computer

बघा हिमांशू रॉय यांनी पार पडलेल्या महत्वाच्या कामगिऱ्या

अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केल्याची बातमी काल येऊन धडकली. एक डॅशिंग पोलीस ऑफिसर म्हणून हिमांशू रॉय ओळखले जायचे. त्यांनी यापूर्वी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागात सह पोलीस आयुक्त, सायबर सेलचे प्रमुख,  दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून उत्कृष्ट काम केलं होतं.
आजवरच्या अनेक महत्वाच्या मोहिमांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. एवढचं काय तर, कसाबला फासापर्यंत नेण्याचं काम त्यांनीच केलं होतं. त्यांनी या जगातून अशी अचानक एक्झिट घेतली आहे यावर अजूनही विश्वास बसत नाही.
मंडळी, हिमांशू रॉय यांच्या आजवरच्या कामगिरीकडे बघितल्यानंतर त्यांच्या सारख्या उमद्या पोलीस ऑफिसरच्या जाण्याने किती मोठं नुकसान झालं आहे हे आपल्या लक्षात येईल. आज त्यांच्या आठवणीत पाहूयात त्यांनी पार पाडलेल्या आजवरच्या मोहिमा....

 

८. आझाद मैदान हिंसाचार

२०१२ साली आझाद मैदानात झालेल्या हिंसाचाराचा तपास हिमांशू रॉय यांनी लावला होता. यातील मुख्य आरोपींना पकडण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

७. शक्ती मिल बलात्कार

हिमांशू रॉय यांच्या कारकिर्दीतील ही एक महत्वाची केस होती. शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपींना त्यांनीच फासापर्यंत नेलं होतं.

६.  मीनाक्षी थापा हत्याप्रकरण


२०१२ सालच्या अभिनेत्री मीनाक्षी थापा हिच्या खून प्रकरणाचा तपास रॉय यांच्या हाती सोपवण्यात आला होता. अमित कुमार जयस्वाल आणि प्रीती सुरीन या मीनाक्षीच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम त्यांनीच केलं होतं.

५.  पल्लवी पुरकायस्थ हत्याप्रकरण

पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरण हे किचकट होऊन बसलं होतं. त्याला योग्य रित्या हाताळण्याचं काम हिमांशू रॉय यांनी केलं. त्यांच्या प्रयत्नातूनच मुख्य आरोपी असलेल्या वॉचमन सज्जाद पठानला जेरबंद झाला.

४. लैला खान हत्याप्रकरण

लैला खान या पाकिस्तानी अभिनेत्रीच्या हत्येच्या तपासात हिमांशू रॉय यांनी थेट काश्मीर गाठलं होतं. शेवटी खुनातला मुख्य सूत्रधार असलेला लैला खानचा पती त्यांच्या हाती लागला.

३. आयपीएल स्पॉट फिक्सिंग

आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणातील अनेक मातब्बर मंडळींना उघड्यावर आणण्याचं काम हिमांशू रॉय यांनी केलं होतं. याच केस नंतर श्रीसंत, अजित चंदीला, अंकित चव्हाण यांचे क्रिकेट करियर संपुष्टात आले होते. 

२. जे डे हत्याप्रकरण


छोटा राजन आज जेरबंद आहे ते हिमांशू रॉय यांच्यामुळे. जे डे हत्याप्रकरणासारखी अवघड कामगिरी त्यांनी फत्ते करून दाखवली होती. कोणताही पुरावा नसताना त्यांनी काही धागेदोरे वापरून या केसचा छडा लावला होता. 

१. कसाबची फाशी

कसाब सारख्या दहशतवाद्याला सुरक्षित व गुप्तरीत्या आर्थर रोड जेलमधून येरवडा कारागृहापर्यंत नेण्याचं काम हिमांशू रॉय यांनी करून दाखवलं होतं. याच येरवडा जेल मध्ये कसाबला फाशी देण्यात आली होती. एकप्रकारे कसाबला फाशी पर्यंत पोचवण्याचं काम रॉय यांनी पार पडलं होतं.

मंडळी, महाराष्ट्राच्या मातीतील या धडाकेबाज पोलीस ऑफिसरला बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required