नबाब के कबाब : लखनऊचे प्रसिद्ध टुंडे कबाब आणि त्या मागचा गमतीशीर इतिहास !!!

भाऊ लखनऊ मध्ये काय प्रसिद्ध आहे असं जर कोणी विचारलं तर एका सुरात उत्तर येईल "टुंडे कबाब”...मांसाहारी जेवणाचे कट्टर चाहते आणि खवय्यांना भुरळ घालणारा हा पदार्थ. टुंडे कबाबला गिलौटी कबाब सुद्धा म्हणतात.

लखनऊच्या अकबरी गेट जवळ “टुंडे कबाब” नावाचं एक दुकान आहे. लखनऊ मध्ये येणारा प्रत्येकजण या दुकानाचा पत्ता विचारतो. शंभर पेक्षा जास्त वर्षांपासून हे दुकान इथे आहे आणि यात बनणाऱ्या कबाबचा स्वाद आजही तसाच कायम आहे.


स्रोत

लखनऊ हे नवाबांच शहर असल्याने इथले खाद्यपदार्थ देखील नवाबी आहेत. या गलौटी कबाब कबाबच्या मागची गोष्ट सुद्धा एका नवाबाशी निगडीत आहे. चला तर आज जाणून घेऊया टुंडे कबाब उर्फ गिलौटी कबाबच्या मागची कहाणी काय आहे.


गलौटी कबाबचा गमतीशीर इतिहास !!


नवाब असफ उदौला स्रोत

नवाब म्हटलं की त्यांचे शाही पद्धती आल्या, रोज स्वादिष्ट जेवण आलं, मौजमजा आली, पण राव, या सगळ्यात शरीर साथ देईल असं नाही ना. काय झालं, १७ व्या शतकातील लखनऊचा नवाब ‘असफ उदौला’ याला कबाब फार आवडायचे पण वयोमान आणि आरोग्यामुळे त्याचे दात कमजोर झाले. 

आता दात कमजोर झाले म्हणजे चावता येणार नाही आणि चावता आलं नाही तर कबाब कसे खाणार ? म्हणून असफ उद्दौलाने एक स्पर्धा भरवली. त्यात सांगण्यात आलं की नावाबासाठी असे कबाब बनवण्यात यावेत की ज्यांना चावण्याची गरज पडणार नाही. जो जिंकेल त्याला नवाबाकडून शाही आश्रय दिला जाईल.

स्पर्धेत भाग घेतलेल्यांपैकी एकच जण असा होता जो यात यशस्वी झाला. याचं नाव होतं ‘हाजी मुराद अली’. मुराद अलीने असे काही कबाब तयार केले की ते जिभेवर ठेवता क्षणीच विरघळून जातील आणि त्यांना चावण्याची गरज पडणार नाही.


याला टुंडे कबाब नाव कसं पडलं ?


स्रोत

मंडळी, असं म्हणतात की हाजी मुराद अली ला पतंग उडवायला आवडायचे. एके दिवशी पतंग उडवत असताना छपरावरून पडल्यामुळे त्याचा एका हात मोडला. त्याच्या अपंगत्वामुळे या कबाबचं नाव टुंडे कबाब पडलं.

१९०५ साली, याच मुराद अलीच्या वंशाजांमधील ‘रईस अहमद’ यांनी अकबरी गेट जवळ ‘टुंडे कबाब’चं दुकान सुरु केलं. आणि पाहता पाहता या कबाबची महती संपूर्ण शहरभर व मग देशभर पसरली. पुढे शाही पदार्थांमध्ये याला सामील करून घेण्यात आलं.


स्रोत

लखनऊला कधी जाल तर टुंडे कबाब टेस्ट करायला विसरू नका राव आणि हो आपला अनुभव आमच्या बरोबर नक्की शेअर करा.

 

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required