computer

अस्सल मराठी मालिकांच्या दिवसांची आठवण - गोट्या

काल ना.धों.ताम्हणकर या लेखकांचा स्मृतीदिन होता.या लेखकाचे नाव फारसे आता चर्चेत येत नसल्याने पटकन काही संदर्भ आठवेल असे नाही पण दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात ताम्हणकरांच्या पुस्तकावर आधारीत 'गोट्या' नावाची एक मालिका गाजली होती. कदाचित ती मालिका पण आठवत नसेल पण त्या मालिकेचे शिर्षकगीत आजही लोकप्रिय आहे. हा लेख पुढे वाचण्याआधी ते गाणं आधी ऐकू या !! अरुण इंगळे यांनी गायलेले अशोक पत्की यांनी संगीत दिलेले हे गीत मधुकर मधुकर आरकडे यांनी लिहिले होते. 

बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ,त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या रात्री,चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे,माळरानी खडकात?
अंकुराचे होता रोप,होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात,उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली,प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुलाफळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे,माळरानी खडकात?
*मधुकर आरकडे

 

आता वाचू या 'गोट्या' मालिकेबद्दल ! या मालिकेची निर्मिती 'राजदत्त' यांनी केली होती. ताम्हणकरांच्या याच नावाच्या कथामालिकेवर आधारीत होती. गोट्या नावाच्या एका निराधार मुलाला एक कुटुंब आधार देते -घर देते.या नव्या घरात त्याला एक बहीण पण मिळते तिचं नाव सुमा ! गोट्या हुशार असतो.चतुर असतो.त्याच्या हुशारीचे किस्से त्या मालिकेच्या एकेक एपिसोड मधून चित्रित करण्यात आले होते.
या सर्व कथा १९४०-५० च्या दरम्यान भा. ल. तथा काका पालवणकर यांच्या 'खेळगडी' नावाच्या मासिकात प्रकाशित झाल्या होत्या. त्या काळी टेलीव्हिजन सोडा रेडीओ पण नव्हता. पुस्तकं आणि मासिकं हाच एक मिडीया तेव्हा उपलब्ध होता.या मालिकेचा  उद्देश  ‘बालजनांशी हसून खेळून त्यांच्या मनोविकासाला मदत करणारा एखादा सवंगडी त्यांना मिळवून द्यावा, ही मनातली इच्छा गोट्याच्या रूपाने मूर्त स्वरूपास गेली...’ असे ताम्हणकरांनी  लिहिले आहे.

 

ही मालिका दूरदर्शनवर गाजली.आताच्या भाषेत सांगायचे तर 'हायेस्ट टीआरपी' असलेली ही मालिका होती. गोट्याची भूमिका करणारा बाल नट जॉय घाणेकर आता अमेरीकेत स्थायिक झाला आहे. एका अमेरिकन बँकेत उच्च पदावर कार्यरत आहे.
नंतरच्या काळात मनोरंजनाचे क्षेत्र विस्तारत गेले आणि मालिका विस्मरणात गेली पण  मालिकेचे शिर्षकगीत आजही अनेकांच्या ओळखीचे आहे.

ना. धों. ताम्हणकरांचा स्मृतीदिन हे एक निमित्त आहे. खरा प्रश्न जो आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत तो असा आहे की विदेशी माध्यमांच्या आक्रमणानंतर अशा अस्सल मराठी मालिका मुलांच्या नजरेस येत नाहीत. माध्यमाचे मराठीपण हरवत चालले आहे ही चिंतेची बाब आहे .तुम्ही आमच्याशी सहमत आहात का ? 

सबस्क्राईब करा

* indicates required