computer

जेव्हा केनियासारखा गरीब देश अमेरिकेला १४ गायी देतो....केनियाच्या दानशूरपणाची गोष्ट !!

या वर्षी आपल्याकडे मार्च एप्रिल दरम्यान कोरोनाची महाभयानक दुसरी लाट आली. वाढती रुग्णसंख्या, अपुरे पडणारे बेड्स, ऑक्सिजनची कमतरता अशा अनेक आव्हानांना तोंड देत जमेल तसं आपण सर्वजण धीराने उभे राहिलो. अर्थातच या आपत्तीचा सामना करत असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक देशांनी भारताला मदत देऊ केली. त्यामध्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी अशा पुढारलेल्या देशांबरोबरच केनिया या आफ्रिकेतील देशाचाही समावेश आहे. नुकतीच केनियाने भारताला सदिच्छा मदत म्हणून बारा टन अन्नपदार्थांचा पुरवठा केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. यामध्ये चहा, कॉफी आणि शेंगदाणे यांचा समावेश होता. केनियाचे भारतातील उच्चायुक्त विली बेट्स यांच्यामार्फत केनियाने ही मदत पाठवली. तिचा विनियोग परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कोरोना वॉरियर्ससाठी करण्यात यावा अशी केनियाची भूमिका आहे. मात्र आफ्रिकेतल्या या गरीब देशाने मनापासून देऊ केलेली मदत आपल्याकडे सोशल मीडियावर उपहासाचा विषय ठरली. अनेकांनी केनियाला दरिद्री, भिकारी देश म्हणून हिणवलं. ही मदत स्वीकारणाऱ्या भारतालाही टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. 

पण केनियाने अशा प्रकारे आपल्या कुवतीनुसार (इतरांच्या दृष्टीने अगदीच किरकोळ) मदत करणं हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. मुळात हा आफ्रिकेतला गरीब, अप्रगत देश. जेव्हा अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला झाला तेव्हा केनियाने मदत म्हणून अमेरिकेला १४ गायी दिल्या होत्या. केनियातील मसाई लोकांच्या दृष्टीने गाय हे जणू देवाचं रूप. या लोकांची संपत्ती म्हणजे त्यांच्याकडे असलेलं पशुधन. तिकडे गायीगुरं जास्त असलेली व्यक्ती श्रीमंत गणली जाते. केनियाने गायींच्या रूपाने आपल्या संपत्तीतला काही वाटाच अमेरिकेला देऊ केला. 

खरंतर अमेरिकेपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या केनियाला तिकडे अमेरिकेत काय विध्वंस झाला आहे, याची आधी फारशी कल्पना नव्हती. जेव्हा त्या हल्ल्यानंतर काही दिवसांनी मसाई जमातीतला एक युवक अमेरिकेहून परत आला तेव्हा लोकांना या हल्ल्याबद्दल समजलं. किमेली नायोमा नावाचा हा तरुण अमेरिकेत वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी गेला होता. परत आल्यानंतर त्याने गावातल्या मसाई लोकांना एकत्र बसून या घटनेची सविस्तर हकीकत सांगितली. तोपर्यंत काही मसाई लोकांना रेडिओच्या माध्यमातून याविषयी कळलं होतं. काहींनी टीव्हीवरून या नृशंस घटनेचं हृदय विदीर्ण करणारं चित्रीकरण पाहिलं होतं. (आणि ते पाहून त्यांनी टीव्ही बंद केला होता.) नक्की काय घडलं आणि त्यामुळे किती प्रमाणात नुकसान झालं याची खरी कल्पना फारशी कोणालाच नव्हती. नायोमाकडून मिळालेल्या माहितीने या विध्वंसाची जाणीव झाली. 

हे सगळं ऐकल्यानंतर त्या साध्याभोळ्या लोकांना दुःख तर झालंच, पण नायोमा सहीसलामत सुटला याबद्दल हायसंही वाटलं. मग त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना अत्यंत पवित्र असलेल्या गायी अमेरिकेला मदत म्हणून पाठवण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी ०१ जून २००२ रोजी आपल्या गावात एक खास कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळी जमातीच्या मुखियाने अमेरिकेचे केनियातील राजदूत विल्यम ब्रेनसिक यांच्याकडे १४ गायी १४ गायी सुपूर्द केल्या.

नायोमाच्या म्हणण्यानुसार गाय हा मसाई लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. ते तिला पवित्र मानतात. मसाई लोकांसाठी ती संपत्तीपेक्षाही अधिक आहे. ते तिला नाव देतात, तिच्याशी बोलतात, गायीच्याच मदतीने दैनंदिन कामं पार पाडतात. गायीचं दूध हे त्यांच्यासाठी पूर्णान्न आहे, शिवाय गायीचं रक्त पिण्याचीही त्यांच्यात प्रथा आढळते. मात्र यासाठी गायीला न मारता केवळ तिच्या शरीरातून रक्त काढून घेतलं जातं. काही ठिकाणी दूध आणि रक्त एकत्र मिसळून तेही पितात. 

तर त्यांनी १४ गायी अमेरिकेला भेट दिल्या! पण त्यातून एक नवीन प्रश्न निर्माण झाला. त्या ठेवायच्या कुठे आणि अमेरिकेत पोचवायचा कशा? त्यांना अमेरिकेत न्यायला बराच खर्च येणार होता. या गोंधळात बराच काळ सरला.

आधी काही काळ या डिप्लोमॅट्सनी त्या गायींना झू मध्ये ठेवणं, कत्तलखान्यात पाठवून त्यांच्या हाडं आणि शिंगं यापासून मसाई लोकांचे पारंपरिक दागिने बनवून ते अमेरिकेत न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी विकणं यांसारख्या अन्य काही पर्यायांचा विचार केला. पण यातला कुठलाच विचार कृतीत उतरू शकला नाही. ३ वर्षं सरली. बाहेर कुठे फिरत नसल्याने या गायी हळूहळू मांसल, पुष्ट होऊ लागल्या. आपण प्रेमाने दिलेल्या भेटीची अमेरिकनांना किंमत नाही असं मसाई लोकांनाही वाटायला लागलं. त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं. 

अखेर २००६ मध्ये एका रविवारी अमेरिकन डिप्लोमॅट्सनी या गायींचा वापर करून शैक्षणिक निधी उभारण्याचं ठरवलं आणि मसाईंच्या गावात आनंद पसरला. त्यांनी मसाईंना सांगितलं की या गायी कुठेही जाणार नाहीत, अगदी कत्तलखान्यात पण नाही. त्या इथेच राहतील. त्यांच्या वासरांचा वापर गावातील मुलांच्या शिक्षणखर्चासाठी केला जाईल. इतकंच नाही तर निधीची कमतरता भासू नये म्हणून अमेरिका १४ मुलांसाठी स्कॉलरशिपची तरतूद करेल. अमेरिका या मदतीबद्दल केनियाची ऋणी असल्याचा संदेश थेट डिप्लोमॅट्सकडून मिळाल्यावर गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरून आला.

अशी या छोट्याशा देशाची कथा. पैशाची नसली तरी हृदयाची श्रीमंती असलेल्या. त्याने मदत केली ती किती केली यापेक्षा कोणत्या भावनेने केली हे लक्षात घेणं जास्त महत्त्वाचं. आपल्या संस्कृतीचीपण आपल्याला हीच तर शिकवण आहे. अशा वेळी आपण त्यांनी केलेल्या मदतीप्रति कृतज्ञता बाळगायची की त्यांची खिल्ली उडवायची? तुम्हाला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required