computer

फेसबुकवरच्या प्रँकमुळे तीन जीव गेले. केरळमधली ही घटना सिनेमासारखी असली तरी दुर्दैवाने खरी आहे.

सोशल मिडीया हे एक मोहमयी जग आहे. इथे खोटी ओळख, प्रसिद्धी मिळाल्याने अनेकजण या जगात अडकून जातात. सोशल मिडीयाचा उपयोग चांगली माहिती घेण्यासाठी, नवनवे शिकण्यासाठी केला तर ठीक आहे, नाहीतर हेच कारण एखाद्याच्या मृत्यूचे कारणही बनते. आज आम्ही अशीच एक सत्यकथा सांगणार आहोत ज्यामध्ये एका सोशल मीडियावर केलेल्या प्रँकमुळे तीन जणांचा बळी गेला. ही घटना केरळच्या कोल्लम जिल्ह्यातल्या कल्लुवाथुक्कल गावात घडली. या तीन जणांमध्ये एका नवजात अर्भकाचा हकनाक बळी गेला.

५ जानेवारीच्या सकाळी ५५ वर्षीय सुदर्शनन पिल्लई नेहमीप्रमाणे गावात फेरी मारून आले. तर घरी आल्यावर त्यांच्या धाकटी मुलगी रेश्मा (वय २२) ही एका बाळाला हातात घेऊन आत आली. ते बाळ तिला घराशेजारी कोरड्या पानांच्या ढिगाऱ्यात दिसले होते. रेश्माने ते बाळ तिचा नवरा विष्णू आणि वडिलांना दाखवले. ते अर्भक त्यावेळी जिवंत होते. गावात नवजात अर्भक सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पुढच्या अर्ध्या तासात एक रुग्णवाहिका आली आणि अर्भकाला घेऊन जवळच्या परिपल्ली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणि नंतर तिरुअनंतपुरममधील एका खाजगी रुग्णालयात गेली. पण त्या संध्याकाळीच ते बाळ दगावले. रात्रभर पानांच्या ढिगाऱ्यात पडल्याने संसर्ग झाल्यामुळे ते बाळ मरण पावले.

पोलीसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पिल्लईच्या घरी पोलिस श्वान पथकाच्या साहाय्याने शोध घेऊ लागले. बाळाला सोडून गेलेल्या व्यक्तीची शोधमोहीम सुरू झाली. नवजात अर्भक सापडलेल्या जागेजवळ केलेल्या सेल-फोन कॉलचे टॉवर ट्रॅक करण्यात आले. जवळच्या परिसरात गर्भवती महिलांचा शोध घेण्यासाठी कार्यकर्ते बोलवण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करण्यात आला. जवळपास प्रसूती झाली असेल तर त्याची चौकशी सुरू झाली. परंतु यात संशयास्पद काहीही आढळले नाही. शेवटी पोलिसांनी स्थानिक दंडाधिकार्‍यांकडून त्या परिसरातील संशयित महिलांकडून रक्ताच्या नमुने घेतले. हे नमुने बाळाबरोबर मॅच करण्यासाठी डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले. डीएनए चाचणी निकाल यायला जरा उशीरा झाला. पण जेव्हा सत्य कळले तेव्हा पोलिसांसह सगळयांनाच धक्का बसला.

पोलीस तडक पिल्लईच्या घरी आले आणि त्यांच्या मुलीला म्हणजे रेश्माला तिच्या नवजात मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली.डीएनए चाचणीच्या निकालात ते मूल रेश्मा आणि तिचा नवरा विष्णू यांचेच होते.आणि त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे रेश्मा गरोदर असल्याची माहिती तिचे वडील आणि खुद्द विष्णूलाही नव्हती. त्यामुळे विष्णूसह सर्व कुटुंब स्तब्ध झाले. २२ जूनला तिला अटक झाली. पुढे चौकशी सुरू झाली आणि अनेक धक्कादायक खुलासे झाले.

कोठडीत असताना पोलिसांच्या धाकाने रेश्माने कबूल केले की तिचा फेसबुक मित्र आनंदू या व्यक्तीसोबत पळून जाण्यासाठी तिने आपल्या नवजात मुलाला मारून टाकले होते. हे ऐकून विष्णूच्या पायाखालची जमीन सरकली. ४ जानेवारीला तिने बाळाला जन्म बाथरूममध्ये जन्म दिला आणि शेजारी बागेत सोडून दिले.

परंतु या हत्येला नवे वेगळे लागले जेव्हा अटक झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी विष्णूच्या कुटुंबातील दोन तरुणींनी नदीत उडी मारून आत्महत्या केल्या. या दोन तरुणी म्हणजे विष्णूच्या मोठ्या भावाची बायको २३ वर्षीय आर्या आणि विष्णूच्या बहिणीची मुलगी २२वर्षीय ग्रीष्मा. पोलिसांनी या दोघींच्या आत्महत्येचा आणि रेश्माच्या अटकेचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू केला. तसेच रेश्माचा मित्र आनंदू याचाही शोध सुरू झाला.

रेश्माचे नवऱ्याशी काही भांडण झाले होते का याची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिचे वडील म्हणाले, "रेश्मा आणि विष्णू एकदा भांडलेले आठवतात. रेश्मा खूप वेळ फेसबुकवर घालवायची. विष्णूने तिला समज दिली. पण एक दिवशी ती चॅट करत होती म्हणून त्याने तिच्या हातातला फोन हिसकावला आणि आपटला. तेव्हा त्यांचे भांडण झाले! रेश्माच्या फेसबुक वर कोणी मित्र आहे याची कल्पना मला नव्हती."रेश्माने गरोदर असल्याची बातमी लपवली याचे सगळ्यांना आश्चर्य वाटले. पोट लपवण्यासाठी ती घट्ट पट्टा बाधत होती, तसेच त्यावरुन बॉडी शेपर बेल्ट लावायची. त्यामुळे तिचे पोट दिसून येत नसे. तिने याआधीही गरोदर असल्याची बातमी लपवली होती. ती लग्नाआधी गरोदर होती. विष्णूने मागणी घातल्यावर त्यांचे लग्न करून द्यावे लागले. तेव्हा ती विष्णूपासून ४ महिन्यांची गरोदर होती. ती मुलगी आता ४ वर्षांची आहे.

पोलिसांनी आनंदूचा शोध घेतला. त्यांनी त्याचे फेसबुक प्रोफाइल पाहिले, त्यांचे मेसेज ट्रेस केले पण कोणीही आनंदू नावाची व्यक्ती सापडली नाही. रेश्मा आणि आनंदूने अनेक मेसेज एकमेकांना केले होते. त्यांनी भेटायचेही ठरवले होते, पण विष्णूला कुणकुण लागल्याने रेश्माला पाठवले नाही. रेश्मा आणि आनंदू हे भेटल्याचा काही पुरावा आढळला नाही. CCTV पाहणी आणि चौकशी सुरू होती, पण आनंदूचा शोध लागला नाही.

कोल्लम शहराजवळील इथिकारा नदीमध्ये आर्या आणि ग्रीष्माने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्याआधी पोलिसांनी आर्याला चौकशी साठी बोलावले होते, पण ती आली नव्हती. पण या दोन्ही आत्महत्येनंतर आर्याची चिठ्ठी सापडली आणि बऱ्याच गोष्टी उलगडल्या. तिने लिहिले होते," मला कधीही जाणूनबुजून कोणाची फसवणूक करायची नाही. ती (रेश्मा) इतकी बदमाश आहे हे मला कळले नाही. कृपया माझ्या मुलाची चांगली काळजी घ्या. रणजीतसोबत माझे आयुष्य मी पूर्ण करू शकले नाही. पण एका अर्भकाच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली हे मला सहन होत नाही. कृपया मला माफ करा.”

यावरून रेश्माच्या बाळाला फेकण्यात मदत करण्यात आर्या आणि ग्रीष्माचा हात असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला. कुटुंबाशी बोलल्यावर कळले की या तिघींचे चांगले संबंध होते. पण यानंतर झालेल्या चौकशीमुळे या घटनेला स्फोटक वळण मिळले.

ग्रीष्माच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की या दोघींनी प्रँक किंवा गंमत म्हणून फेसबुकवर आनंदू नावाने खोटे प्रोफाइल बनवले आणि रेश्माला खोट्या, आभासी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आनंदू खरोखर आहे असे रेश्माला वाटले म्हणून तिने त्याच्याबरोबर पळून जायचा विचार केला. प्रेमात बाळाचा अडसर होईल म्हणून त्याला मारून टाकले. ग्रीष्माची मैत्रीण सांगते की या दोघींना रेश्मा गरोदर आहे याची माहिती नव्हत्ती. पण जेव्हा रेश्माला अटक झाली तेव्हा या दोघी घाबरल्या. त्यांना आपली चूक कळली. आत्महत्येच्या आदल्या दिवशी आर्याने आपल्या सासूला सांगितलेही होते की आमच्याकडून खुप मोठा गुन्हा घडला. पण त्या दोघी आत्महत्या करतील याची कल्पना आली नव्हती.

सोशल मीडिया प्रँकचे असे घातक परिणाम होऊ शकतात या कल्पनेने दोन्ही कुटुंबे हादरली आहेत. आपल्या कुटुंबात असे काही होईल असा त्यांनी कधी विचारही केला नसेल. रेश्मावर आयपीसीच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिला लवकरच शिक्षा होईल.

फेसबुकच्या मोहमयी जगात होणाऱ्या ओळखी आणि तिथले पाहून केलेले प्रँक्स किती घातक होऊ शकतात हे या घटनेतून स्पष्ट होते.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required