गुगल डूडलवर दिसलेले हे भारतीय शास्त्रज्ञ आहेत तरी कोण ?

गूगल नेहमीच वेगवेगळ्या दिवसाचं औचित्य साधून डूडल तयार करत असतं. प्रसिद्ध शोध, शास्त्रज्ञ व्यक्ती, कलाकार, घटना या विविध विषयांवर डुडल असतात. गुगलने काल आपल्या डूडलच्या माध्यमातून भारतीय वैज्ञानिक प्रोफेसर उडुपी रामचंद्र राव यांचे स्मरण केले आहे. प्रोफेसर राव यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त गुगलने हे खास डूडल बनवले आहे.
प्रोफेसर राव यांचा जन्म १० मार्च १९३२ मध्ये कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. अत्यंत साध्या अश्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्राध्यापक राव यांच्या नेतृत्वात भारताने आर्यभटासह २० हून अधिक उपग्रह तयार करून अंतराळात यशस्वीपणे सोडले. भारतातच नव्हे तर सम्पूर्ण जगात प्राध्यापक राव यांचे नाव खूप आदरपूर्वक घेतले जाते.
प्राध्यापक राव यांनी कॉस्मिक-रे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचे सहकारी म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी नासासाठीही काम केले. १९६६ साली ते भारतात परतले. १९७५ मध्ये भारताने त्यांच्या नेतृत्वात ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात पाठवला. सन १९८४ ते १९९४ या काळात ते भारतीय अवकाश संशोधन संघटनेचे म्हणजे इस्रोचे अध्यक्षही होते. २०१३ मध्ये सोसायटी ऑफ सॅटेलाईट प्रोफेशनल्स इंटरनॅशनलने प्रोफेसर राव यांना 'सॅटेलाईट हॉल ऑफ फेम'( satellite hall of fame) मध्ये समाविष्ट केले. आणि त्याच वर्षी भारताने 'मंगलयान' मंगळावरील अभियानही सुरू केले.
राव यांना 'सॅटेलाईट मॅन' म्हणूनही ओळखले जाते. १९७६ मध्ये प्रोफेसर राव यांना त्यांच्या योगदानाबद्दल देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन २०१७ मध्ये त्यांना पद्मविभूषण या सर्वोच्च पुरसाकारानेही सन्मानित करण्यात आले. प्रोफेसर राव यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी २४ जुलै २०१७ रोजी निधन झाले.
भारताच्या या सॅटेलाईट मॅनला आणि अतिशय महान शास्त्रज्ञाला बोभाटातर्फे आदरांजली.
लेखिका: शीतल दरंदळे