computer

पालघर जिल्ह्यातल्या केळवे-माहिमचा इतिहास!! ११४० ते १८१८ पर्यंत इथं कोणत्या राजांनी राज्य केलं हे ही पाहा..

मुंबईला लागूनच असणाऱ्या आत्ताच्या पालघर व पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात केळवे व माहीम हि ऐतिहासिक गावे वसलेली आहेत. या दोन्ही गावांना खूप मोठा इतिहास आहे. तर आज आपण या लेखातून उत्तर कोकणातल्या या केळवे व माहीमचा संपूर्ण परिसराचा इतिहास नेमका काय आहे व आज तेथे पाहण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊ. चला तर मग आजच्या केळवे - माहीम च्या सफारीला सुरुवात करूया.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीला प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे. हे महत्त्व लाभण्यामागे व्यापार व त्यासाठी असणाऱ्या बंदरांना पूरक अशी भौगोलिक, सामाजिक, राजकीय स्थिती इ. गोष्टी कारणीभूत आहेत. याच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर भडोच, सोपारा, चौल, कल्याण, श्रीस्थानक म्हणजेच आजचे ठाणे इत्यादी महत्त्वाच्या नैसर्गिक बंदरांना व्यापारासाठी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. कारण याच बंदरांमधून अतिशय मोकळ्या व सुरक्षित वातावरणात भारताचा जगाशी व्यापार होत असे. या बंदरांना संरक्षण देण्यासाठी पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच गुजरातमधील खंबातच्या आखातापासून ते केरळ- कन्याकुमारीपर्यंत समुद्रात व समुद्रतीरावर दुर्गांची एक शृंखला राज्यकर्त्यांकडून निर्माण केली गेली. यामागील मुख्य उद्देश असा कि, हा संपूर्ण व्यापार ज्या समुद्रमार्गे होत असे तेथील सर्व लहान-मोठ्या बंदरांना व प्रजेला या दुर्गांच्या माध्यमातून सुरक्षा पुरविणे असा होता.

या ठिकाणचा इतिहास हा मोठा रंजित आहे. इ.स.११४० साली प्रतापबिंब राजाने उत्तर कोकणावर स्वारी केली. प्रथम त्याने दमण प्रांत काबीज केला व पुढे त्याने केळवे - माहीम प्रांतावर स्वारी केली. सुरुवातीस त्याने तारापूर जिंकून घेतले व त्याने माहीम (पूर्वीचे महिकावती) यावर स्वारी केली. त्याकाळी या प्रांतात 'विनाजी घोडेले' नामक राजा राज्य करीत होता. प्रतापबिंबाच्या प्रचंड सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. त्यामुळे प्रतापबिंबाने लगोलग हा प्रदेश जिंकून घेतला. विनाजी घोडेल राज्य करीत असता सर्व देश वैरण व उध्वस्त झाला होता. त्यापूर्वी हा प्रदेश उत्तर कोकणातील शिलाहारांच्या अंमलाखाली होता. परंतु शिलाहार सत्ता डळमळीत झाल्यावर हा प्रदेश वन्य लोकांच्या बदअमलाखाली गेला.

प्रतापबिंबाने दमणपासून थेट वाळकेश्वर (बाणगंगा) मुंबई एवढा प्रदेश काबीज केला व उत्तर कोकणातील शिलाहारांना येथून हुसकावून लावले. या संपूर्ण प्रदेशाचा केळवे - माहीम हा मध्यबिंदू पकडून प्रतापबिंबाने तेथे त्याची राजधानी स्थापन केली. संपूर्ण राज्याच्या झालेल्या दुरावस्थेचा परामर्श घेऊन प्रतापबिंबाने नवीन वसाहत स्थपिली. बिंबांचे हे राज्य पुढे सुमारे १०० वर्षे टिकले. हे राज्य महिकावतीचे राज्य म्हणून ज्ञात आहे.

पुढे १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात हा प्रदेश गुजरातच्या सुलतानांच्या ताब्यात गेला. त्यानंतर इ.स.१५३२ च्या सुमारास हा प्रदेश पोर्तुगीजांच्या अधीन झाला. इ.स. १७३९ साली वसईच्या मोहिमेवर असतांना मराठ्यांनी हा प्रदेश जिंकून घेतला व येथे मराठी अंमल सुरु झाला. इ.स.१८१८ साली इंग्रजी अंमल सुरु होईपर्यंत हा प्रदेश मराठ्यांकडे होता.

आजही आपण केळवे-माहीम या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊ शकतो. परंतु आज ही दोन्ही गावे बऱ्यापैकी लहान गावे आहेत. केळवे गावात तुम्हाला एकूण दोन दुर्ग पाहता येतात. यातील एक दुर्ग हा केळव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर आहे व दुसरा दुर्ग हा समुद्रात असून त्याची एक खासियत आहे. ती खासियत अशी कि समुद्राच्या ओहोटीच्या वेळी आपल्याला या दुर्गापर्यंत चालत जाता येते. हा दुर्ग एका जहाजाच्या आकाराचा आहे. याचबरोबर केळवे गावात प्रसिद्ध असे शितळादेवीचे मंदिर आहे. यानंतर जेव्हा तुम्ही माहीम गावात याल तेव्हा माहीममधील प्रायमरी हेल्थ सेन्टरच्या मागे माहीमचा दुर्ग वसलेला दिसेल. या दुर्गाचं आत्ताचं रुप हे पोर्तुगीज काळातील आहे.

या दुर्गांबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही दुर्गवाटाचा केळवे-माहीम चा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.

सबस्क्राईब करा

* indicates required