computer

भारताची सर्वात स्वस्त कार देणाऱ्या मारुती सुझुकी इंडियाच्या जन्म आणि भरभराटीची गोष्ट!!

सरकारी ‘मारुती’ची उड्डाणे! 

गुडगावची ‘ती’ फॅक्टरी केव्हाच बंद पडून तिथं रान माजलं होतं. सुझुकी कंपनीचे मालक ओसामू सुझुकी यांनी पाऊल ठेवलं तेव्हा तिथं माकडांनी उच्छाद मांडला होता. इथं सुरू करणार आहोत कंपनी? सुझुकी हबकलेच. मग सोबत असलेल्या आर. सी. भार्गवांनी त्यांना दिलासा दिला. ‘मारुती हा वानरांचाही देव असल्यामुळं इथं माकडं आहेत. जातील ती...’ 

ही जागा होती मारुती उद्योग लिमिटेडची. पूर्वीच्या ‘मारुती मोटर्स कंपनी’ची आणि आजच्या ‘मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड’ची. या कंपनीनं गुडगावचाच नव्हे, भारतातल्या मोटरवाहन उद्योगाचा चेहरामोहरा बदलला. देशातल्या कार बाजारातला अर्धा हिस्सा एकट्या या कंपनीचा आहे. राजकारण, प्रशासन, अर्थकारण, खासगीकरण अशी अनेक निसरडी वळणं शिताफीनं पार करत; इंजिनचं पाणी जोखणार्‍या चढांचा मान राखत, गरजेनुसार गिअर बदलत ‘मारुती’नं आगेकूच केली. 

संजय गांधींचं मोटारींचं वेड व इंदिरा गांधींचं पुत्रप्रेम या दोन गोष्टींमुळे ‘मारुती’चा जन्म झाला. सरकारी धोरणांनुसार तेव्हा देशात तीनच मोटर कंपन्या होत्या. बुकिंगनंतर गाडी मिळायला दोन ते पाच वर्षे जायची. अन्य स्पर्धक नसल्यानं महागड्या गाड्यांचा दर्जा सुमारच होता. रोल्स रॉईस कंपनीत तीन वर्षे इंटर्नशीप केलेले संजय गांधी यांना सर्वसामान्यांना परवडेल अशी कार तयार करायची होती. त्यानुसार सरकारनं तीन कंपन्यांना ‘पीपल्स कार’तयार करण्याचा परवाना दिला. त्यातली एक होती संजय गांधींची ‘मारुती मोटर्स लिमिटेड’.

(संजय गांधी)

हरियाना सरकारनं या कंपनीला गुडगावमध्ये २९७  एकर जागा दिली. यावरून मोठा गदारोळ झाला. आणीबाणीमुळं हा मुद्दा काही काळ दाबला गेला, मात्र नंतरआलेल्या जनता सरकारनं ‘मारुती मोटर्स’ला टाळं ठोकलं व चौकशी आयोग नेमला. जनता सरकार दोन-तीन वर्षांत कोसळलं व इंदिरा गांधी जानेवारी १९८० मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्या. ‘मारुती मोटर्स’चं टाळं उघडणारच होतं, पण दुर्दैवानं २३ जूनला संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाला. हा आघात पचवणं इंदिरा गांधींना अवघड गेलं. लाडक्या मुलाचं स्वस्त कार तयार करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार मात्र त्यांनी केला. इंदिराबाईच त्या. एका वर्षात कायदा करून सरकारनं ‘मारुती मोटर्स’ ताब्यात घेतली व ‘मारुती उद्योग लिमिटेड’ या नावानं शंभर टक्के सरकारी मालकीची कंपनी अस्तित्वात आली. संजय गांधींची आठवण म्हणून ‘मारुती’ हे नाव कायम राहिलं. 

सरकारी कंपनीकडून कारची निर्मिती करणं हेच मोठं आव्हान होतं. त्यासाठी बाबूलोक उपयोगाचे नव्हते. इंदिरा गांधींनी सर्वोत्तम माणसं हेरली. ‘टेल्को’चे अध्यक्ष सुमंत मूळगावकर ‘मारुती’चे अध्यक्ष झाले. ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड’ला नफ्यात आणणार्‍या व्ही. कृष्णमूर्तींना उपाध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर करण्यात आलं. त्यांच्या सोबत प्रशासकीय अधिकारी डी. एस. गुप्ता व आर. सी. भार्गव यांना घेण्यात आलं. ‘ट्रबल शूटर’ म्हणून अरुण नेहरू व राजीव गांधी होते. डिसेंबर १९८३पर्यंत कार तयार करण्याचं टार्गेट होतं. सरकारी कंपनी कॉर्पोरेट शैलीनं हाताळली गेल्याची ही पहिलीच वेळ.

बाबूलोकांचा विरोध मोडून ‘मारुती’नं देशातल्या मार्केटचा सर्व्हे केला. त्यात लक्षात आलं की इंधन बचत करणार्‍या छोट्या कारला लोकांची जास्त पसंती आहे. मग सुरू झाला भागीदाराचा शोध. युरोपातील बड्या कार कंपन्यांशी वाटाघाटी सुरू झाल्या, पण कुणाशी जमेना. अगदी शेवटचा पर्याय म्हणून ‘मारुती’च्या अधिकार्‍यांनी जपानचा दौरा केला. तिथं सुझुकी मोटर कॉर्पोरेशनशी ‘मारुती’चे सूर जुळले. वाटेत येणारे काटे बाजूला करत दोन्ही कंपन्यांनी वेगानं वाटाघाटी पूर्ण केल्या व २ ऑक्टोबर १९८२ रोजी केंद्र सरकार, ‘मारुती’ व ‘सुझुकी’त करार झाला. ‘ड्राय डे’ असूनही शँपेन फोडून तो साजरा करण्यात आला! 

गुडगावची भलीमोठी जागा कंपनीच्या ताब्यात होती खरी, पण तिथल्या फॅक्टरीची दैनावस्था होती. उत्पादन होणार होतं ती जागा तांत्रिकदृष्ट्या सदोष व धोकादायक होती. मूळ बांधकामाचे आराखडे उपलब्ध नव्हते. अक्षरशः शून्यापासून सुरुवात होती. ऑक्टोबर १९८३पासून कारचं उत्पादन अपेक्षित होतं. ‘सुझुकी’कडून इंजिन व बॉडीचे महत्त्वाचे भाग आयात करून त्याला भारतीय सुट्याभागांची जोड दिली जाणार होती. कुशल-अकुशल कामगारांची भरती करणं, दर्जेदार पुरवठादारांची साखळी तयार करणं, फॅक्टरी, तसेच मार्केटिंग-सेल्ससाठीची यंत्रणा उभी करणं अशी असंख्य कामं अल्पावधीत पूर्ण करण्यात आली. केवळ लायक उमेदवारांनाच घेण्यात आलं. वेळ पाळणं व कामातली शिस्त या दोन गोष्टींना इथं सर्वोच्च महत्त्व आहे हे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या वर्तनातून सर्वांना दिसत होतंच. ‘सुझुकी’नं सुपरवायझर स्तरावरच्या कर्मचार्‍यांना खास प्रशिक्षण दिलं. 

पन्नास हजार रुपयांत मिळणारी कार म्हणून एव्हाना ‘मारुती’चं नाव देशभर झालं होतं. प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊन कारचं आगाऊ बुकिंग घेण्यात आलं, तेव्हा त्यातून १३५ कोटी रुपयांचं भांडवल उभं राहिलं. पूर्वानुभव पाहता गाडी मिळवायला वशिला लावावा लागणार असंच सगळ्यांना वाटत होतं. इथंही कंपनीनं सर्वांना धक्का दिला. ‘मारुती’नं चक्क उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगणकीय लॉटरी काढली. इंडियन एअरलाइन्सच्या एका कर्मचार्‍याला पहिली गाडी मिळाली. ट्रकमधून वाहतूक झालेली नवीकोरी कार ग्राहकाला देण्याची प्रथा ‘मारुती’नं भारतात पहिल्यांदा सुरू केली. 

संजय गांधींच्या वाढदिवशी म्हणजे १४ डिसेंबर १९८३ रोजी इंदिरा गांधींनी मारुती उद्योग लिमिटेडचं उद्घाटन केलं. ‘या छोट्या कारची गोष्ट खूप मोठी आहे,’ असं त्या तेव्हा म्हणाल्या. खरंच होतं ते. कंपनीचा ‘मारुती ८००’ पासून सुरू झालेला प्रवास यशाचं एकेक शिखर गाठत गेला. व्हॅन, ओम्नी, जिप्सी अशा प्रत्येक नव्या मॉडेलबरोबर नवनवे अनुभव मिळत गेले. गुणवत्ता व विश्वासाच्या बळावर एका निमसरकारी कंपनीनं खासगी कंपन्यांना घाम फोडला. ‘बेस्ट कॉर्पोरेट परफॉर्मन्स’बद्दल शाबासकी मिळविली. पहिल्या अकरा वर्षांत कंपनीनं दहा लाख, तर त्यानंतरच्या अकरा वर्षांत चाळीस लाख गाड्यांची विक्री केली.

‘कस्टमर केअर सेंटर’ सुरू करणारी ‘मारुती’ ही देशातली पहिली कार कंपनी. ड्रायव्हिंग स्कूल, ‘प्रीओन्ड’ गाड्यांची विक्री, कार निर्मितीचे तीन कारखाने असा विस्तारही कंपनीनं केला. सुझुकीचा या कंपनीत सुरुवातीला २६ टक्के हिस्सा होता. तो आता ५६.२ टक्के आहे. सन २००७ ला कंपनीचं ‘मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड’ असं नामकरण झालं. आज या कंपनीत भारत सरकारचा थेट हिस्सा नाही. 

राजकीय इच्छाशक्तीला योग्य माणसांची जोड मिळाली तर सरकारी कंपनीही चमत्कार घडवू शकते, हा विश्वास ‘मारुती’नं भारतीयांना दिला. ‘पुनश्च हरिओम’ म्हणताना ‘मारुती’नं देशभर व समुद्रापार केलेलं उड्डाण प्रेरणा देणारं आहे. 

 

-इमेज मीडिया, पुणे
......................... 
संदर्भ 
The Maruti Story: How A Public Sector Company Put India on Wheels-R. C. Bhargava with Seetha
(आर.सी. भार्गव हे मूळचे भारतीय प्रशासनसेवेतील अधिकारी. व्ही. कृष्णमूर्तींसोबत ते मारुती उद्योग लिमिटेडमध्ये रुजू झाले. नंतर अनेक वर्षे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते. आता ते ‘मारुती सुझुकी’चे अध्यक्ष आहेत.)
https://www.marutisuzuki.com/
https://www.globalsuzuki.com/
.............
पुनश्च हरिओम
दर सोमवार व शुक्रवारी वाचा...
https://www.facebook.com/Imedge-Media-248022901989999/

सबस्क्राईब करा

* indicates required