computer

या गावात हजारो वर्षांपासून दिवाळीत खेळतात शेणाची होळी.. याची कथा तर जाणून घ्या!!

भारतात पावलापावलावर परंपरा बदलतात असं म्हणतात. मग वेगळ्या राज्यात गेल्यावर तर काय होत असेल हे विचारुच नका.  काही भागांतल्या परंपरा एवढ्या भन्नाट आहेत की काय सांगावे!!  आज आम्ही अशाच एका वेगळ्या सणाबद्दल माहिती देणार आहोत. हो, पटलं नाही तरी हा त्या लोकांसाठी सणच आहे. 

तमिळनाडूतल्या गुमातापुरामध्ये "गोरेहब्बा फेस्टिवल" साजरा करण्यात येतो. या सणात लोक चक्क शेण एकमेकांच्या अंगावर फेकण्याचा खेळ खेळतात मंडळी!! म्हणजे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये टोमॅटोनो फेस्टिव्हल पाह्यलात ना, अगदी तस्सा समारंभ असतो हा. फक्त ते लोक एकमेकांच्या अंगावर टोमॅटो फेकतात, आणि इथे थेट शेण फेकतात!!  आणि हे सगळं होतं दिवाळीतल्या बळीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. 

रस्त्याने चालताना चुकून शेणात पाय पडला तरी आपल्याला कसनुसं होतं. पण हे लोक तर शेणात खेळतात.  'गोरे हब्बा' हा सण दिवाळी नंतर काही दिवसांनी साजरा केला जातो.  शेण हे आरोग्यासाठी चांगले आहे अशी समजूत असल्याने हे लोक शेणाने खेळायला महत्व देतात.

आता हा व्हिडिओच पाहा ना. वायरल झालेल्या व्हिडीओत लोक शेणात अंघोळ करता एकमेकांच्या अंगावर शेण फेकताना दिसत आहेत. भारतात शेणाचे अनेक उपयोग केले जातात. भिंतीवर थापलेल्या गोवऱ्या आता गॅस आल्यामुळे दुर्मिळ झाल्या असल्या तरी आजही अनेक ठिकाणी शेणाचा उपयोग केलेला दिसून देतो. पण हे प्रकरण वेगळंच आहे.

गावातील जुनेजाणते असलेले चंद्रशेखरप्पा, शिवशंकरप्पा आणि गावाचे नेते असलेले पुतन्ना यांच्या मते बलिप्रतिपदेच्या दिवशी पौराणिक देवता महाबली जगात काय सुरू आहे याची तपासणी करायला येतो. याची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी झाली, त्यादिवशी बलिप्रतिपदा होती आणि म्हणूनच तेव्हापासून बलिप्रतिपदेला हा सण साजरा करण्यात येतो. 

याची आणखीही एक कथा सांगतात. उत्तरेतून आलेला देवरगौडा नावाचा एक माणूस कालेगौडा नावाच्या माणसाच्या घरी घरगडी म्हणून कामाला होता. देवरगौडा  मेला तेव्हा त्याने सोबत आणलेली काठी आणि पिशवी एका कचऱ्याच्या खडड्यात फेकून देण्यात आली. काही दिवसांनी जिथं त्याचं सामान फेकलं होतं, त्या खडड्यात एक लिंग उगवलेले दिसून आले. त्या लिंगावरुन एक बैलगाडी गेली आणि अचानकपणे त्या लिंगातून रक्त वाहायला लागले. 

या घटनेच्या काही दिवसांनंतर गावप्रमुखाच्या स्वप्नात भगवान शंकर आले, आणि त्यांनी त्या प्रमुखाला मंदिर बांधायला सांगितले. स्वप्नात सांगितल्यानुसार जिथे ते लिंग उगवले होते तिथे भगवान बिरप्पाचे मंदिर उभारण्यात आले.  तेव्हापासून बलिप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी हा गोरेहब्बा सण साजरा करण्यात येतो. हा सण एवढे दिवस टिकून आहे कारण त्या लोकांना वाटते की अंगावर शेण लावल्याने सगळे आजार दूर होतात. 

मंडळी, गोरेहब्बा सण साजरा करण्याची पध्दतही एकदम गंमतीशीर आहे. सकाळी सकाळी गावातली सगळी लहान मुलं आणि स्त्रिया गावभरातून शेण गोळा करतात आणि ते बिरप्पा मंदिराच्या मागे हा सण साजरा करता यावा यासाठी तयार करण्यात आलेल्या जागी टाकतात. त्यानंतर लहान मुले गावभर फिरून तेल आणि दही गोळा करतात. हे तेल-दही पूजेदरम्यान बिरप्पा मंदिरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या करप्पा देवाला अर्पण करतात. २०१० साली त्या गांवकऱ्यांनी तब्बल ९ ट्रक शेण गोळा केले होते. 

मग देवाची पूजा करून मग उत्सवाला सुरुवात होते. एका माणसाला चहाडी करणारा म्हणून तयार करण्यात येते. त्याला गवताच्या मिशा आणि दाढी लावतात. गाढवावर बसवून त्याला मंदिरापर्यंत आणण्यात येते. मंदिरात आल्यावर त्याची मिशी आणि दाढी काढून जिथे शेण गोळा केलेले असते तिथे बुडवण्यात येते. नंतर मग शेणाची पूजा केली जाते. हे सगळे झाल्यावर मग सुरू होते खरी धमाल!!

सर्वात आधी मंदिराच्या पुजाऱ्याच्या अंगावर शेण फेकण्यात येते. सण सुरू झाला आहे हे सांगण्याचा तो सिग्नल मानला जातो. गावकरी एकमेकांना उत्सवासाठी तयार केलेल्या तलावात ढकलतात. एकेक करून सगळे गावकरी तलावात उतरतात आणि धमाल सुरू होते. हा उत्सव बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातून हजारो लोक गोळा झालेले असतात. 

इथेच हा उत्सव संपत नाही मंडळी!! चहाडी करणाऱ्या माणसाची एक प्रतिमा तयार केली जाते, तिला जवळच्या एका टेकडीवर नेऊन जाळण्यात येते, सोबत एक कोंबडी पण जाळण्यात येते. गावकरी शेणात भिजून झाल्यावर एका तलावात जाऊन अंघोळ करतात आणि परत गावात येऊन चहाडी करणाऱ्याला शिव्या देतात. हे प्रतिकात्मक असते राव!! कुणी चहाडी नको करायला, प्रेमात सगळ्यांनी वागायला हा संदेश यातून त्यांना द्यायचा असतो. 

मंडळी स्पेनमधील टॉमेटीनो फेस्टिवल सगळ्यांना माहीत आहे पण आपल्याच देशातील इतका भन्नाट सण आपल्यालाच माहीत नव्हता. तो सर्वांसमोर आणण्याचा बोभाटाचा हा छोटा प्रयत्न आहे.

 

लेखक : वैभव पाटील