विमानाच्या पंखांवरून चालणारे-कसरती करणारे जिगरबाज म्हणजे विंग वॉकर्स -करणार का हे धाडस ?
चालत्या बसवर किंवा ट्रेनवर फायटिंग करणे, नाचणे, झोपणे….या सारख्या गोष्टी सिनेमात भरपूरवेळा दिसल्या आहेत. छैयाँ छैयाँ गाणं किंवा नायक सिनेमातला बेस्टच्या बसवर घडणारा फायटिंग सीन तुम्हाला आठवला असेलच. पण या सिनेमातल्या गोष्टी झाल्या. हे असे जीवघेणे स्टंट करायचे झाले तर आज मोठी यंत्रणा राबवावी लागेल, सर्व सुरक्षा व्यवस्थांचा विचार करून आणि विशेषज्ञांच्या निगराणीतच ते चित्रित करण्यात येईल. पण एक काळ असा होता जेव्हा कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय काही जिगरबाज चक्क विमानावरून चालत.
खोटं वाटत असेल तर हा फोटो पाहा.
याला इंग्रजीत म्हणतात विंग वॉकिंग (wing walking). म्हणजे कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय उडत्या विमानाच्या एका पंखावरून दुसऱ्या पंखावर चालणे. हा स्टंट आज सिनेमातही दाखवायचा झाला तर त्याची बातमी होईल, पण १९२० साली हा प्रकार कोणत्याही पूर्व तयारीशिवाय होत होता.
थोडा इतिहास खणला तर दिसून येईल की असा साहसी प्रयोग सर्वात आधी १९११ साली सम्युएल फ्रँकलीन कोडी याने केला होता. पण त्याने हे स्टंट म्हणून केले नव्हते. त्याला स्टंट रुपात करण्याची सुरुवात १९२० साली २६ वर्षांच्या अमेरिकेच्या ऑर्मर लॉकलेअर याने केली. हा गडी विमानावरून चढून उडत्या विमानाची दुरुस्ती करायचा. या प्रकारचे स्टंट लोकांसमोर करण्याचे धाडस करणारा तो पहिला होता. दुर्दैवाने याच स्टंटमुळे त्याचा मृत्यू झाला.
पुढे वाचण्यापूर्वी हा जीवघेणा खेळ काय होता ते समजून घ्या.
१९२० साली या स्टंटची सुरुवात झाली तेव्हा याचा मुख्य उद्देश लोकांना विमानाचा तोल आणि स्थिरता दाखवणे हा होता. पुढे जाऊन जेव्हा याला लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि विमानाच्या पंखावर उभे राहणे म्हणजे स्टंट झाला तेव्हा या खेळात जीवघेणे बदल होत गेले. हातावर उभे राहणे, दाताने संपूर्ण शरीराचा तोल सांभाळणे, एका विमानातून दुसऱ्या विमानावर जाणे, असे प्रकार त्यात आले. विंग वॉकिंग खेळाचा एक अलिखित नियम म्हणजे हातात असलेलं तोवर सोडू नका जोवर धरण्यासाठी त्याहून मजबूत काही मिळत नाही.
विंगवॉकिंग म्हणजे एकप्रकारे मृत्युचाच खेळ होता. लोकांना हा जीवघेणा खेळ बघायला आवडत असे. एका विंगवॉकरने तर हे कबूल केले होते की लोकांच्या याच इच्छेवर आम्ही पैसे कमावतो.
सुरुवातीच्या काळात स्टंट करणारे कोणतीही सुरक्षा साधने वापरत नसत. १९२० ते १९४० पर्यंतचा काळ विंगवॉकिंगचा सुवर्णकाळ समजला जातो. या काळात विंगवॉकिंगला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याकाळातल्या हॉलीवूडच्या सिनेमांवरही याचा प्रभाव पडला. काहीही झालं तरी हा जीवघेणा खेळ होता. या खेळात ८ लोकांनी आपले जीव गमावले. वरतीच सांगितल्याप्रमाणे या खेळाची सुरुवात करणारा ऑर्मर लॉकलेअरही याचा बळी ठरला.
१९३८ सालापासून विंगवॉकिंगचा सुवर्णकाळ संपला असे म्हणता येईल, कारण सरकारने विंगवॉकिंगच्या दरम्यान पॅराशूट घालणे बंधनकारक केले. या नियमांवर अंमल करत हा खेळ सुरु राहिला. पण १९४० साली तो कायमचा बंद पडला. आज ती लोकप्रियता नसली तरी काही लोक विंगवॉकिंगचे प्रयोग करताना दिसतात.
तर वाचकहो, कोणी जीव धोक्यात घालतं तर कोणी ते पाहण्यासाठी त्यावर पैसा लावतं. विंगवॉकिंगचा हा जीवघेणा खेळ आजही मृत्यूच्या जवळ जाऊन खेळल्या जाणाऱ्या खेळत अव्वल स्थानी आहे.
--सिद्धार्थ




