ही नॅनो आहे की हेलिकॉप्टर? हा नक्की काय जुगाड आहे आणि तो का केलाय?
जुगाड करण्यात भारतीयांचा हात कुणीही धरू शकत नाही. नुकतेच जुगाडू कमलेश या नावाने आपल्या मालेगावचा एक पठ्ठ्या फेमस झाला आहे. कुठल्या गोष्टीपासून कोण काय बनवून टाकेल याचा नेम नाही. पण आज जी गोष्ट तुम्ही वाचणार तो जुगाड काहीतरीच भन्नाट आहे हे तुम्हांलाही पटल्याशिवाय राहणार नाही.
तुम्ही अनेक लग्नांमध्ये नवरदेव-नवरीची एन्ट्री हेलिकॉप्टरमधून होताना बघितली असेल. अशीच एंट्री आपण पण करावी असे तुम्हाला वाटून गेले असेल. पण प्रत्येकाला हेलिकॉप्टर परवडते असे नाही. बिहार येथील बगहा नावाच्या शहरातल्या गुड्डू शर्माच्या मनात पण असाच विचार आला. मग काय, या पठ्ठ्याने थेट नॅनो कारच हेलिकॉप्टरमध्ये बदलली.
हे कार-कम-हेलिकॉप्टर बनविण्यासाठी गुड्डू शर्माला दीड लाख खर्च लागला आहे. तो सांगतो की दोन लाख रुपये टाकून हायटेक हेलिकॉप्टर बनविता येते. पण या गाडीचा एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला फुल हेलिकॉप्टरचा फील जरी ही गाडी देऊ शकत असली तरी ही गाडी काही उडत नाही. लग्नांमध्ये १५ हजार रुपये आकारून गुड्डू शर्मा हे हेलिकॉप्टर भाड्याने देत असतो.
हा भन्नाट प्रयोग करणारा गुड्डू शर्मा हा काही पहिलाच माणूस नाही. याआधी बिहारच्याच छपरा गावाच्या मिथिलेश प्रसाद यांना जेव्हा पायलट बनता आले नाही तेव्हा त्यांनीही असेच कारला हेलिकॉप्टरमध्ये बदलले होते. त्यांचेही हेलिकॉप्टर उडू शकत नव्हते, हा भाग वेगळा.
भारतीय जुगडाच्या बाबतीत टॉपवर असले तरी इतर देशांतही अशा टॅलेंटची काही कमी नाहीत. त्यांच्याकडे आधीच साधनसामग्री जास्त असल्याने त्यांना त्याचा मोठा फायदा होतो. ब्राझीलमध्ये एकाने तर खराब गाडीला थेट उडणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बदलले होते.
तर असे आहे, गुड्डू शर्माला एक आयडिया आली. त्याने जुगाड करून नॅनोला हेलिकॉप्टरचं रुप दिलं आणि आता त्यातून तो मस्तपैकी पैसे कमवत आहे. आपला हा प्रयोग त्याने शार्क टॅंक इंडिया शोमध्ये दाखवायला हरकत नाही. काय म्हणता???
उदय पाटील




