गणेशोत्सव स्पेशल : गणेशगुळेचा 'गलबत गणपती' !!

पावस पूर्णगड मार्गावर गणेशगुळे हे ठिकाण आहे. नावावरूनच कळतं की इथं गणपती मंदिर आहे. गलबतवाल्यांचा गणपती अशी याची ओळख आहे. इथल्या समुद्र किनार्‍यावरच्या डोंगरात पुरातन मंदिर आहे.
कसं आहे मंदिर ?

मंदिराच्या आत चाळीस फूट उंचीचा चौथरा डोंगराच्या पार्श्वभूमीवर बांधलेला आहे. मंदिराला दोन प्रवेशद्वारं आहेत आणि या  दोन दालनाना जोडणारी १२ फूट उंचीची मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असं मानलं जातं. या शिळेची म्हणजेच गणपतीची नित्य पूजा केली जाते. ही मूर्ती  दक्षिणामुखी आहे आणि ती स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं.

स्रोत

हे मंदिर गावातल्या भंडारी समाजाचं श्रध्दास्थान आहे. आपली गलबतं म्हणजेच एक प्रकारची जहाजं पावसाळ्यानंतर समुद्रात सोडण्यापूर्वी   या गणपतीला साकडे-प्रार्थना करून  सोडली जात असत.  म्हणून याला गलबतवाल्यांचा गणपती असंही म्हंटलं जातं. आख्यायिका माध्यमातून पावसच्या डोंगरावर गणेशाच्या पायाचा ठसा उमटलेला आहे आणि तो आजही चांगलाच दिसून येतो. या पावलांचंही पूजन केलं होतं.

मंदिर कसं निर्माण झालं ? 

असं म्हटलं जातं की पावसचे रामचंद्र चिपळूणकर हे दशग्रंथी ब्राह्मण पोटशूळाच्या विकाराने त्रस्त होते. ते मोठे गणेशभक्त होते. आजारामुळे  ते वैतागून जीव द्यायला निघाले अन असह्य वेदनेने चक्कर येऊन झुडपात पडले. तिथेच ग्लानीत त्यांनी गणेशाचा धावा केला. गणेशाने दृष्टांत देत सातारच्या शाहू महाराजांचे सहकार्य घे, मंदिर बांध, माझे या गावात अवशेषात्मक वास्तव्य आहे असं सांगितलं. या दृष्टांताप्रमाणे  महाराजांनीही चिपळूणकरांना सहकार्य दिलं. कारण तोच दृष्टांत त्यांनाही झाला होता. महाराजांनी आपला प्रतिनिधी पाठवून महाराजांनी स्वखर्चाने मंदिर उभारलं. दुःखहर्ता, विघ्नहर्ता अशी लोकांची खात्री पटताच उपासना श्रद्धेने होऊ लागली. स्वामी स्वरूपानंदांचीसुद्धा या गणेशावर फार श्रद्धा होती.

स्रोत

पूर्वी या गणपतीच्या नाभीतून पाण्याची सतत धार वाहत असे. ती बंद झाली त्याच दिवशी या गणेशाने गणेशगुळ्यावरून गणपतीपुळ्याला स्थलांतर केलं असं सांगितलं जातं. त्यामुळं या गणपतीचं  उत्सव भाद्रपद चतुर्थीला होतो तर पुळ्याचा वार्षिक उत्सव माघ चतुर्थीला होतो.

गणपतीपुळ्याचा गणपती तर सगळ्यांना माहीत आहे, पण हा गणेशगुळ्याचा गणपती तुम्हांला माहित होता का ?

सबस्क्राईब करा

* indicates required