computer

मेक्सिकोतल्या शेतातलं एका रात्रीत पडलेलं आणि वाढत चाललेलं भलं मोठं भगदाड! काय कारणं असतील यामागे?

शेतात पडलेले खड्डे तुम्ही पहिले असतील, पण शेतातला हा खड्डा अचानक मोठा मोठा होत गेला तर काय होईल? तर तिथे एक सिंकहोल म्हणजेच भगदाड तयार होईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशी भगदाडे पडण्याच्या घटना काही नव्या नाहीत. पृथ्वीच्या आतील थर ठिसूळ किंवा मऊ झाले की जमिनीत अपोआप अशी खोल खोल विवरे तयार होतात. जमिनीत जेव्हा अशी मोठमोठी भगदाडे पडणार असतात त्याआधी क्वचितच कधीकधी  जमिनीला दूरवर भेगा पडणे, त्या परिसरातील झाडे, इमारती एका बाजूला झुकणे, इमारतींनाही मोठमोठ्या भेगा पडणे, असे काही संकेत मिळतात. तर कधीकधी ही मोठाली भगदाडे अचानकच तयार होत जातात. 

मेक्सिकोतील प्याब्ला राज्यातील एका शेतात असेच एक ३०० फुट रुंदीचे भगदाड तयार झाले आहे. शनिवारी या शेतात फक्त १५ फुटाचा एक खड्डा पडला होता. शेतातील माती मऊ झाल्याने असा खड्डा तयार होणे सहाजिक आहे. म्हणून याकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही, पण हळूहळू हा खड्डा मोठा होत गेला आणि त्यात भूगर्भातील पाणी साठत गेले आणि या भल्या मोठ्या भगदाडाला एका तळ्याचे रूप आले.

शनिवारी पहाटे सहा वाजेपासून या शेतावर राहणाऱ्या कुटुंबियांना भूकंप झाल्यासारखे मोठमोठे आवाज येत होते. बुधवारी त्यांनी पाहिले तर त्यांच्या घराच्या अगदी हातभार अंतरावर एक भलं मोठं तळ तयार झालं होतं. त्या तळ्यातील पाणी उसळ्या मारत होतं. पाण्याच्या माऱ्यामुळे त्या तळ्याचे काठ अजूनच कोसळत होते आणि ते तळं आणखीन आणखीन मोठं होत होतं. 

मेक्सिकोचे पर्यावरण सचिव आणि प्याब्ला राज्याचे राज्यपाल देखील या भगदाडामुळे चिंतेत पडले आहेत. या शेतात राहणाऱ्या त्या कुटुंबीयासोबतच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनाही दुसरीकडे विस्थापित केले जात आहे. 

शेतात अपोआपच तळे निर्माण झाल्याची बातमी शहरात पसरताच स्थानिक लोकांनी या शेतात गर्दी केली होती. काही धाडसी लोक तर अगदी या तळ्याच्या काठावरून वाकून बघत होते. इतक्यात पुन्हा एकदा मोठा आवाज झाला आणि याच्या कडा अजून आत कोसळल्या. काठावर उभ्या असलेल्या लोकांची पळता भुई थोडी झाली. या घटनेनंतर स्थानिक लोकांना तिथून हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी मात्र झाली नाही. 

असे म्हटले जाते की, या शेताच्या ठिकाणी पूर्वी एक भले मोठे तळेच होते. त्या तळ्यात भर टाकून इथे शेतजमीन तयार करण्यात आली. कदाचित जमिनीतील हा पाण्याचा स्रोत बाहेर पडण्यासाठी वाट तयार करत असेल, असाही अंदाज लावला जात आहे. जमिनीच्या आतील खडकाचे आवरण मऊ पडल्यानेही अशी मोठमोठी भगदाडे तयार होतात. शहराच्या महापौरांनी मात्र याचे काही वाईट परिणाम होणार नाहीत याबाबत दक्षता घेतली असल्याचे म्हटले आहे.

ज्या कुटुंबियांचे घर या शेताच्या बांधावर होते त्यांचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे. या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत आणि हे कुटुंबीय या शहरात नव्यानेच राहायला आले होते. इथे त्यांचे कुणी नातेवाईक, मित्र किंवा ओळखीचे लोकही नाहीत. खूप कष्टाने उभे केलेले हे घर निसर्गाने अशा रीतीने ओरबाडून घेतल्याने त्यांना खूपच दु:ख होत आहे. त्यांचे हे घर वाचण्याची शक्यता तर धूसरच आहे. या कुटुंबीयांनी आपल्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी सरकारकडे केली आहे. मेक्सिकन सरकारनेही त्यांच्या या विनंतीवर लवकरच अंमलबजावणी करण्याचा शब्द दिला आहे.

आता सरकार त्यांना नुकसान भरपाई देईल आणि ते कुटुंब कदाचित दुसरीकडे कुठे तरी राहायला जाईलही, पण ते भगदाड आता किती वाढत राहणार आणि त्याचे आजूबाजूच्या पर्यावरणावर काही परिणाम होणार का हा खरा प्रश्न आहे. 

सरतेशेवटी एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली, ती हि की तुम्ही पर्यावरणासोबत खेळलात  तर तुम्हाला त्याची परतफेड करावी लागणारच. आपल्याकडे मुंबई आणि चेन्नईच्या पुराच्यावेळी या गोष्टीची प्रचीती आली आहेच, मेक्सिकोतलं भगदाडही याचंच उदाहरण म्हणावं लागेल.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required