computer

चिनीमातीच्या बरण्या खरंच चीनमधून येतात, की भारतात बनतात? जाणून घ्या यामागची खरी कहाणी!

चीनी मालावर आणि इतर गोष्टींवर बहिष्कार टाकण्यावरुन आजकाल बऱ्याच चर्चा झडत आहेत. त्यात मग चायनीज ॲप्स, स्वस्त वस्तू, मोबाईल, खाद्यपदार्थ आले आणि मग चीनी मातीच्या बरण्याही. म्हणून आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला की या चीनी मातीच्या बरण्या खरंच चीनी आहेत की कसे? आणि उत्तर भारी इंटरेस्टिंग आहे भाऊ.

चिनी मातीची भांडी या शब्दातील चीनचा आणि या भांड्यांचा घनिष्ठ संबंध आहे हे तर उघडच आहे. पण चिनी मातीची भांडी हा खरोखर चीनची निर्मिती आहे हे सुद्धा तितकेच खरे आहे. चीनमध्ये सर्वप्रथम इसवीसन २५ ते २२० दरम्यान चिनी माती सापडल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला चीनच्या दक्षिणेकडील चेच्यांग प्रांतात याचे उत्पादन होत असे. नंतर ते उत्तरेकडे सरकले. पण दक्षिण ते उत्तर असा प्रवास करत असताना त्यात मोठी प्रगती झाली आणि ती प्रगती होती चिनी मातीपासून भांडी तयार व्हायला लागली. म्हणजे आजपासून तब्बल 2 हजार वर्षांपासून चिनी मातीची भांडी वापरात आहेत.

सुरुवातीला चिनी मातीची भांडी आशियात निर्यात केली जात होती. पण पोर्तुगालने नविन समुद्री मार्ग शोधल्यावर ही भांडी युरोपात सुद्धा जायला लागली. १७ व्या शतकात युरोपातले अनेक राजमहाल चिनी मातीच्या भांड्यांनी सजलेले दिसत असत. पुढे अगदीच कमी काळात या भांड्यानी युरोपात प्रचंड लोकप्रियता मिळवली. १८ व्या शतकात जवळपास १० लाख भांड्यांची निर्यात चीन करू लागला होता. आता चीनवरून येणारी भांडी म्हणून साहजिक त्यांना चिनी मातीची भांडी हे नाव पडले. आणि पुढे तेच नाव जगभरात रूढ झाले.

आता तुम्ही म्हणत असाल मग भारतात दिसणारी चिनी मातीची भांडी पण चीनमधून येतात का? तर उत्तर आहे नाही!! कारण भारतात चिनी माती मुबलक प्रमाणात मिळते. बिहारमधील राजमहाल टेकड्या, पथरपट्टा नावाचे ठिकाण, दिल्ली जवळील काही टेकड्या तसेच केरळमधील त्रिवेंद्रम जवळ खूप चांगल्या प्रतीची चिनी माती सापडते. राजस्थान, आंध्रप्रदेश, आसाम, पंजाब येथे चिनी माती सापडते. एवढंच काय, आपल्या कोल्हापूरात देखील चिनी माती सापडते.

आता ही भांडी भारतात कुठे बनतात ते बघू. दिल्लीपासून ९० किलोमीटरवर उत्तर प्रदेशात एक छोटं शहर आहे. खुर्जा असे त्याचे नाव!! या शहरात अनेक प्रकारची चिनी मातीची भांडी तयार केली जातात. सजावट केलेली भांडी सुद्धा इथेच तयार केली जातात. भारतात हे शहर चिनी मातीच्या भांड्यांसाठी सर्वात प्रसिद्ध मानले जाते. या गावातला खुर्चन नावाचा खाद्यपदार्थ आणि चिनी मातीची भांडी, दोन्हीही तितकीच लोकप्रिय आहेत.

आता या खुर्जाला भांडी बनण्याच्या दोन कहाण्या सांगितल्या जातात. एक आहे अफगाणचा राजा तैमुर लंगचे जेव्हा या भागावर राज्य होते तेव्हा त्याने इजिप्शियन आणि सीरियन भांडी सोबत आणली होती. आणि दुसरी कथा सांगितली जाते ती अशी की, मुगल काळात या ठिकाणी भांडी बनायला सुरुवात झाली. याव्यतिरिक्त असेपण म्हटले जाते की इथे जी भांडी बनतात त्याला कुठलीही ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही.

एक पुस्तक आहे 'पॉटरी- मेकिंग कल्चर्स अँड इंडिअन सिविलायजेशन' नावाचे त्यात नमूद केले आहे की अशा प्रकारचे भांडी बनविण्याचे खुर्जा हे सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक आहे. त्यात अजून असेही म्हटले आहे की इथले कारागीर स्वतःला मुलतानी कुंभार म्हणवतात याचा अर्थ याचा उगम पाकिस्तानातील मुलतान शहरात सुद्धा असु शकतो. 

सध्याचा भांडी बनविण्याचा व्यवसाय हा 1940 च्या दशकात बहरला. उत्तर प्रदेश सरकारने 1942 साली फॅक्ट्री उभी केली पण हवी तशी गुणवत्ता नसल्याने ती 1947 साली बंद पडली. 1952 साली त्याच जागेवर या भांड्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सेंटर उभे केले गेले. 

तेव्हापासून आजवर अनेक प्रकारचे प्रयोग येथे करण्यात आले. आणि त्याचमुळे खुर्जा आज देशात तसेच जगातील स्तरावर चिनी मातीची भांडी निर्यात करणारे एक प्रमुख केंद्र म्हणून तयार झाले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required