computer

गौहर जान - आजच्या एक कोटी रुपयांइतके मानधन घेणारी देशातील पहिली ''रेकॉर्डिंग सुपरस्टार''!!!

आज भारतीय संगीताने अख्या जगाला भुरळ घातली आहे.जागतिक प्रसिद्धीमुळे संगीत क्षेत्रात मोठ्या  प्रमाणात आर्थिक उलाढाली होऊ लागल्या आहेत आणि त्यामुळेच अनेक कलाकार लाखो रुपये मानधन कमवत आहेत.गायकांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने आणि त्यांच्या नावानेच अनेक गाणी चार्टबस्टर गाण्यांचा यादीत स्थान पटकावतात. श्रेया घोषाल,अरजीत सिंग,सुनीधी चौहान असे बरेचसे प्रसिद्ध गायक हे सहज २० - २५ लाखांच्या घरामध्ये मानधन घेतात.
पण आज आपण वाचू या अशा गायिकेची कथा जी तिच्या जमान्यात घेत असलेले मानधन आजच्या एक कोटी रुपयाइतकेच होते.

तिचं नाव होत "गौहर जान".२६ जून १८७३ रोजी उत्तर प्रदेशातील आझमगड नावाच्या एका छोट्याश्या गावात गौहर जान यांचा जन्म झाला.तिचे वडील इंग्रज आणि आई आर्मेनियन होती,ती धर्माने ख्रिश्चन होती आणि जन्माच्यावेळी ठेवलेले नाव होते अँजेलिना योवर्ड .ती सहा वर्षाची असताना पालकांचा घटस्फोट झाला, त्यानंतर  आईने तिला बनारसला आणले,तिथे तिने शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे प्रशिक्षण त्याकाळच्या महान उस्तादांकडून घेतले. १८८३ मध्ये दोघीही कोलकात्याला आल्या, घटस्फोटानंतर आईने आणि तिने  इस्लाम धर्म स्वीकारला आणि अँजेलिना योवर्डचे नाव झाले गौहर जान !!!

भारतीय संगीतात इतिहास रचवणाऱ्या ह्या गायिकेचे आयुष्य हे संघर्षमय होते,तिचे बालपण वेश्यागृहात गेले.वयाच्या तेराव्या वर्षीअतिप्रसंगाला सामोरे जावे लागले, जवळ्याच्या सगळ्याच लोकांनी तिला फसवले. त्या काळी करोडपती असणारी ही गायिका आयुष्याच्या शेवटी कफल्लक अवस्थेत गेली.

गौहर जान खूप शिक्षित होती.तब्बल वीस भाषा तिला अवगत होत्या .ठुमरी, धृपद, खयाल आणि बंगाली भजनात पारंगत होती.बंगाली, हिंदी, गुजराती, मराठी, तामिळ, अरेबिक,पर्शियन,पुश्तो , फ्रेंच आणि इंग्लिश अश्या अनेक भाषेत एकून ६०० गाणी रेकॉर्ड केली.त्या काळात जेव्हा सोनं २० रुपये तोळे मिळत असे तेव्हा त्या काळात  ती १०१ मोहरा घेतल्यावरच कार्यक्रम सुरु करत असे, ज्याचे आजच्या काळानुसार मूल्य एक करोडपेक्षाही जास्त होते.कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी सुध्दा पूर्ण रेल्वे खास त्यांच्यासाठी दिली जात असे.कार्यक्रमात एकदा वापरलेले सोने चांदीचे दागिने, कपडे ती पुन्हा वापरत नसे.फक्त शाही परिवार आणि राजे महाराजे ह्यांचा दरबारात ती गाणे गात असे आणि हे राजे त्यांना हिरे, दागदागिने बक्षीस म्हणून देत असत

सर्वसामान्यांना त्यांचे गाणे ऐकणे हे एक स्वप्नवत होते.एका प्रसिद्ध ग्रामोफोन रेकॉर्डिंग कंपनीने त्यांचा गाण्याची रेकॉर्डिंग करून सर्व सामान्यांना उपलब्ध करून दिली, गौहर जान भारतातील पहिली कलाकार होती जिचे गाणे रेकॉर्ड केले गेले. त्या काळी एका रेकॉर्डिंग साठी तब्बल ३००० रुपये मानधन घेत होत्या, त्यामुळे त्यांचे नाव त्या वेळीच्या करोडपती लोकांमध्ये घेतले जाऊ लागले. तिच्या रेकॉर्डिंग्सने भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास बदलला.अशी होती भारतातील एकमेव करोडपती गायिका -देशातील पहिली ''रेकॉर्डिंग सुपरस्टार''!!!

बर्‍याच कलाकारांना पैसे कमावता येतात पण जमवता येत नाहीत.गौहर जानच्या पैसे उधळण्याच्या सवयीवर अनेक किस्सी ऐकायला मिळतात. तिच्या आवडत्या मांजरीच्या लग्नावर त्या काळी तिने १२०० रुपये खर्च केले असे म्हणतात. काही कथा अशाही आहेत की त्याच मांजरीने पिल्ले दिली तेव्हा तिने २०००० र्उपये खर्च केले. परिणामी जे व्हायचे तेच झाले. हळूहळू ती कंगाल होत गेली. अर्थात कंगाल होण्याचे दुसरे कारण म्हणजे तिचे खाजगी आयुष्य !!

 

 

 शेवटी ती एक 'तवायफ'होती.'ठेवता येईल अशी बाई' असेच तिचे सामाजिक स्थान होते. त्यामुळे तिचे खाजगी आयुष्यही तसेच होते.अनेक पुरुषांशी तिचा 'घरोबा' होता. सुरुवातीला बंगाली जमीनदार निर्मल सेन सोबत ती राहत होती.निर्मल सेनने तिच्यावर किती पैसे उधळले याची काही गणतीच नाही. नंतर तिने आपल्या तबलजी सोबत-सैय्यद गुलाम अब्बास सोबत लग्न केलं पण तेही फार काळ टिअक्ले नाही. त्याने सूडापोटी इतके खटले दाखल केले की उरलेल्या आयुष्यात तिची संपंत्ती कोर्टकज्ज्यातच वाया गेली. त्याच दरम्यान एका गुजराथी व्यापार्‍यासोबत तिचे जमले पण ते ही टिकले नाही. आधी दरभंगा मग रामपूर ,काही काळ मुंबईत अशी एका राजदरबारातून दुसर्‍या राजदरबारात ती राजगायीका म्हणून फिरत राहिली.  शेवटच्या काळात मैसूरचे राजे कृष्णदेव वडियार यांच्या दरबारात गात होती पण ते ही जेमतेम दिड वर्षे कारण याच दरम्यान तिचा मृत्यू झाला.
दैव देतं आणि कर्म घेऊन जातं हेच शेवटी खरं !

लेखिका -सपना परब.