computer

या मुलीने तिला आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर तिला जन्माला घातल्याबद्दल केस केली आहे!!

आपण कधी कुठे कुणाच्या पोटी आणि कसा जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते. अपघाताने म्हणा किंवा आणखी कशाने, आपण जन्माला येतो आणि मरेपर्यंत जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यात किंवा जगण्याचा अर्थ शोधण्यातच आयुष्य खर्ची घालतो. कोणी हातापायाने धडधाकट जन्मते, तर कोणाच्यात जन्मत:च काही व्यंग असते. जे धडधाकट जन्माला आलेत त्यांची काही आयुष्याबाबत तक्रार करण्याची गरज नसते. तरीही हे लोक कुरबुरी करत जगत असतात. पण ज्यांना निसर्गानेच अन्याय करून पाठवले आहे, त्यांचं काय? शारीरिक कमतरतेसह जन्माला येणे आणि त्यासोबत जगणे म्हणजे त्यांना शिक्षा वाटली तर चुकीचे काय? पण अनेकदा असे लोकच धडधाकट लोकांपेक्षा अधिक आनंदाने आयुष्य जगत असल्याचे दिसते. असे असले तरी त्यांना आपल्या जन्माला कारणीभूत ठरलेल्या काही व्यक्तींना दोष द्यावा वाटत असेल तर?

आपल्या दुर्द्शेसाठी आपल्या आईवर उपचार करणारी डॉक्टरच जबाबदार असल्याचा भावनेतून इंग्लंडच्या एका वीस वर्षीय तरुणीने ती गर्भावस्थेत असताना तिच्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर तिला जन्माला घालण्याचा सल्ला दिल्याबद्दल केस केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊया.

एवी टूम्ब्ज नावाच्या या मुलीचा जन्म २००१ मध्ये झाला. जन्मत:च तिला स्पाइना बिफिडा नावाच्या एका दुर्धर आजाराने ग्रासले. एवी टूम्ब्जच्या मते ती आईच्या पोटात असतानाच तिला हा आजार झाल्याची माहिती डॉक्टरांना होती आणि ते अशा आजारासह जन्मणाऱ्या तिचा जन्मच रोखू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. गर्भवती मातेला फॉलिक ॲसिडची कमतरता भासली की तिच्या मुलाला हा आजार होऊ शकतो, इतकेही या डॉक्टरांना माहिती नसावे का? किमान त्यांनी आईला फॉलिक ॲसिडची योग्य प्रमाणात औषधे दिली असती तरी माझी ही अवस्था झाली नसती असे एवीचे म्हणणे आहे. मीही इतर सामान्य लोकांप्रमाणेच जगू शकले असते. केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्यावर ही वेळ आली असे एवीचे म्हणणे आहे. म्हणूनच तिने लिंकनशायरमधील डॉ. मिशेल हिच्यावर लाखो पौंडांची नुकसान भरपाई मागणारी केस दाखल केली आहे.

स्पाइना बिफिडा या गंभीर आजारात गर्भावस्थेतच मुलांच्या मणक्याची नीट वाढ होत नाही. मणक्यांच्या हाडात जन्मत:च गॅप राहतो. ज्यामुळे एवीला कित्येक दिवस तिच्या मणक्यातून नाकात एक नलिका घालावी लागते आणि चोवीस तास तिला ही नलिका स्वतःसोबत बाळगावी लागते.

असे असले तरी एवीने आजपर्यंत अनेक क्रीडाप्रकारात दिव्यांग आणि समान्य अशा दोन्ही प्रकारात पदके मिळवली आहेत. ती शोजम्पिंग खेळण्यात माहीर आहे. एका टीव्ही शो मध्येही तिची मुलाखत घेण्यात आली होती ज्यामध्ये तिचा हा कठीण प्रवास दाखवण्यात आला होता. शिवाय ती तरुणांसाठी एक प्रेरणास्थान असल्याने तिला २०१८ साली इन्स्पिरेशन यंग पर्सन ॲवॉर्डही मिळाला आहे.

तिने इतके नाव कमावले असले तरी आपली अशी अवस्था होण्यास डॉ. मिशेलच जबाबदार आहेत यावर ती ठाम आहे. योग्य वेळी त्यांनी आपल्या आईला योग्य सल्ला दिला नाही. त्यांनी सांगितले की, तुम्ही जर नीट आहार घेत असाल तर तुम्हाला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेण्याची गरज नाही. पण फॉलिक ॲसिडच्या कमतरतेने मुलामध्ये काय गुंतागुंत होऊ शकते किंवा त्याच्या वाढीत कशी त्रुटी राहू शकते हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

एवीची आई, कॅरोलीन यांनी आपल्या वयाच्या ३०व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या जर्नल फिजिशियन डॉ. फिलीप मिशेल यांच्या सल्ल्यानेच गर्भ ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांची डिलिव्हरी देखील डॉ. मिशेल यांनीच केली. पण या संपूर्ण प्रवासात त्यांनी बाळाच्या आरोग्याला काहीच महत्त्व दिले नाही, असे एवीचे म्हणणे आहे. त्यांनी योग्य वेळी आईला योग्य सल्ला दिला असता तर मी एक सामान्य मुलगी म्हणून जन्माला आले असते किंवा त्यांना माझ्यातील दोष दिसल्यावर तरी त यांनी अबोर्शनचा सल्ला द्यायला हवा होता, असे एवी म्हणते.

दुसरीकडे डॉ. मिशेल यांनी हा दावा साफ फेटाळला आहे. त्यांच्या मते कॅरोलीन यांची त्याकाळात आपल्याला मुल असावे ही भावना प्रबळ होती. त्यांना मी नियमितपणे आवश्यक ती औषधे देत होते. फॉलिक ॲसिड संदर्भातही त्यांना आवश्यक तो सल्ला देण्यात आला होता.

या खटल्याचा निकाल कालच लागला आणि न्यायाधीशांनी एव्हीचे म्हणणे योग्य आहे असे मान्य केलं आहे आणि तिला काही मिलियन डॉलर्सची भरपाई पण दिली आहे. पण अशा प्रकारे आपल्या शारीरिक कमतरतेसाठी आपल्या डॉक्टरांना जबाबदार धरण्याचा आणि त्यांच्यावर खटला चालवण्याचा एवीचा हा निर्णय योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required