते. जेमेतेम फुटकळ सरपण हा उपयोग वगळता बाकी खत म्हणून किंवा पशुपक्षांनाही घाणेरी उपयोगी नाही. अलीकडे काही ठिकाणी फुलपाखरू उद्यानांत फुलपाखरांसाठी घाणेरीची लागवड करण्यात आलीय. पण त्याचा इतरांना काय फायदा आहे का? हे देखील पाहिलं पाहिजे. टणटणी उर्फ घाणेरी उर्फ कामुणी उर्फ लँटाना जगभर विषारी तण म्हणूनच ओळखलं जातंय. ते नष्ट होणार नाहीय, पण त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल याचं विचारमंथन जगभर सुरू आहे.

 

लेखिका : रुपाली पारखे - देशिंगकर