computer

भारतीय लष्करात नव्याने दाखल होणाऱ्या 'कल्याणी एम ४'बद्दल ३ महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या !!

अनेकदा आपण वाचतो की भारतीय लष्करातील सैनिकांच्या ट्रकवर हल्ला केला जातो आणि त्यात बरेच सैनिक मारले जातात. तसेच दारुगोळा एक ठिकाणाहुन दुसरीकडे नेताना त्याचा स्फोट होतो. म्हणून सैन्याच्या रक्षणासाठी नवीन वाहनाची गरज होती. ही गरज आता भरून निघणार आहे. भारतीय लष्करात लवकरच एका मजबूत गाडीचं आगमन होणार आहे. हे वाहन एक सरंक्षक चिलखत म्हणून काम केरल. या वाहनाचे नाव कल्याणी एम ४.

चला तर आजच्या लेखातून ‘कल्याणी एम ४’ बद्दल सविस्तर वाचूया.

नुकतंच संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी कल्याणी एम ४ या वाहनाची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर तब्बल १७७.९५ कोटी रुपये इतकी आहे. पुण्यातील भारत फोर्ज यांनी दक्षिण आफ्रिकन कंपनी पॅरामाउंट ग्रुपच्या सहाय्याने या वाहनाची निर्मिती करण्याचं काम हाती घेतलं आहे. हे वाहन बुलेट प्रूफ आहे, तसेच स्फोटापासून बचाव करणारेही आहे. यामुळे उंच भागात असलेल्या सुरुंगासारख्या धोकादायक हल्ल्यांनासुद्धा या गाडीच्या सहाय्याने सहजपणे प्रतिकार करता येऊ शकतो.

कल्याणी एम ४ चे डिझाइन:

भारत फोर्जने वाहनाची डिझाईन सैन्याची गरज लक्षात घेऊन बनवली आहे. हे सर्वात जास्त वेगवान तसेच अधिक सुरक्षित आहे. या वाहनात २.३ टन दारुगोळा आणि ८ सैनिक सहजपणे फिरू शकतात. कल्याणी एम ४ चे वजन सुमारे १६ टन आहे. ४४ डिग्रीपर्यंत ते वळवता येऊ शकते. तसेच ते ९०० मिमी खोल पाण्यात सहज चालू शकते.

कल्याणी एम ४ इंजिन:

या चिलखती वाहनात टर्बोचार्ज्ड ६ सिलिंडर डिझेल इंजिन आहेत. यामार्फत ४६५ हॉर्सपॉवर इतकी उर्जा गाडीला पुरवली जाते. तसेच इंधनाच्या टाकीची क्षमताही खूप जास्त आहे. एकदा टाकी फुल केली की गाडी ८०० किमी चालू शकते. या गाडीत कंपनीने सीव्हीटी स्वयंचलित गिअरबॉक्स दिले आहेत. सोबतच या वाहनाचा वेग तशी १४० किमी एवढा आहे.

कल्याणी एम ४ ची वैशिष्ट्ये:

भारत फोर्जने जवानांना अधिक साठवण आणि आरामदायक बसण्यासाठी कल्याणी एम ४ डिझाइन तयार केले आहे. या वाहनात ५० किलो टीएनटी स्फोट रोखण्याची क्षमता आहे. अगदी हल्ला झाल्यास रॉकेट लाँचर पासूनही संरक्षण केले जाऊ शकते. हे वाहन सर्वात उष्ण आणि सर्वात थंड वातावरणातही चालू शकते.  कमीतकमी २० डिग्री ते ५० डिग्री सेल्सिअस तापमानात धावू शकते. ड्रायव्हरच्या केबिनमध्ये दोन मोठे विंडस्क्रीन आहेत ज्यामुळे आसपासचे चित्र स्पष्ट दिसेल. तसेच त्याच्या रॅम्पवर हुक दिले गेले आहेत जे अडकलेली वाहने बाहेर काढण्यास मदत करतात. यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमही आहे.

लष्करात अश्या प्रकारच्या अत्याधुनिक आणि संरक्षक वाहनांमुळे नक्कीच खूप मदत होईल. भारताच्या संरक्षण विभागात एका नवीन दमदार गाडीचं आगमन झालं आहे यात शंक नाही.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required