computer

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडात काय लोच्या झाला आहे? त्याचा ग्राहकांच्या गुंतवणूकीवर काही परिणाम होणार आहे का?

डोळे मिटून म्युच्युअल फंडात पैसे टाका, बँकेच्या एफडीत मिळून काय मिळणार? त्यापेक्षा म्युच्युअल फंडात पैसे ठेवा, म्युच्युअल फंड म्हणजेच भविष्यातील गुंतवणूक.. हे तुम्ही ऐकत असताच आणि पगारातील ठराविक रक्कम एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात जमा करत असताच. शेअर बाजार वरखाली जाणार आणि परतावा कमीजास्त मिळणार हे पण आपल्याला माहिती असते. पण पीक आहे तिथे तण आहेच. तसंच म्युच्युअल फंडात इमानदारीत काम करणारी माणसं आहेत, तशी बेईमान पण आहेतच. किंवा आज इमानदार असलेली माणसं उद्या बेईमान होऊ शकतात. असंच काही अ‍ॅक्सिस बँकेच्या म्युच्युअल फंडात घडलंय आणि त्यांनी दोन वरिष्ठ फंड मॅनेजरची ताबडतोब हकालपट्टी केली आहे.

आता हे मॅटर आणखी उलगडून सांगायच्या आधी महत्वाच्या सूचना वाचा. एक म्हणजे, या गैरव्यवहाराचा बँकेशी थेट असा काही संबंध नाही. म्हणूनच धावत जाऊन खाते बंद करण्याची आवश्यकता नाही. दुसरे असे की जे घडले आहे त्यामुळे सगळ्याच योजना डब्यात जाणार आहेत असं समजण्याची आवश्यकता नाही.

थोडक्यात 'आभाळ पडलं,पळा रे पळा' असं काहीही नाही. पण सतर्क गुंतवणूकदाराला काय माहिती असावे ते या लेखात सांगणार आहोत. 

म्युच्युअल फंडांची जी गुंतवणूक असते त्याला अ‍ॅसेट म्हणतात. या अ‍ॅसेटचा विचार केला तर अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड हा सर्व म्युच्युअल फंडात सातव्या क्रमांकावर आहे. त्यांच्या हातातील अ‍ॅसेट ज्याला (AUM) म्हणतात त्याची किंमत १.३४ लाख कोटी आहे. हे सगळे अ‍ॅसेट वेगवेगळ्या स्किमचे असतात. प्रत्येक स्किममध्ये जमा झालेले पैसे त्याच स्किममध्ये अ‍ॅसेटच्या स्वरुपात असतात. एका स्कीमचे अ‍ॅसेट दुसर्‍या स्कीममध्ये जात नाहीत. थोडक्यात ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात जात नाही. प्रत्येक स्कीमच्या पैशाचे व्यवस्थापन करण्यासाठी फंड मॅनेजर असतो. त्याच्या मदतीला अ‍ॅनालिस्ट आणि इतर कर्मचार्‍यांची टीम असते. फंड मॅनेजरच्या हुशारीवर स्कीम चालत असते. त्यामुळे स्किमची सूत्रं फंड मॅनेजरच्या हातात असतात. 

आता झालंय असं की अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने विरेश जोशी आणि दिपक अग्रवाल या दोघांची 'फ्रंट रनींग'च्या आरोपाखाली हकालपट्टी केली आहे. विरेश जोशीच्या हातात एकूण ७ स्किम्सचे व्यवस्थापन होते. दिपक अग्रवाल हा अ‍ॅनालिस्ट आहे. या दोघांवर असलेला फ्रंट रनींगचा आरोप आहे म्हणजे काय आहे हे समजून घ्या आणि हे समजण्यासाठी आपल्या अगदीच ओळखीचे उदाहरण देतो आहोत. 
तुम्हाला पेपर फुटी म्हणजे काय ते माहिती असेलच. पेपर कसा फुटतो? शिक्षण मंडळाकडून पेपर परीक्षा केंद्रात येतात. या दरम्यान कुणीतरी पेपरची कॉपी मारतो आणि विकत सुटतो. थोडक्यात, पेपरच्या वेळेच्या आधीच काहीजणांना पेपर माहिती असतो. 

म्युच्युअल फंडांची शेअरबाजारातील खरेदी विक्री अत्यंत गोपनीय पध्दतीने केली जाते. किंबहुना इतर कुठेही म्हणजे ब्रोकरच्या ऑफीसातही गोपनियता पाळली जाते. आता समजा, ही माहिती वेळेआधीच फुटली तर काय घडेल? ज्याला आधी माहिती मिळेल तो इतरांच्या आधीच खरेदी किंवा विक्री करून भरपूर नफा कमावू शकेल. आता आधी म्हणजे किती आधी? तर अगदी १५ ते २० सेकंद आधी बातमी मिळाली तरी करोडो रुपयांचा फायदा होऊ शकतो. आता ज्या माणसाच्या हातात अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या सात स्किमचे पैसे आहेत त्याच्याकडे गोपनिय माहितीचे कोठारच असते. चहूबाजूंनी त्याच्याकडे बातम्या येतच असतात. त्याचे अ‍ॅनालिस्ट त्या माहितीचा अर्थ लावून खरेदी-विक्रीचा सल्ला देतच असतात. या माहितीच्या जोरावरच स्किमसाठी पैसा कमावला जातो. सांगायचा मुद्दा असा आहे की जी गोपनिय माहिती वापरून नफा करता येतो ती माहिती आपल्या मालकाला म्हणजे म्युच्युअल फंडाला न देता वैयक्तिक फायद्यासाठी  वापरली जाणे म्हणजे फ्रंट रनींग! सोप्प्या भाषेत या कर्मचार्‍यांनी पेपर फोडला आणि कमाई केली.
 

आता यांचा हा गुन्हा 'इनसायडर ट्रेडींग'च्या कलमाखाली येतो का? तर त्याचे उत्तर सांगणे सोपे नाही. परंतु इनसायडर ट्रेडींग आणि फ्रंट रनींग या दोन्हीत सूक्ष्म फरक आहे. इनसायडर ट्रेडींगमध्ये एखाद्या कंपनीचा कर्मचारी त्यांच्या कंपनीची गोपनिय माहिती चोरून विकत असतो. इथे म्युच्युअल फंडाच्या मॅनेजरने माहितीचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे कायद्याचे कोणते कलम लावले जाईल हे सांगणे कठीण आहे. या कर्मचार्‍यांना हाकलण्याचा निर्णय म्युच्युअल फंडाने  स्वतःच suo moto घेतला आहे. यानंतर पोलीस तक्रार झाल्याची बातमी अद्यापी आलेली नाही. 

या प्रकारामुळे अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या युनिट होल्डरचे नुकसान होणार नाही. पण अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाची विश्वासार्हता धोक्यात येणार आहे हे निश्चितच आहे. यानंतर सेबी म्युच्युअल फंडाचे ऑडीट करेल किंवा काही निर्बंध घालेल ही शक्यता नाकारता येत नाही. 
तुम्ही फक्त एकच काम करा., तुमच्या गुंतवणूक सल्लागाराला गाठून निर्णय घ्या

सबस्क्राईब करा

* indicates required