computer

१९०१ चा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार देऊन नोबेल समितीने या थोर संशोधकाचा गौरव केला. पण या पुरस्कारापलीकडे पाहता, मानवजातीवर त्याचे अनंत उपकार आहेत.

घटसर्प... नुसतं नाव जरी काढलं तरी भल्याभल्यांना धडकी भरायची. कोरायनीबॅक्टेरिअम डिफथेरी (Corynebacterium diphtheriae) नावाच्या जीवाणूमुळे होणाऱ्या या रोगाची दहशतच तशी होती. याचा मृत्युदर होता ४० टक्के. जगभरात होणाऱ्या बालमृत्यूंमध्ये घटसर्प हे महत्त्वाचं कारण होतं. अमेरिकेत १९२१ मध्ये २,०६,००० एवढी रुग्णसंख्या एकट्या घटसर्पची होती. तर मरण पावलेल्या रुग्णांची संख्या होती १५,५२०!! १९३० मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये तर अमेरिकेपेक्षा गंभीर परिस्थिती होती.

संशोधक घटसर्पावर लस शोधण्याचे प्रयत्न करत होते. पण त्याला म्हणावं तेवढं यश येत नव्हतं. तसं याआधी एक हिंट मिळाली होती. ती म्हणजे १८९० मध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेला एक लेख. त्यात "अमिल व्हॉन बेअरिंग (Emil von Behring) नावाच्या जर्मन डॉक्टरने नैसर्गिक प्रतिकारक्षमता असलेल्या उंदरांच्या रक्तात घटसर्पाच्या विषाणूंविरुद्ध लढण्याची क्षमता असते असं संशोधन केलं आहे'' या आशयाचा लेख छापून आला होता. फक्त या रिपोर्टरने यात एक तांत्रिक चूक केली होती, ती म्हणजे घटसर्प विषाणू नाही तर जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. पण तरी या बातमीने निदान काही दिवसांनी हातास काहीतरी लागेल हा लोकांना दिलासा मिळाला. प्रयत्नांना एक दिशा मिळाली. अर्थात हे निष्कर्ष १००% खरे नव्हते. कारण अशा उंदरांचं रक्त माणसाला देणं तितकंच धोकादायक होतं.

पण अमिलचे प्रयत्न सुरू होते. अमिल हा तसा पहिल्यापासून हुशारच विद्यार्थी होता. मूळ धर्माच्या अभ्यासाकडे कल असलेल्या अमिलने नंतर एका मित्राच्या प्रभावाखाली येत वैद्यकी पेशा निवडला. या मित्राने त्याला बर्लिन युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकलला प्रवेश मिळावा यासाठी खूप मदत केली. तो स्वतः लष्करात डॉक्टर होता. पुढे डिग्री मिळाल्यावर अमिलनेही लष्करात काम केलं. बॉन युनिव्हर्सिटीच्या फार्मकोलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये कॅप्टन म्हणून काम केल्यानंतर पुढे त्याला हायजीन इन्स्टिट्यूट ऑफ बर्लिन येथे रॉबर्ट कॉह (Robert Koch) याचा सहायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. रॉबर्ट कॉह हा बॅक्टरिओलॉजी या शास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक म्हणून मानला जातो.

याच कालावधीत अमिल व्हॉन बेअरिंगची डिफथेरिया आणि टिटॅनस सीरम थेरपीवरची काही प्रकाशने प्रसिद्ध झाली. सीरम म्हणजे रक्तातला द्रवरूप भाग. सीरम थेरपीमध्ये जनावरांच्या रक्तातून हा भाग वेगळा काढून तो लोकांच्या शरीरात सोडतात. १८९० च्या सुरुवातीला अमिलने अशा प्रकारचं रोगनिवारण करेल असं सीरम बनवण्यासाठी प्रयोग सुरू केले. त्याच्या जोडीला एरिश डर्नीके (Erich Wernicke) हा त्याचा युनिव्हर्सिटीमधला मित्रही होता. त्यांनी १८९० मध्ये घटसर्पावरचं प्रभावी सीरम विकसित केलं. त्यासाठी त्यांनी घटसर्प व्हायला कारणीभूत ठरणारे पण प्रभाव कमी झालेले जिवाणू उंदीर, गिनीपिग आणि सशांच्या शरीरात सोडले. मग या प्राण्यांच्या रक्तातून सीरम वेगळा करून तो यापूर्वी रोग होऊन गेलेल्या प्राण्यांच्या शरीरात टोचला. या प्राण्यांचा आजारही सीरममुळे बरा झाला, असं दिसलं.

म्हणजेच रोगास कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंचं कमी प्रभावी स्वरूप एखाद्या प्राण्याच्या शरीरात सोडून नंतर त्या प्राण्याच्या सीरमपासून भविष्यात त्या रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होते हे सिद्ध झालं होतं. तरीही हा रोग म्हणावा तितका आटोक्यात येईना. याचं कारण होतं, अमिलने विकसित केलेल्या थेरपीत वापरलेली अँटीटॉक्सिन्स पुरेशी तीव्र नव्हती. पॉल एरलिख (Paul Ehrlich) या शास्त्रज्ञाने ही अँटीटॉक्सिन्स किती प्रमाणात घ्यावीत याचं सूत्र तयार केलं. हा फॉर्म्युला यशस्वी ठरला. अमिलने मग एरलिखलाच हाताशी धरलं. दोघांनी मिळून बर्लिनमध्ये एक प्रयोगशाळा सुरू केली. इथे ते सुरुवातीला मेंढ्या आणि नंतर घोडे अशा आकाराने मोठ्या प्राण्यांपासून जास्त प्रमाणात सीरम मिळवू लागले.

१८९२ मध्ये अमिल व होsक्स्ट (Hoechst) नावाची फ्रँकफर्ट इथली एक केमिकल/फार्मा कंपनी यांनी डिफथेरिया अँटीटॉक्सिन्समधली रोगनिवारक क्षमता ओळखून एकत्र काम करायला सुरुवात केली. १८९४ पासून या कंपनीत सीरमचं उत्पादन आणि विपणन (मार्केटिंग) सुरू झालं. या पद्धतीला पॅसिव्ह इम्युनायझेशन म्हणतात, कारण यात आधीच निर्माण केलेली अँटीटॉक्सिन्स म्हणजेच अँटीबॉडीज माणसांच्या शरीरात सोडल्या जातात. मात्र ही अँटीटॉक्सिन्स कमी काळासाठी प्रभावी आहेत असं लक्षात आलं. म्हणून १९०१ मध्ये अमिलने ऍक्टिव्ह इम्युनायझेशन पद्धत वापरून पाहायचं ठरवलं. कमी घातक असा घटसर्प जीवाणू थेट शरीरात सोडून शरीराला अँटीबॉडीज तयार करायला लावल्या तर अशा अँटीबॉडीज दीर्घकाळ काम करतील असा त्याचा अंदाज होता. तो बरोबर ठरला.

तरी ऍक्टिव्ह व्हॅक्सिन निर्माण व्हायला काही वर्षं जावी लागली. १९१३ मध्ये अमिलने टॉक्सिन-अँटीटॉक्सिन हा नवा फॉर्म्युला विकसित केला. यात डिफथेरिया टॉक्सिन आणि त्यावर उतारा असलेलं सीरम अँटीटॉक्सिन या दोन्हींचं मिश्रण वापरलं होतं. अनेक ठिकाणी त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात आल्या आणि ते सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं सिद्ध झालं.

१९०१ चा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार देऊन नोबेल समितीने या थोर संशोधकाचा गौरव केला. पण या पुरस्कारापलीकडे पाहता, मानवजातीवर त्याचे अनंत उपकार आहेत.

-स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required