या करत आहेत कॉंक्रीटच्या जंगलात पारंपारिक शेती !!
या जगात सगळं काही शक्य आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणारे खूपच थोडे लोक असतात. अशाच एका व्यक्तीची आज आपण ओळख करून घेऊया !!
या आहेत ‘सुजाता नाफडे’. यांनी पुण्यातल्या पाषाण पुणे भागातल्या आपल्या ३५०० चौरस फुट जागेचं रुपांतर एका शेतात केलं आहे. या शेतात पिकं घेण्यापर्यंतच त्या थांबल्या नसून त्याही पुढे जात त्यांनी ‘ऑरगॅनीक शेती’ करण्याला पसंती दिली आहे. या ऑरगॅनीक शेती खत म्हणून त्या चक्क सुकलेला पाला पाचोळा वापरतात.
केमिकल प्रोसेसने तयार भाज्या, फळे, खाद्यान्न शरीरास घातक असल्यामुळे त्यांचा वापर करू नये असं आपण नेहमी ऐकतो, पण सुजाता यांनी प्रत्यक्ष कृतीतून पारंपारिक शेतीचं महत्व दाखवून दिलंय. त्यांच्या १४ जणांच्या कुटुंबात याच शेतातली फळं-भाज्या खाल्ल्या जातात.
ऑरगॅनीक शेती म्हटलं की शेणखत आलंच. पण सुजाता या शेणखताचा देखील वापर करत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं, "पिकांची नैसर्गिकरीत्या वाढ होणे गरजेचं आहे. सुकलेल्या पानांचा खत म्हणून वापर केल्यामुळं आपण निसर्गाचं एक चक्र पूर्ण करतो. यामुळे निसर्ग आणि आपल्यात एक प्रकारे समतोल राखण्यास मदत होते." त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्या ‘मध्यस्थ दर्शन’ चा अभ्यास करत आहेत.
ज्या जागी त्या आज शेती करतात त्या जागी एकेकाळी बांधकामातून निघालेला कचरा जमा केला जायचा. त्यानंतर ती जागा सुजाता यांनी विकत घेतली आणि तिचं रुपांतर शेतीत केलं. त्यांच्या कुटुंबातली मंडळी रोज कमीत कमी १ तास शेतात काम करतात. शिवाय त्यांनी रोजच्या कामासाठी एक माणूस देखील नेमला आहे.
भोपळा, शेंगा, कारली, करंद, कांघारा, अळू, अद्रक, हळद, कापूस, पपई, द्राक्ष, वाल, स्ट्रॉबेरी आणि अशाच अनेक झाडांची लागवड त्यांनी केली आहे. अशा एकूण ३४ प्रकारच्या भाज्या आणि ९ प्रकारची फळे त्या पिकवतात.
सुजाता पूर्वीपासून घराच्या गच्चीवर, अंगणात फळे-भाज्या पिकवण्याचं काम करत आहेत. २००८ पासून त्यांनी नैसर्गिक पद्धतीने झाडांची लागवड करायला सुरुवात केली. फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी ऑरगॅनीक शेती करणाऱ्यांचा गट तयार केला आहे.
राव, पुण्या सारख्या मेट्रो सिटीमध्ये, चारही बाजूंनी इमारतींनी बंदिस्त जागेत नैसर्गिकरीत्या शेती करणे खरंच कौतुकाचं आहे. सुजाता नाफडे यांनी खऱ्या अर्थाने ऑरगॅनीक शेतीचं महत्व आपल्याला दाखवून दिलं आहे.








