computer

असा झाला अर्कचित्रांतून व्यंगचित्रांचा जन्म!! व्यंगचित्रं शब्दांखेरीज आणखी काय सांगतात हे कधी निरखून पाह्यलंय?

"चित्र" हे व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून खूप प्रभावी आहे. कोणी जर एखाद्या व्यक्ती, प्रसंग किंवा स्थळाबद्दल खूप तपशीलवार लेखन केलं किंवा भाषण दिलं, तरी जोवर तो माणूस प्रेक्षकांसमोर "चित्र" उभं करत नाही, तोवर ते भाषण किंवा लेखन प्रभावी झालं असं आपण मानत नाही. स्पेनमधल्या माल्त्राव्हिएसो गुहेत आदिमानवांनी लाल खडूने काढलेली जगातली सर्वात जुनी चित्रं सुमारे ६४,००० वर्षे जुनी आहेत. याउलट सर्वात जुनं लिखाण हे ख्रिस्तपूर्व ३,५०० वर्ष म्हणजे आजपासून फक्त ५,५०० वर्षं जुनं आहे आणि त्या लेखनासाठी वापरलेली लिपीसुद्धा चित्रलिपीच (pictograms) आहे!

चित्र आपल्याशी बोलतं. कारण आपल्याला दिसणारी प्रत्येक वस्तू ही आपल्या डोक्यात एक चित्ररूप म्हणूनच ग्रहण होते. म्हणजे त्या वस्तूचा एक सारांश (आकार, रंग वगैरे) आपल्या डोक्यात तयार होतो, ती वस्तू त्या सारांशस्वरूपातच ती आपल्याला लक्षात राहते आणि त्यातले प्रमुख गुणधर्म आपण नकळत टिपून ठेवतो. याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे चंद्रावर दिसणारा ससा. ससा म्हटल्यावर आपल्याला आठवतात ते दोन मोठे कान, आणि किंचित लांबोडका चेहरा! ह्या दोन्हीशी अगदी पुसटशी जरी साधर्म्य असलेली आकृती आपल्याला दिसली तरी आपल्याला ससा आठवतो, आणि म्हणूनच आज जगभरात सगळीकडेच चंद्रावर ससा असण्याची आख्यायिका रूढ आहे. हे सारांशरूप म्हणजेच चित्रकलेतली अर्कचित्रं हा प्रकार खरंतर व्यंगचित्राचा पायाच आहे.

अर्कचित्र ह्या माध्यमाचा वापर पूर्वीच्या चित्रकारांनी मूळ चित्र तयार करण्याआधी त्याची मांडणी, प्रमाण वगैरे ठरवण्यासाठी खूप केला. त्यायोगे मूळ कलाकृतीचा एक ढोबळ आराखडा तयार करता येऊ लागला आणि तोही कमीत कमी वेळात! ह्या अशा अर्कचित्रांना cartoon असं नाव दिलं गेलं. हा 19व्या शतकातला शब्द असला, तरी 15व्या शतकापासून अशी कार्टून्स काढायची पद्धत होती. प्रत्यक्ष मोनालीसा या जगप्रसिद्ध चित्राची पूर्वतयारी म्हणून लिओनार्दोने अशी अनेक कार्टून्स काढलेली मिळाली आहेत. अर्थात आता म्हणजे वृत्तपत्र-मासिकं वगैरे माध्यमांचा प्रसार वाढल्यानंतर कार्टून्सचा अर्थ आणि वापर हा बदलत गेला आहे.

(लिओनार्दो दा विन्ची यांनी काढलेली व्यंगचित्रे)

कमीत कमी वेळात, आणि तरीही मूळ व्यक्तीची सारांशरूपात आठवण जागी करणारी कलाकृती म्हणून कार्टून्सना चांगलीच लोकप्रियता मिळाली. आजच्या बातमीवर आधारित चित्ररूपात भाष्य करणारी चित्र उद्याच्या वृत्तपत्रात द्यायची असेल तर वेळेच्या मर्यादेत बसण्यासाठी कार्टून्सपेक्षा दुसरं कोणतं माध्यम निवडणं शक्यच नव्हतं. मग आधी सांगितल्याप्रमाणे चित्रात दाखवायच्या व्यक्तींची चित्रकाराच्या डोक्यातली सारांशरूपे ती उमटू लागली.  मोठं नाक, मोठं कपाळ, कुरळे केस इत्यादी इत्यादी.. किंबहुना ती सारांशरूपेच ती व्यक्ती म्हणून उभी करण्याचा कलात्मक प्रयत्न होऊ लागला आणि सुरुवात झाली ती caricature अर्थात व्यंगचित्र ह्या चित्र प्रकाराची.

जसजसं हे माध्यम लोकप्रिय होत गेलं, तसतशा त्याकडून अपेक्षाही वाढत गेल्या. म्हणजे चित्राचं केवळ व्यक्तीशी साधर्म्य असावं, ही अपेक्षा दृढ होऊन थेट व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य असावं अशी प्रगत झाली. मग राजकीय व्यक्तींचा खोटारडेपणा दाखवण्यासाठी त्याचं नाक लांबलचक दाखवणे, भ्रष्टपणा दाखवण्यासाठी पोट मोठं दाखवणे, चित्रातल्या व्यक्तीच्या बसण्याच्या, चालण्याच्या थाटावरून त्याचा मुजोरपणा दाखवणे असल्या कसरती हे व्यंगचित्रकार करू लागले आणि हळूहळू ती चित्रातली माणसं प्रत्यक्षातही तशीच भासू लागली. बघणारेही त्या खोटारडेपणाचा, भ्रष्टपणाचा, मुजोरपणाचा मनमुराद आनंद घेऊ लागले. या रोजच्या त्रासदायक चिखलावर मार्मिकपणाचा गालिचा अंथरणे हीच चित्रकाराच्या कसब आणि प्रतिभेची परीक्षा होती. यातूनच "व्यंगचित्र" ह्या शब्दाला पूरक अशा कलाकृती घडू लागल्या. 

केवळ माणसाच्या बाह्यरूपाची नव्हे, तर त्याचे व्यक्तिमत्त्व, परिस्थिती, निर्णय, आणि परिणामांची "कलात्मक टीका" करण्याचं मध्यम म्हणून ह्या कलेला जगभर लोकप्रियता मिळत गेली. व्यंगचित्रकलेबद्दल नेटवर थोडंसं वाचन केल्यास असं वाचायला मिळतं की ही कला युरोपातून आपल्या देशात आली. हल्लीच्या राजकीय व्यंगचित्रकलेबद्दल हे विधान खरं असलं, तरी ही कला हजारो वर्षे नकळतपणे भारतीय कलेचाच भाग राहिली आहे. देशभरातल्या अनेक प्राचीन मंदिरांमध्ये पौराणिक कथा शिल्प स्वरूपात कोरलेल्या आढळतात. त्यात एखादी कथा, पात्र किंवा घटना अधिक परिणामकारक करण्यासाठी मानवी देहांना जोडलेले पाशवी अवयव म्हणजे उदाहरणार्थ राक्षसांच्या डोक्यावर शिंग, त्यांचा क्रूरपणा दर्शवण्यासाठी त्यांना हिंस्र पशूंचे चेहरे दाखवणे, हातात भली मोठी शस्त्रं दाखवणे हे व्यंगचित्र (caricatures) किंवा रंजकचित्रांचंच (animation) उदाहरण आहे.

असं हे वर्षानुवर्षे प्रभावी असलेलं माध्यम, राजकीय, सामाजिक आणि जवळजवळ सर्वच प्रकारच्या रोजच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या विषयातल्या विसंगती, विरोधाभास, उणिवा मार्मिकपणे उलगडून दाखवू लागलं ते त्याला लाभलेल्या तितक्याच प्रभावी कलाकारांमुळे. 

तत्कालीन सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर परखड भाष्य करणारे गंगानेंद्रनाथ टागोर (रबिंद्रनाथांचे पुतणे) ह्यांच्यापासून ही परंपरा कशी उदयास आली आणि आर. के. लक्ष्मण यांनी ती कशी सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग करून ठेवली ह्याचा तपशीलवार आढावा पुढील लेखांमधून घेऊच, तूर्तास ह्या कलेविषयी एवढीच तोंडओळख.

(आर. के. लक्ष्मण यांनी चितारलेलं व्यंगचित्र )

 

लेखक : सुमंत बिवलकर

सबस्क्राईब करा

* indicates required