computer

खासकरून अमेरिकन अधिकाऱ्यांना होणारा हा नवा हवाना सिंड्रोम आहे तरी काय?

जगभर कोरोना आणि त्याचे विविध व्हेरिएंट गेली २ वर्ष धुमाकूळ घालत आहेत. कोरोनामधून जग जेमतेम सावरत असताना आता एका नव्या आजाराने लोकांना टेन्शन देण्यास सुरुवात केली आहे. हवाना सिंड्रोम हे नाव गेले दोन दिवस तुमच्या समोरून जात असेल. हाच तो आजार, ज्याने जगाला ताप दिला आहे.

नुकतेच भारत दौऱ्यावर अमेरिकन गुप्त एजन्सी सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स आले होते. त्यांच्यासोबत आलेल्या अधिकाऱ्यांतला एकजण आजारी पडला. अनेक मोठ्या बातमीदार संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या मनुष्याची लक्षणं हवाना सिंड्रोमसोबत जुळत आहेत. मागच्या महिन्यात याच हवाना सिंड्रोमच्या भीतीने अमेरिकन उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांचा व्हिएतनाम दौरा पुढे ढकलण्यात आला होता.

या हवाना सिंड्रोमचे मूळ पाच वर्षांमागे सापडेल. कॅरेबियन बेटांत क्युबा हा ही एक देश आहे. त्याची राजधानी हवाना. पाच वर्षांपूर्वी या हवानामध्ये अमेरिकन दूतावासातले अधिकारी एकेक करून आजारी पडायला लागले होते. आजारी पडलेल्यांनी सांगितले की त्यांना आपल्या खोलीत वेगवेगळे आवाज ऐकू येतात आणि शरीरात विचित्र संवेदना होतात. या विचित्र आजाराला तेव्हापासून हवाना सिंड्रोम म्हटले जाते.

हा आजार सुरुवातीला CIA एजन्ट्सना होत असल्याने ही गोष्ट गुप्त होती. पण नंतर यात इतरही अधिकारी ओढले जाऊ लागले. आजवर जवळपास २०० अमेरिकन अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना या हवाना सिंड्रोमने गाठले आहे. जसजसे अधिकाधिक लोकांना याचा तडाखा बसला, तसतशी याची भीती वाढत गेली.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार आता प्रत्येक खंडात या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. क्युबानंतर चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, तैवान या देशांत आणि वाशिंग्टन डी.सी. शहरातही याचे रुग्ण सापडले आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्ना येथेही हवाना सिंड्रोमच्या काही केसेस सापडल्या आहेत. तर भारतात आढळलेला हा पहिला रुग्ण आहे.

नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सनुसार या रोगाची काही लक्षणं अचानक दिसून येतात, तर काही दीर्घकाळ राहतात. यात जोरजोरात आवाज ऐकू येणे, क्लिकक्लिक किंवा पाय घासण्याचा आवाज ऐकू येणे अशा गोष्टी घडतात किंवा कानात शिट्या ऐकू येतात. काहींना विशिष्ट जागा किंवा दिशा यांच्याशी अडचण निर्माण होते. चक्कर येणे किंवा शरीराचा बॅलन्स न राहणे, गोष्टी लक्षात न राहणे, डोक्यात कंपने होणे, घाबरून जाणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यात डिप्रेशन, डोकेदुखी, गोष्टी लक्षात न राहणे, झोप न लागणे ही दीर्घकाळ राहणारी लक्षणे आहेत.

आता या आजारामागे काय कारण आहे यावर मात्र एकमत जगात कुठेही नाही. काही वैज्ञानिक सांगतात की हे डायरेक्टेड पल्स रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जीमुळे हा सिंड्रोम होतो, तर सीआयएने आरोप केला आहे की हे मानवनिर्मित असून यामागे रशिया असू शकते. कारण यामुळे अमेरिकन अधिकारी त्रासात आहेत. इलेक्ट्रॉनिक हत्यारांनी केलेल्या हल्ल्याचा हा प्रकार असल्याचा त्यांना संशय आहे.

भारतात आलेल्या अमेरिकन अधिकाऱ्याला या आजाराची लक्षणे दिसल्याने भारतही सावध झालेला आहे. भविष्यात यातून काय निष्पन्न होते याकडे जगाचे लक्ष आहे.

-उदय पाटिल

सबस्क्राईब करा

* indicates required