computer

महात्मा गांधींची हत्या टाळता आली असती का ? गांधी हत्ये नंतर उलगडलेल्या काही ऐतिहासिक घटना !!

३० जानेवारी, १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली. आज त्या गोष्टीला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत. ७१ वर्षानंतरही त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याबद्दलचं गूढ कायम आहे. तसं पाहायला गेलं तर या हत्येचं नाट्य तिथेच उघड झालं पण पडद्यामागे यावेळी काय हालचाली होत्या याबद्दल फारसं कोणाला माहित नाही. मध्यंतरी एक नवीन माहिती समोर आली होती की  गांधीजींना ३ नव्हे तर ४ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ही चौथी गोळी कोणाची होती याबद्दल कोणालाही माहिती नाही. गांधी हत्या एकाने केली की अनेकांनी या बद्दल शंका असली तरी ती टाळता आली असती हे त्रिवार सत्य आहे.

१९४७ साली आपण स्वतंत्र झालो, पण त्याचबरोबर भारतीय भूखंडापासून वेगळा करून ‘पाकिस्तान’ या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली होती. यावेळी झालेली फाळणी आणि या फाळणीतून झालेल्या हिंदू मुस्लिमांच्या कत्तली, दंगली, बलात्कार या सगळ्या नरसंहाराला जबाबदार म्हणून महात्मा गांधींकडे बघितलं जात होतं. हा राग निर्वासितांच्या आणि भारतातल्या काही तरुण वर्गाच्या मनात होता.

आज आपण बघणार आहोत जर वेळीच ठोस पावले उचलली असती तर  गांधीहत्या कशा प्रकारे रोखता आली असती.

मदनलाल पाहवा

महात्मा गांधी यांच्यावर पहिला प्राणघातक हल्ला झाला २० जानेवारी १९४८ रोजी. नेहमी प्माणे गांधीजी प्रार्थना सभेत असताना चालू सभेत कोणीतरी बॉम्ब फेकला. हा बॉम्ब सभेच्या ठिकाणच्या समोरच्या भिंतीला लागल्याने ती भिंत कोसळली. स्फोटानंतर काही प्रमाणात लोकांमध्ये पळापळ झाली, पण  फार मोठ्या प्रमाणावर काही जीवित हानी झाली नाही. सभेत स्फोट घडवून माणसांच्या चेंगराचेंगरी दरम्यान गांधीजींची हत्या करण्याचा बेत आखला गेला होता, पण तो प्रयत्न फसला.

(जगदीशचंद्र जैन)

हा बॉंब ज्याने टाकला त्याचं नाव होतं “मदनलाल पाहावा”. मदनलाल हा मूळच्या पाकिस्तान भागातला. फाळणीनंतर आपला जीव वाचवून तो भारतात आला. या दरम्यान त्याने निर्वासितांची जी परिस्थिती बघितली त्यातून त्याच्या मनात राग धुमसत होता. तो ग्वाल्हेरमार्गे मुंबईत आला. मुंबईत त्याला जगदीशचंद्र जैन या हिंदीच्या प्राध्यापकांनी आश्रय दिला होता. जगदीशचंद्र जैन यांच्याकडे त्याने आपली कहाणी मांडली. याच ओघात त्याने आपल्या सूड घेण्याच्या भावनेबद्दल बोलून दाखवलं. जगदीशचंद्रांनी त्याला समजावण्याचा व रोखण्याचा प्रयत्न केला, पण तोवर मदनलाल पाहावा सुडाच्या भावनेने पुरता पेटला होता.

पुढे हाच मदनलाल २० जानेवारी रोजी बॉम्ब टाकून पळत असताना एका स्त्रीने त्याला पाहिलं आणि तो लगेच पकडला गेला. यावेळी पुढच्या हत्येच्या बेतात असलेले नथुराम, आपटे हे त्याचे साथीदार तिथून पळून गेले.

गांधी हत्या होणार असल्याची जबानी

मदनलाल पाहावा पकडला गेल्यानंतर तो पोलिसांसमोर सगळं काही बोलून मोकळा झाला. त्याने आपण गांधीजींच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या ७ जणांपैकी एक आहोत हे पोलिसांना सांगितलं. त्याचे हे साथीदार मरीना हॉटेलमध्ये थांबले असल्याचंदेखील त्याने सांगितलं होतं. पोलिसांनी या हॉटेलवर धाड घालण्याआधी मारेकरी पळून गेले होते.

मदनलालने यावेळी नथुराम गोडसे हे नाव घेतलं नसलं तरी त्याचा उल्लेख ‘अग्रणी’ या वृत्तपत्राचा संपादक म्हणून केला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांना नथुराम गोडसेपर्यंत पोहोचणं सहज सोप्पं होतं.

मुंबईतला तपास

(विष्णू करकरे)

मदनलालच्या जबानीनंतर दिल्लीच्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि ते २१ जानेवारी रोजी मुंबईत पोहोचले. मुंबईत चौकशी करताना त्यांना कटात सामील असलेला करकरे हा मुंबईतच असल्याचं समजलं. त्याचबरोबर  कटात फक्त ७ जण सामील नाहीत, तर ही संख्या त्यापेक्षा जास्त असल्याचं त्यांना समजलं. मुंबईचे पोलीस आयुक्त नगरवाला यांनी या सर्व गुन्हेगारांना पकडण्याचं आश्वासन देऊन २४ जानेवारीला दिल्ली पोलिसांना पुन्हा दिल्लीला रवाना केलं.

आश्वासन देऊनही मुंबई पोलिसांनी करकरे आणि कटात सामील इतर जणांना पकडण्यातच दिरंगाई केली. त्यामुळे हे मारेकरी ३० जानेवारी पर्यंत मोकाट राहिले.

२४ जानेवारी

(नथुराम गोडसे आणि नारायण आपटे)

एकीकडे दिल्ली पोलीस परतीवर असताना मदनलाल पाहावाने ५४ पानी कबुलीजबाब नोंदवला. यात ठळक अक्षरात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांची नावे होती. मदनलालची आधीची जबानी आणि आत्ताच्या जबानीवरून मिळालेले धागेदोरे हाती लागूनही दिल्ली पोलिसांनी चौकशी करताना ढिलाई दाखवली.

मदनलालच्या सुडाबद्दल ज्यांनी पहिल्यांदा ऐकलं ते जगदीशचंद्र जैन यांनी ‘कपूर आयोगासमोर’ दिलेल्या जबानीत सांगितलंय की गांधी हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती आपण जयप्रकाश नारायण, अशोक मेहता तसेच बाळासाहेब खेर, स. का. पाटील यांना दिली होती, पण कोणीही ते मनावर घेतलं नाही.

मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांनी जगदीशचंद्र जैन यांच्याकडून मिळालेली माहिती मोरारजी देसाईंमार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत पोहोचवली. यानंतर ही बातमी खुद्द गांधीजींपर्यंत पोहोचली.

पुण्यातले धागेदोरे

यु. एच. राणा हे पुण्यातल्या गुप्तहेर विभागाचे उपमहानिरीक्षक होते. त्यांची आणि दिल्लीचे तत्कालीन जेष्ठ पोलीस अधिकारी डी. जे. संजीवी यांची २५ जानेवारी रोजी दिल्लीत चर्चा झाली. खरंतर पुण्याच्या पोलीस फायलीतून करकरे आणि आपटे यांची छायाचित्रे त्यावेळी सहज उपलब्ध झाली असती.

आधीच दिल्ली पोलिसांचा कारभार संथ गतीने चालू होता.  त्यात  गुप्तहेर विभागाचे उपमहानिरीक्षक असूनही राणांनी कोणतंही पाउल उचललं नाही. पुण्यातल्या छायाचित्रांच्या प्रती प्रार्थना सभेत तैनात असलेल्या पोलिसांच्या हाती सोपवून गुन्हेगारांना पकडणं सहज शक्य होतं.

नवा कट रचला गेला

(ठाणे स्टेशन परिसर)

मदनलाल पकडला गेल्याने या कटात सामील असलेले नथुराम, गोपाळ गोडसे, आपटे, करकरे, असे चौघे दिल्लीवरून पळून मुंबईत आले आणि ठाण्याच्या रेल्वे स्टेशनवर त्यांनी पुढचा कट आखला. यावेळी नथुरामने एकट्याने हत्या करावी असे ठरले. हत्येसाठी लागणारं रिव्हॉल्वर शोधत हे सगळेजण मुंबईतून निघून ग्वाल्हेरपर्यंत जाऊन पोहोचले. ग्वाल्हेरला रिव्हॉल्वर मिळवल्यानंतर २८ जानेवारी रोजी ते दिल्लीला रवाना झाले.
 

३० जानेवारी, १९४८ चा तो दिवस

आपली हत्या होणार, २० तारखेला झालेला हल्ला हा त्याचीच रंगीत तालीम होती हे गांधीजींना कळून चुकलं होतं. या हत्येबाबत वल्लभभाई पटेलांना समजल्यानंतर त्यांनी प्रार्थना सभेत सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला, पण गांधीजींनी त्याला विरोध केला. आपल्याला कोणतीही सुरक्षा नको म्हणून त्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर सभेला येणाऱ्यांची झडती घेण्याचंही त्यांनी अमान्य केलं.

तरीही गांधीजींना न सांगता स्फोटानंतर प्रार्थना सभेतली पोलिसांची संख्या ५ वरून ३६ करण्यात आली होती. या पोलिसांना साध्या वेशात उभं करण्यात आलं होतं. पण गांधीजींनी झडती न घेण्याबद्दल सांगितल्यामुळे नथुराम रिव्हॉल्वर घेऊन सभेत शिरण्यात यशस्वी झाला.

३० जानेवारी रोजी वल्लभभाई गांधीजींना भेटायला आले. गांधीजींनी जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्यातील मतभेद जाणून पुढे दोघांनी सलोख्याने एकत्र काम करत राहावे असे त्यांना समजावले. त्यावेळी संध्याकाळचे ४ वाजले होते. त्यांची सभा ५ वाजता सुरु होणार होती. गांधीजी हे वेळेचे काटेकोर असूनही ते पटेलांशी चाललेल्या चर्चेमुळे त्यादिवशी ५ मिनिट उशिराने प्रार्थना सभेत पोहोचले.

गांधीजी ठीक ५ वाजून ५ मिनिटांनी सभेत हजर झाले. लोकांच्या प्रणामाचा स्वीकार करत असताना जमावात असलेला नथुराम लगेच समोर आला. त्याने गांधीजींना आधी प्रणाम केला मग सलग ३ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

ही हत्या काही अचानक घडलेली नाही किंवा तो कोणी एका क्षणात उरकलेली नाही. त्यापाठी काही लोकांनी एकत्रितपणे केलेलं नियोजन होतं. हे नियोजन अनेक जागेतून फाटलेलं होतं हे मान्य करावच लागेल. हा कट सहज उधळत आला असता, पण तसे झाले नाही आणि त्याचे फार खोल परिणाम भारताच्या इतिहासावर झाले.

सबस्क्राईब करा

* indicates required