computer

निजामशाहीचा जन्म आणि अहमदनगरचा काय संबंध आहे? २८ मे १४९० साली काय घडलं होतं ??

आज अहमदनगर म्हणजे आपल्या नगर जिल्ह्याचा स्थापना दिन. २८ मे या दिवशी जवळजवळ ५३० वर्षांपूर्वी, म्हणजेच १४९० साली अहमदनगरची स्थापना झाली. त्यावेळी काय घडलं होतं आणि त्यातून अहमदनगर कसं जन्मलं हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल. हा इतिहास फरच रोचक आहे.

तर, अहमदनगरच्या इतिहासाचा शोध घेत गेलो तर आपण थेट सम्राट अशोकाच्या काळात जाऊन पोहोचतो. आपण ज्याला अहमदनगर म्हणतो तो भाग त्याकाळी जुन्नर आणि इतर ठिकाणांना जोडण्यासाठी ओळखला जायचा. अहमदनगरच्या स्थापनेचा विचार केला तर शहराच्या स्थापनेचा इतिहास बहामनी राज्यापासून सुरु होतो. जाफर खान याने बहामनी राज्याची स्थापना केली. पुढे जवळजवळ १५० वर्षांनी या राज्याचे तुकडे होऊन ५ वेगवेगळी राज्ये तयार झाली. यातील एक राज्य होतं निजामशाही.

निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी म्हणजेच अहमद निजामशहा हा निजाम उल-मुल्क मलिक हसन बहरीचा मुलगा होता. बहामनी राज्यात पराक्रम गाजवत त्याने सुभेदार पदापर्यंत मजल मारली. बहामनी राज्य कमकुवत होत गेलं तसं त्याचे तुकडे पडत गेले. अहमद निजामशहाने देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. त्याने आपल्या हातातल्या जुन्नरवर पकड मजबूत करून निजामशाहीची स्थापना केली.

पण.. बहामनी राज्य अजून संपले नव्हते. अहमद निजामशहाचा पाडाव करण्यासाठी बहामनी सुलतानाने वेळोवेळी आक्रमणे केली. शेख मौलीद अरब आणि अजमत अल मुल्क या दोन सरदारांच्या भल्यामोठ्या फौजांना अहमद निजामशहाचा पाडाव करण्यासाठी पाठवण्यात आलं. पण दोन्ही हल्ले अयशस्वी झाले. शेवटच्या प्रयत्नात जहांगीर खानवर कामगिरी सोपवण्यात आली.

हा हल्ला निर्णायक ठरला. अहमद निजामशहाने जहांगीर खानला चतुराईने धूळ चारली. ती तारीख होती २८ मार्च १४९०. पुढे विजयाचं प्रतिक म्हणून सीना नदीच्या किनारी बाग निजाम म्हणजे आजचा अहमदनगरचा किल्ला बांधण्यात आला. राजधानी दौलताबादच्या जवळ असावी म्हणून अहमद निजामने जुन्नर आणि दौलताबादच्या मध्ये एक नवीन शहर वसवलं आणि ते पुढे त्याच्याच नावाने ओळखलं जाऊ लागलं. हे शहर अर्थातच आपलं अहमदनगर. तारीख होती २८ मे १४९०.

(अहमदनगरचा किल्ला. साल १८८५)

तर, हा होता अहमदनगरच्या स्थापनेचा इतिहास. आमच्या सर्व नगरकर वाचकांना त्यांच्या जिल्ह्याच्या स्थापना दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

सबस्क्राईब करा

* indicates required