दुर्गापूजेचा आणि प्लासीच्या लढाईचा काय आहे संबंध ? वाचा दुर्गापूजेचा रंजक इतिहास !!

गणेशोत्सव असावा तर महाराष्ट्रासारखा आणि नवरात्रोत्सव असावा तर पश्चिम बंगालरखा. कालपासून नवरात्राला सुरुवात झाली आहे. भारतात कुठेही होत नसेल एवढ्या धामधुमीत बंगालमध्ये नवरात्र साजरं केलं जातं. पण कधी विचार केलाय का की पश्चिम बंगालमध्येच दुर्गापूजा इतकी प्रसिद्ध का आहे ? या मागचं कारण काय असेल ?

मंडळी, या प्रश्नाचं उत्तर आपल्या भारताच्या इतिहासातील एका निर्णायक लढाईत आहे. चला तर नवरात्रीच्या निमित्ताने हा इतिहास जाणून घेऊया.

स्रोत

मंडळी, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारं एक महत्त्वाचं युद्ध म्हणजे बंगालमधली ‘प्लासीची लढाई’. या लढाईने बंगाल प्रांत संपूर्णपणे इंग्रजांच्या घशात घातला. असं म्हणतात, प्लासीच्या लढाईने भारतावर इंग्रजांचं राज्य यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तो काळ होता १७५७ चा.

तर, या लढाईचा दुर्गापुजेशी संबंध आला तो असा.

नबकृष्ण डेब (स्रोत)

प्लासीच्या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्यावतीने लढलेल्या रॉबर्ट क्लाईव्ह या अधिकाऱ्यानं या विजयाचं श्रेय ‘गॉड’ला दिलं. पण त्यांचे खास (आणि भारताचे ‘गद्दार’) ‘नबकृष्ण डेब’ यांनी एक वेगळाच तर्क काढला. ते म्हणाले नवाबाने प्लासी भागातलं चर्च उध्वस्त केल्याने तुम्ही माझ्या घरी येऊन दुर्गेची पूजा करा व तिचेच या विजयाबद्दल आभार माना. तेव्हा नबकृष्ण यांनी नुकताच  ‘शोभाबाझार राजबाडी’ (राजवाडी) नावाचा बंगला काय, चक्क महालच बांधला होता आणि  या महालात बंगालवर ब्रिटिश हुकूमत आल्याच्या आनंदातून त्यांनी दुर्गापूजेचं भव्य आयोजन केलं होतं. या पूजेला रॉबर्ट क्लाईव्ह यांना बोलावण्यात आलं. पूजा उरकली गेली. रॉबर्ट क्लाईव्ह यांनी देवीचे आभारही मानले. पुढे इंग्रजांशी जवळचा संबंध असल्याने या पूजेला ‘कंपनी पूजा’ हे नाव पडलं.

कंपनी पूजा (स्रोत)

असं म्हणतात की या भव्य दुर्गापूजेच्या आयोजनानंतरच बंगाल मध्ये ‘दुर्गापूजा’ प्रसिद्ध झाली. नबकृष्ण डेब यांनी त्यावेळी घालून दिलेल्या दुर्गापूजेच्या पद्धती पुढे बंगालमधल्या श्रीमंत कुटुंबांमध्ये लोकप्रिय झाल्या. आजही शोभाबझार राजबाडी महालात दरवर्षी दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं.

आजचा शोभाबझार राजबाडी महाल (स्रोत)

मंडळी, ही झाली दंतकथा. खरं तर प्लासीच्या लढाईच्या अगोदरपासून बंगालमध्ये दुर्गापूजा होत आली आहे, मग प्लासीच्या लढाईनंतर असं काय बदललं की दुर्गा पूजेला एवढं महत्व आलं ?

त्याचं झालं असं की, प्लासीच्या लढाईने जमीनदारीला चांगले दिवस आले. या जमीनदारांचा ब्रिटिश हुकुमतीत मोठा वाटा होता. ब्रिटिश सरकार जमीनदारांच्या बाजूने असल्याने जमीनदार गब्बर झाले. त्यांनी आपल्याकडच्या मालमत्तेला शोभेल असं दुर्गा पूजेचं डोळे दिपवणारं आयोजन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या महालांना १० दिवसांसाठी राजवाड्याचं रूप यायचं. या प्रकारे जमीनदार आपल्या मालमत्तेचं आणि सत्तेचं प्रदर्शन भरवायचे.

स्रोत

हे झालं दुसरं कारण. पण आज जे दुर्गापूजेचं अफाट रूप आहे ते यायला आणखी तिसरी घटना कारणीभूत ठरली. १९१० साली ‘सनातन धर्मोत्साहिनी सभा’ने ‘बाघबाझार’ येथे बारोवारी पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेसाठी १२ कुटुंब एकत्र जमले होते.

बारोवारी पुजेची संकल्पना सोप्पी होती. ‘बारो’ म्हणजे १२ आणि ‘वारी’ किंवा 'यारी' म्हणजे मैत्री. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन पूजेचं आयोजन करणे. पूजेसाठी लागणारा सर्व खर्च एकत्रितपणे उचलायचा. म्हणजे आपल्याकडच्या मंडळासारखं राव. जी पूजा एका घरात बंदिस्तपणे व्हायची ती आता सार्वजनिक होऊ लागली.

स्रोत

मंडळी, दुर्गापूजेला धनिकांच्या घरातून सर्वसामान्य जनतेत आणण्यात या घटनेचा सिंहाचा वाटा आहे. ही संकल्पना बंगालमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली. आज बंगालमध्ये जे भव्य ‘पंडाल’ पाहायला मिळतात त्याची पाळेमुळे ‘बाघबाझार’ पूजेत आहेत.

स्रोत

तर मंडळी, दुर्गा पूजेचा आणि भारताच्या इतिहासाचा असा गुंतागुंतीचा संबंध आहे...

 

आणखी वाचा :

बायकांनो, नवरात्रीतले नऊ रंग धार्मिक नाहीत, हा तर होता मार्केटिंग फंडा 

सबस्क्राईब करा

* indicates required