चोराला CCTVत चोरी पकडली गेल्याचे कळाले तर तो काय करेल? मुंबई पोलिसांच्या व्हिडिओत पाहा काय होते ते..

Subscribe to Bobhata

चोरी करणाऱ्यांसाठी मोक्याची जागा म्हणजे जिथे जास्त गर्दी असेल अशी जागा. गर्दीत केव्हा हळूच खिशात हात टाकून, पॉकेट, मोबाईलसारखी वस्तू लंपास होते हे आपल्याला पण कळत नाही. मात्र सध्या जागोजागी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरी केल्यावर चोर सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.

सीसीटीव्हीत चोर दिसला की त्याला शोधणे अवघड जात नाही. म्हणून सीसीटीव्ही असेल अशा ठिकाणी चोरही चोरी करायला घाबरतात. पण जर अशाही ठिकाणी चोरी केलीच तर पुढे काय होते हे मुंबई पोलिसांनी पोस्ट केलेला एक व्हिडिओ बघून समजू शकते.

२२ सेकंदांचा हा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी पोस्ट केला आहे. यात  ग्रे जॅकेट घातलेला एक माणूस दिसतो. तो गर्दीमध्ये संधी साधतो आणि एकाच्या खिशातून हळूच पाकिट काढतो. त्याला कोणीही बघितलेले नसते. पण या भावाची नजर अचानक अदृश्य डोळ्यावर पडते. हा अदृश्य डोळा म्हणजे तिथे लावलेला सीसीटीव्ही.

सीसीटीव्हीवर नजर पडताबरोबर पठ्ठ्या तिथेच सीसीटीव्हीला नमस्कार करतो आणि पाकिट परत करतो. परत एकदा तो सीसीटीव्हीला नमस्कार करून आपण संस्कारी चोर असल्याचे दाखवतो. या व्हिडीओत त्याचा रंग उतरलेला चेहरा बघितला तर हसू आवरले जाणार नाही.

मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ शेयर करत व्हिडिओ मजेदार असला तरी परिणाम गंभीर असू शकतात असे कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. या व्हिडिओत दिसणारा चोर जेव्हा हा व्हायरल झालेला व्हिडिओ बघत असेल तेव्हा आपला कसा पोपट झाला हे त्याला आठवत असेल.

सध्या अनेक ठिकाणी आपल्यावर सीसीटीव्हीच्या रूपाने अदृश्य डोळा नजर ठेवून असतो म्हणून कधीही सांभाळून असलेले उत्तम!!!

सबस्क्राईब करा

* indicates required