ती पोहण्यासाठी तलावात उतरली आणि तिच्या हाती चक्क हे लागलं....पाहा कोणती दुर्मिळ गोष्ट सापडली आहे तिला ?

तुम्ही पोहण्यासाठी तलावात उतरलात आणि एक गंजलेली वस्तू तुमच्या हाती लागली तर तुम्ही काय कराल ? कोणीही गंजलेली वस्तू फेकुनच देईल. स्वीडनची ‘सागा वानेक’ सुद्धा हेच करणार होती पण तिने त्या वस्तूला नीट बघितलं. त्या लांब लोखंडी वस्तूला एक मुठ होती आणि पुढे एक टोक सुद्धा होतं. ती साधीसुधी लोखंडी वस्तू नव्हती राव. ती चक्क १५०० वर्ष जुनी तलवार होती.

स्रोत

सागा आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या घालवण्यासाठी तिच्या जोनकोपिंग येथील घरी आली होती. ती पोहोण्यासाठी जवळच्या तलावात उतरली असता तिला पायाला एक गंजलेली वस्तू लागली. तिने ती निरखून बघितल्यावर ती वस्तू तलवार असल्याचं तिच्या ध्यानात आलं. तिने लगेचच वडिलांना याबद्दल सांगितलं.  

जवळच्या वस्तुसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना तलवार दाखवण्यात आली. वस्तुसंग्रहालयाच्या अभ्यासकांनी ही तलवार १५०० वर्ष जुनी असल्याचं सांगितलं आहे. मध्ययुगातील खलाशी/लुटारू व्हायकिंग लोक अशा प्रकारची तलवार बाळगायचे. व्हायकिंग लोकांनी एकेकाळी उत्तर युरोपावर राज्य केलं होतं. त्यांच्या कारकिर्दीला आजही ‘व्हायकिंग युग’ म्हणून ओळखलं जातं.

स्रोत

एवढ्या मोलाच्या ऐतिहासिक वस्तूला शोधल्याबद्दल सागाचं कौतुक होत आहे. ज्या तलावात तलवार सापडली तिथे आणखी वस्तू शोधण्याचं काम चालू आहे. कदाचित आणखी आश्चर्यकारक गोष्टी बाहेर पडू शकतात.