हे फुल इतर सजीवांना खाते!! कुठं सापडतं हे झाड आणि याचं वैशिष्ट्य काय आहे?
निसर्ग भन्नाट आहे, अफलातून आहे, जितका अनुभवावा, तितका नवनवा अनुभव देणारा तर आहेच आहे. अशा गुंतागुतीच्या आणि तितक्याच मनोहारी निसर्गात असणाऱ्या अनेक गोष्टींचे कुतूहल प्रत्येकालाच असते. निसर्गप्रेमी, शास्त्रज्ञ नवनवीन शोध सर्वांसमोर आणत असतात. शास्त्रज्ञांनी अलीकडेच उत्तर अमेरिकन पाणथळ प्रदेशात एक मांसाहारी फुल शोधले आहे. इतर सजीव जीवांना खाणारे हे फुल "फॉल्स अस्फोडेल"( False asphodel) म्हणून ओळखले जाते. या फुलाचे शास्त्रीय नाव आहे "ट्रायन्था ऑसीडेंटलिस" (Triantha occidentalis)!! आज याच वनस्पतीबद्दल आपण जाणून घेऊयात.
या फुलांचा रंग पांढराशुभ्र असतो. ही फुलं येतात हिरव्या देठावर, आणि त्यांवर एक विशिष्ट चमकही असते. ही वनस्पती संपूर्ण उत्तर अमेरिकेत आढळते. कॅलिफोर्नियाच्या उबदार समुद्रकिनाऱ्यांपासून अलास्काच्या बर्फाच्छादित पर्वतांपर्यंत या वनस्पतीचा वावर आढळतो. आतापर्यंत शास्त्रज्ञांना कल्पना नव्हती की हे फूल इतर जीवांना खाते. हे बारीक किटकांना त्याचे भक्ष्य बनवते आणि त्यांच्यातील पोषक घटकांमुळे जिवंत राहते. शास्त्रज्ञांच्या मते कदाचित या मांसाहारी गुणधर्मामुळेच अशा तीव्र हवामानाच्या परिस्थितीमध्ये या वनस्पतीचे अस्तित्व टिकून राहिले आहे.
हे मांसाहारी फूल वनस्पतिशास्त्रज्ञ कियान्शी लिन (Qianshi Lin)यांना सापडले. त्यांना एकदा त्यांच्या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या वर्गमित्राने या फुलाचे चिकट देठ दाखवले होते ज्यात कीटक अडकून बसत. हे पाहून लिन यांचे कुतूहल वाढले, त्यांनी या कीटकांचे पुढे काय होते याचा अभ्यास करायचा ठरवले.
यात गंमत अशी आहे की या वनस्पतीचा शोध वनस्पतिशास्त्रज्ञांनी १०० वर्षांपूर्वीच लावला आहे, पण ही वनस्पती इतकी वर्षे वेगवेगळ्या हवामानात कशी जगते याचा शोध लावायचा होता. हे काम कियान्शी लिन यांनी केले. लिनच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की "फॉल्स एस्फोडेल" लहान कीटकांना वेगळे करते आणि पचवते. त्यामुळेच या वनस्पतीच्या पानांमध्ये निट्रोजेन ए हा पोषक घटक आढळून येतो.
फॉल्स अस्फोडेल कीटकांना अडकवण्यासाठी चिकट केसांचा वापर करतात. त्यात हे कीटक अडकतात आणि नंतर हे कीटक पचण्यासाठी विशिष्ट एंझाइम सोडले जातात, ज्यामुळे त्यातली पोषण द्रव्ये वनस्पतीला मिळतात. अस्फोडल्सचा हंगाम अतिशय कमी अवधीचा असतो. बर्फ कमी झाल्यावर ती साधारणपणे मे महिन्यात फुलतात, त्यानंतर जून आणि जुलैमध्ये फुलांचा हंगाम असतो. नंतर शरद ऋतूच्या सुरूवातीस ही अस्फोडेल फुले कोमेजतात आणि त्यांचा हंगाम संपतो.
सहसा मांसाहारी वनस्पती या एकदम उष्ण आणि कमी पोषक वातावरणात आढळतात. मांसाहारी वनस्पतीची रचना त्यासाठी खूप ऊर्जा निर्माण करणारी असावी लागते. एस्फोडेल ही वनस्पती पहिल्यापासून मांसाहारी नाही, कारण १५० मांसाहारी प्रजातींमध्ये या वनस्पतीचे नाव नाही. कदाचित कालांतराने ही मांसाहारी बनली असावी. फुल असलेल्या ०.२ टक्के वनस्पती मांसाहारी असतात असे लिन यांचे म्हणणे आहे. त्यामुळे फॉल्स अस्फोडेल ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे.
नुकताच, म्हणजे ९ ऑगस्ट रोजी प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की या वनस्पतीच्या आहारात माशी आणि लहान मुंग्यांचा समावेश असतो. पुढच्या संशोधनात अजून काय आढळते याचाही लवकरच उलगडा होईल. सध्या तरी असे दिसते की पर्यावरणातील बदलांसारखे वनस्पतीही स्वतःची रचना बदलू शकतात.
शीतल दरंदळे




