यूपीमधल्या या शाळा शिक्षिकेने एका वर्षात मिळवला चक्क १ कोटी पगार??
उत्तरप्रदेशात कधी काय होईल सांगता येत नाही. तसा भारतात कधी काय होईल याचाही नेम नाही म्हणा!! पण सध्यापुरतं आपण यूपीबद्दल बोलू. तिथे एका बाईने जबरदस्त कांड केले आहे. एका शाळेत शिक्षिका असलेल्या या बाईने १३ महिन्यात तब्बल एक कोटी कमावले आहेत. कसे? चला जाणून घेऊ या!!
या बाईचे नाव आहे अनामिका शुक्ला. हिने एवढे पैसे मेहनत करून नाही, तर घोटाळा करून कमावले आहेत. उत्तर प्रदेशात शिक्षण विभागाकडून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये चालवली जातात. या बाईने एकाच वेळी २५ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांत शिकवत असल्याचे भासवून गेल्या तेरा महिन्यात तब्बल एक कोटी रुपये पगार घेतला आहे. मेनपुरी इथं राहणारी ही बाई विज्ञान विषय शिकवते.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात काँट्रॅक्ट बेसवर नियुक्ती केली जाते आणि एका शिक्षकाला ३० हजार रुपये पगार दिला जातो. तिथे डिजिटल डेटाबेसनुसार हजेरी घेतली जाते. असे असुनसुद्धा एवढा मोठा घोटाळा ही बाई कशी करू शकते हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का मानला जातोय.
शिक्षण विभागाने या विषयावर चौकशी सुरू केली असून ही महिला दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. चौकशी समितीचा अहवाल तर येईल तेव्हा येईल, पण सध्या तरी या बाईंनी देशभर खळबळ उडवली आहे हे मात्र नक्की!!
(सर्व फोटो प्रातिनिधिक)




