computer

हा माणूस 'पोपाय दि सेलर मॅन' ची प्रेरणा होता? काय आहे पोपायची जन्मकथा?

आपल्या लहानपणच्या आठवणीत ‘पोपाय दि सेलर मॅन’ला वेगळं स्थान आहे. पालक खाऊन त्याचे वाढणारे ‘डोले-शोले’ तर मुलांमध्ये खास प्रसिद्ध होते. मेथी म्हटलं की नाक मुरडणारी पोरं पालक चवीने खायची. कार्टून नेटवर्कच्या सुवर्णकाळात ज्या मोजक्या कार्टून्सनी आपल्या मनावर राज्य केलं त्यात पोपाय पहिल्या पाचांत येतो. हो की नाही?

असं म्हणतात की हा पोपाय एका खऱ्याखुऱ्या व्यक्तीपासून प्रेरित होता. हा पहा खऱ्या पोपायचा फोटो. 

आहे की नाही हुबेहूब? पण थांबा, इंटरनेटच्या जमान्यात लगेच विश्वास ठेवायचा नसतो. आम्ही या फोटोबद्दल माहिती शोधली असता आमच्या हाती काय काय लागलं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर पोपायच्या जन्मकथेच्या मुळाशी जाऊया.

फोटोत दिसणारा गडी अगदी हुबेहूब पोपायसारखा दिसतोय, पण या व्यक्तीपासून पोपाय कार्टूनची निर्मिती झालेली नाही. पोपायचे जन्मदाते इ. सी. सेगर यांनी १९१९ साली म्हणजे आजपासून सुमारे १०१ वर्षापूर्वी पोपायची निर्मिती केली. अमेरिकेच्या चेस्टर येथे सेगर यांचं बालपण गेलं. असं म्हणतात की या भागात राहणारा फ्रँक “रॉकी” फिजेल’ या व्यक्तीला बघून सेगर यांनी आपला पोपाय तयार केला.

(इ. सी. सेगर)

फ्रँक उर्फ रॉकी हा कोणी सेलर म्हणजे नाविक नव्हता. तो पालकही खात नव्हता. उलट तो भरपूर दारू घ्यायचा. तो मूळचा पोलंडचा होता. अमेरिकेत तो आपल्या आईसोबत राहायचा. तो जॉर्ज गुझ्नी सलूनमध्ये पार्टटाईम नोकरी करायचा. त्याचा रोजचा दिनक्रम म्हणजे काम संपल्यानंतर भरपूर बिअर प्यायची आणि खुर्चीवर पाईप ओढत झोपी जायचं. शाळकरी मुलांसाठी रॉकी म्हणजे आयतं कोलीत होता. मुलं त्याला त्रास द्यायची. रॉकीला प्रचंड राग यायचा, पण तो त्यांना पकडायला जाणार तोवर मुलं लांब पळून गेलेली असायची. 

त्याच्या अंगभूत शक्तींमुळे त्याला रॉकी हे नाव मिळालं होतं. त्याचं वर्णन करताना म्हटलं जातं, की तो उंचापुरा होता. पोपायप्रमाणे त्याचीही हनुवटी जाड होती. त्याच्या तोंडात सतत पाईप असायचा. आणि मुख्य म्हणजे तो सतत हाणामारीच्या तयारीत असायचा.

सुरुवातीला दिलेल्या फोटोसोबत ‘फ्रँक “रॉकी” फिजेल’ हे नाव दिलं जातं, पण फोटोत दिसणारी व्यक्ती ही एक साधारण नाविक आहे. हा फोटो आजही इम्पेरीयल म्युझियममध्ये पाहायला मिळतो. फोटोसोबत त्या व्यक्तीचं नाव दिलेलं नाही. 

तर आता पुन्हा एकदा खऱ्या पोपाय म्हणजे आपल्या रॉकीकडे वळूया. 

रॉकीला आयुष्यभर माहित नव्हतं की पोपाय हे प्रसिद्ध पात्र त्याच्यावरून प्रेरित आहे. मृत्युच्या ९ वर्षापूर्वी म्हणजे १९३८ साली त्याला याबद्दल माहिती मिळाली. योगायोगाने त्याचवर्षी सेगर यांचा मृत्यू झाला.

चेस्टर येथे २४ मार्च १९४७ रोजी रॉकीचं निधन झालं. त्यावेळी तो ७९ वर्षांचा होता. त्याच्या निधनानंतर १९७९ साली कार्बोन्डेल वर्तमानपत्रात त्याच्याबद्दल माहिती छापून आली होती. त्यावेळी या अस्सल पोपायचा अस्सल फोटोही छापून आला होता. वर्तमानपत्राच्या उजव्या कोपऱ्यात पाहा.

असं म्हणतात की हा फोटो ज्या क्षणी घेतला त्यावेळी रॉकी इतरांना पोपायचं पात्र आपल्यावरून प्रेरित आहे हे अभिमानाने सांगत होता.  

तर मंडळी ही होती खऱ्याखुऱ्या ‘पोपाय दि सेलर मॅन’ची गोष्ट. पोस्ट आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required