computer

भाजीपाला विकून अभ्यास केला आज बनली सिविल जज! अंकिता नागरचा हा प्रवास तरुणींसाठी नक्कीच एक प्रेरणास्त्रोत आहे!!

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अवघड खराच. आणि तो करत असताना घरी परिस्थिती चांगली नसेल तर मुलांना अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. मुलांना लवकर नोकरी लागून घरची आर्थिक परिस्थिती सुधरवायची असते, तर मुलींना लग्नाची वय झाल्यावर नोकरी लागणे गरजेचे असते नाहीतर लग्नासाठी दबाव सुरू होतो. अशा अनेक अडचणींवर मात करून जेव्हा मुले यश खेचून आणतात तेव्हा त्यांचे यश म्हणूनच कौतुकास्पद असते.

इंदौरच्या अंकिता नागर या मुलीने अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून सिव्हिज जजची परीक्षा पास केली आहे. आता एका सामान्य घरातली मुलगी न्यायदानाचे काम करणार आहे. अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षा ज्यांना अभ्यासासाठी खास सोयी-सवलती असणाऱ्या श्रीमंत मुलांना पण जमत नाहीत, तिथे असे गरीब घरातली मुले यश प्राप्त करतात, ही गोष्ट साधी नाही.

अंकिताचे वडील भाजीपाला विकून आपला संसार चालवतात. आई दिवसभर काम करून संध्याकाळी भाजीपाल्याच्या लॉरीवर जाते. तर अंकिता पण त्यांना मदत करण्यासाठी भाजीपाला विकण्याचे काम करत असे. भाऊ मजुरी करून घरात हातभार लावतो. अशा वातावरणात अंकिता शिक्षण घेत होती.

अंकिताला प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागला. एकतर आधीच घरात दारिद्र्य. त्यात उच्च शिक्षण घ्यायचे म्हटले तर हजार अडचणी! पण अशावेळी आईवडील खमके असतील तर मुलं पण जिद्दीने शिकून मोठे होतात. अंकिताने आधी आपले एलएलबी पूर्ण केले. गेल्यावर्षी एलएलएमदेखील पूर्ण करत तिने न्यायिक परीक्षांची तयारी सुरू केली.

सकाळी आईला घरकामात मदत करणे आणि संध्याकाळी वडिलांना मदत करणे यातून कसाबसा वेळ काढत ती नियमित अभ्यास करू लागली. अंकिताचे छोटंसं घर आहे. या पत्र्याच्या घरात उन्हाळ्यात अंग ओलं होईल इतकं गरम होते. तर पावसाळ्यात सातत्याने पाणी गळते. ही परिस्थिती उलट अंकिताला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देत होती.

अंकिताचा थोडा तरी त्रास कमी व्हावा म्हणून तिचा भाऊ आकाश याने थोडे थोडे पैसे वाचवून घरात कुलर आणला. एलएलबी-एलएलएम आणि परत स्पर्धा परीक्षा इतके शिक्षण एका गरीब घरातल्या मुलीसाठी सोपे नसते. वेळोवेळी लागणारे पैसे कुठून आणायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो.

अंकिताने जेव्हा या परीक्षेचा फॉर्म भरला तेव्हा परीक्षा फी ८०० रुपये होती. तिच्या घरात त्यावेळी फक्त ५०० रुपये होते. ३०० रुपये उसने घेऊन कसेबसे त्यांनी या फीसाठी पैसे जमा केले होते. अंकिताला एक माहीत होते, ही परिस्थिती बदलायची तर आपल्याला मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही.

शेवटी मेहनत रंग लायी आणि अंकिता परीक्षा पास करत न्यायाधीश झाली. बातमी घरात सांगितल्यावर आईवडिलांना झालेला आनंद कोणीही कल्पना करू शकतो. अंकितासारख्या मुली या हजारो अडचणींवर मात करून यशस्वी होता येते याचे सर्वांत मोठे उदाहरण असतात.

 

सबस्क्राईब करा

* indicates required