computer

नवी वॉटर टॅक्सीसेवा: कुठून-कुठेपर्यंत, दर, नियम, मार्ग... सगळे काही जाणून घ्या!!

मुंबईतले ट्रॅफिक आणि गर्दी तसा नेहमीच्या चर्चेचा विषय आहे. लोकल आणि रस्ते वाहतुकीबरोबर सागरी वाहतूक करता आली असती तर किती बरे झाले असते असा विचार अनेकांच्या मनात येऊन गेला असेल. आता मात्र लोकांची ही इच्छापूर्ती लवकरच होणार आहे.

मुंबईत वॉटरटॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. नुकतेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सेवेचे उदघाटन केले आहे. नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास या निमित्ताने कमालीचा सोपा होणार आहे. यामुळे नेरुळ, बेलापूर, एलिफंटा आणि जेएनपीटी यांना जोडले जाणे सोपे होणार आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने ते तर ही गोष्ट प्रचंड परिणामकारक ठरू शकते. कारण नवी मुंबईतून थेट एलिफंटाला पोचता येणार आहे. तसेच नवी मुंबईतून बसलेला माणूस थेट गेटवे ऑफ इंडियाला उतरेल यापेक्षा भन्नाट अजून काय हवे?

यासाठी बांधण्यात आलेल्या बेलापूर धक्क्याला ८.३७ कोटी खर्च आला असून यातील ५०% रक्कम सागरमाला प्रकल्पातून खर्च करण्यात आली आहे. या नव्या धक्क्यामुळे जहाजांना भाऊचा धक्का, एलीफंटा, मांडवा, करंजा यादरम्यान वाहतूक करता येणार आहे.

याआधी फक्त सामानाच्या वाहतुकीसाठी सागरी मार्गाचा वापर होत होता. जगभर समुद्राच्या काठावर वसलेली शहरे पाण्यात प्रवासी वाहतूक करत असताना मुंबईत हे केव्हा होईल याची वाट लोक पाहत होते, पण त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे असेच म्हणावे लागेल.

१. बेलापूर, नवी मुंबई आणि डिसीटी(डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल), माझगाव
२. बेलापूर,नवी मुंबई आणि एलिफंटा, घारापुरी बेट
३. बेलापूर, नवी मुंबई आणि जेएनपीटी

यासाठी एका प्रवासाला ८०० ते १२०० रुपये खर्च लागू शकतो. मात्र अर्ध्या तासात हा प्रवास पूर्ण करता येणार आहे. तसेच स्पीडबोट्ससाठी मासिक पासही १२,१०० दराने उपलब्ध असेल.

या वॉटर टॅक्सीचे दर काय असतील?
१. डिसीटी ते बेलापूर १२१० रुपये द्यावे लागतील. परत येण्यासाठीही हाच दर असेल.
२. डिसीटीपासून अलिबागच्या धरमतरसाठी २००० रुपये मोजावे लागतील, तासाभरात हा प्रवास पूर्ण होऊ शकेल.
३. डिसीटी ते जेएनपीटी हे अंतर २०० रुपयांत २० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
४. डिसीटी ते कारंजा हे अंतर १२०० रुपये मोजून पाऊणतासात पूर्ण करता येणार आहे.
५. डिसीटी ते अलिबागचे कान्होजी आंग्रे बेट हा प्रवास तासाभरात १५०० रुपयात पूर्ण होणार आहे.
६. जेएनपीटीपासून बेलापूरचा प्रवास ८०० रुपयांत २५ मिनिटांत होणार आहे.
७. आता डिसीटी->जेएनपीटी->एलिफंटा-> डिसीटी या प्रवासाला ८०० रुपये लागतील. तर बेलापूर -> जेएनपीटी- >एलिफंटा-> बेलापूरसाठी ८०० रुपये लागतील. हा प्रवास अर्ध्या तासातच पूर्ण होईल.

यासाठी एकूण ८ बोट तयार करण्यात आल्या आहेत. एका स्पीडबोटमध्ये १०-३० लोक एकावेळी बसू शकतात. तसेच गलबत ६५ लोक सांभाळू शकते. बेलापूर धक्क्यात ७५ कार आणि ८५ मोटरसायकलींची पार्किंगची सोय करण्यात आली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या काळात ही सेवा उपलब्ध असणार आहे.

यासाठी लोकांना काही नियम पाळावे लागणार आहेत. बोट निघण्याच्या अर्ध्या तास आधी उपस्थित राहावे लागेल. तसेच १० मिनिटे आधी गेट बंद होईल. सोबत आयडेंटिटी प्रूफ लागेल. प्रवासी लाईफ जॅकेट घालूनच प्रवास करतील. १० किलोपेक्षा जास्त वजन सोबत असलेले चालणार नाही.

तर या वॉटर टॅक्सीमध्ये प्रवास करण्यासाठी उत्सुक असाल तर लवकर एक फेरी मारून या...

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required