computer

चीन आजही ज्यांचे आभार मानतो ते डॉक्टर कोटणीस होते तरी कोण?

कोरोनाव्हायरसच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी भारत चीनला मदत करत आहे. भारताच्या मदतीबद्दल चीनी राजदूत सून वेडूंग यांनी भारताचे आभार मानले आहेत. त्यांनी आभार मानताना एका मराठी माणसाचं नाव घेतलं. हा मराठी माणूस म्हणजे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. त्या म्हणाल्या की मला द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याची आठवण आली.

हे डॉ. द्वारकानाथ  कोटणीस नक्की कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. भारतात डॉ. कोटणीस हे नाव फारसे  परिचित नसले तरी चीन त्यांना कधीही विसरू शकत नाही. आजही चीनी नागरिक कोटणीस यांचे आभार मानतात. यानिमित्ताने डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे कोण होते हे प्रत्येक मराठी माणसाला सांगणं गरजेचं आहे, त्यासाठीच हा लेखप्रपंच.

डॉ. कोटणीस १० ऑक्टोबर १९१० साली सोलापूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. ते ८ अपत्यांपैकी एक होते. त्यांनी मुंबईच्या सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीचं शिक्षण घेतलं.  डॉ. कोटणीस यांच्या कार्याला सुरुवात झाली ती १९३८ सालच्या दुसऱ्या चीन-जपान युद्धाच्यावेळी. युद्धाचं पारडं जपानच्या बाजूना झुकलेलं होतं. जपानने चीनवर पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं. चीनचा लढा सुरूच होता, पण चीनी सैनिकांना वाचवण्यासाठी वैद्यकीय मदत कमी पडत होती. म्हणून त्यावेळचे कम्युनिस्ट जनरल झु दे यांनी जवाहरलाल नेहरू यांना विनंती करून डॉक्टरांची एक टीम तातडीने चीनला रवाना करण्याची विनंती केली. त्यावेळी सुभाषचंद्र बोस हे कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी ३० जून १९३८ रोजी लोकांना आवाहन करून ५ सदस्य असलेली डॉक्टरांची टीम तयार केली. या टीमसोबत एक रुग्णवाहिका आणि एकूण २२,००० रुपये देण्यात आले.

चीनला वैद्यकीय मदतीची गरज आहे ही बातमी समजल्यानंतर डॉ. कोटणीस यांनी आईवडिलांना चीनला जाण्याची परवानगी मागितली. त्यांना सुरुवातीपासूनच जगातील वेगवेगळ्या भागात जाऊन डॉक्टरीचं काम करायचं होतं. त्यांना पहिलीच संधी मिळाली ती चीनमध्ये जाण्याची. त्याकाळी सामान्य माणसाला चीनी रेशीम कापड यापलीकडे चीनबद्दल फारशी माहिती नव्हती. तरी डॉ. कोटणीस यांच्या वडिलांनी तशी परवानगी दिली. मुलगा युद्धक्षेत्रात एवढ्या लांबवर जाणार म्हणून आई मात्र दुःखी होती. 

चीनला वैद्यकीय मदत करणारा भारत हा पहिला आशियाई देश होता. या टीमचं स्वागत करायला स्वतः माओ झेडाँग उपस्थित होते. पुढे डॉ. कोटणीस हे माओ झेडाँग यांच्या नेतृत्वाखालील तुकडीत सामील झाले.  डॉ. कोटणीस यांच्यावर ऐन युद्धभूमीवर वैद्यकीय मदत पुरवायची जबाबदारी होती. हे काम अत्यंत कठीण होतं. माओ झेडोंग यांच्या सैन्य तुकडीसोबत ते चीनच्या उत्तरेला वूताई पर्वत क्षेत्रात गेले. युद्धाच्यावेळी सैनिकांवर उपचार करताना नेहमीच औषधे कमी पडत. १९४० साली जपानसोबतच्या दीर्घकाळ चाललेल्या युद्धानंतर तर डॉ. कोटणीस यांनी विश्रांती न घेता तब्बल ७२ तास शस्त्रक्रिया केली. या दरम्यान त्यांनी ८०० जखमी सैनिकांवर उपचार केले.

यानंतर डॉ. कोटणीस यांना बेथूने इंटरनॅशनल पीस हॉस्पिटलचं डायरेक्टरपद देण्यात आलं. १९४० साली त्यांची भेट गुओ किंगलान या नर्ससोबत झाली. तोवर डॉ. कोटणीस यांना चीनी(मँडरीन) लिहिता आणि वाचता येत होती. एवढ्या कमी वेळात चीनी शिकलेला माणूस बघून गुओ किंगलान या प्रभावित झाल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी १९४१ साली लग्न केलं. त्यांनी आपल्या मुलाचं नाव यीनहुआ ठेवलं. यीन म्हणजे भारत आणि हुआ म्हणजे चीन.

दुर्दैवाने त्यांचं लग्न आणि मुलाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. १९४२ साली डॉ. कोटणीस यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूला त्यांचच खडतर काम कारणीभूत ठरलं होतं. यीनहुआच्या जन्मानंतर अवघ्या ३ महिन्यांनी त्यांचा फेफरे आल्याने मृत्यू झाला. ते हयात असताना अनेक चीनी लोक त्यांचे आभार मानायला यायचे. ते गेल्यानंतरही  लोक त्यांना विसरले नाहीत. २००५ चं उदाहरण घ्या. चीनमध्ये पूर्वजांची आठवण काढण्यासाठी किंगमिंग महोत्सव साजरा केला जातो. २००५ च्या किंगमिंग महोत्सवाचावेळी सामान्य चीनी जनतेने डॉ. कोटणीस यांचं थडगं संपूर्णपणे फुलांनी झाकलं होतं. २०१४ साली शी जिनपिंग यांनी भारत भेटीत डॉ. कोटणीस यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

यानिमित्ताने व्ही शांताराम यांच्या ‘डॉ. कोटणीस की अमर  कहानी’ चित्रपटाचा उल्लेख केलाच पाहिजे. हा चित्रपट डॉ. कोटणीस यांच्या आयुष्यावर आधारित होता. डॉ. कोटणीस यांच्या भूमिकेत स्वतः व्ही.  शांताराम होते. हा चित्रपट तुम्ही युट्युबवर पाहू शकता.

तर, या अज्ञात हिरोला जसे चीनी नागरिक विसरलेले नाहीत तसेच आपणही विसरू नये एवढंच वाटतं.

सबस्क्राईब करा

* indicates required