दुचाकीपुराण: 'हमारा बजाज' आणि 'बजाज चेतक'.. आपल्या सर्वांच्या आठवणींचा खजिना!!
सध्या स्कूटर घ्यायचे म्हटले म्हणजे सर्वात आधी पर्याय समोर येतो तो म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरचा. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक अवतारामुळे स्कूटर्सचा बोलबाला वाढत आहे. याही आधी स्कूटर्सला मोठी डिमांड होती. सर्वच कंपन्या यात चढाओढीने उतरत असत. पण आजही ५० वर्षांपूर्वी बाजारात दाखल झालेल्या एका स्कूटरबद्दल लोकांमध्ये प्रचंड प्रेम आहे.
या स्कूटरचे प्रॉडक्शन बंद होऊन जवळपास २० वर्ष होत आली आहेत. तरीही लोकांच्या मनात आजही तिच्यासोबतच्या आठवणींचा खजिना आहे. आम्ही बजाज चेतकबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला लक्षात आले असेलच. चला तर मग, आज याच बजाज चेतकच्या दमदार वाटचालीचा वेध घेऊया...
बजाज ही कंपनी तशी भारतात जुनी आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात विविध प्रयोग करून भारतीय मनात आदराचे स्थान असलेली बजाज स्वदेशी कंपनी म्हणून लोकांच्या आवडीची आहे. बजाजने १९७२ साली एक नवा प्रयोग केला आणि बाजारात बजाज चेतक अवतरली. वेस्पा स्कूटर्स निर्माण करणारी कंपनी पिआजिओकडून रितसर लायसन्स घेऊन वेस्पा स्प्रिंटची भारतीय आवृत्ती म्हणून बजाज चेतक बाजारात आणली गेली.
सुरुवातीला हजार स्कूटर्स बाजारात आणण्यात आल्या. त्यावेळी या स्कूटरची किंमत ही ८ ते १० हजारांत होती. बजाज चेतक लोकांच्या पसंतीस उतरू लागली. कुठल्याही ब्रँडच्या लोकप्रियतेत त्याच्या जाहिरातीचा पण मोठा वाटा असतो. बजाज चेतकच्या बाबतीतही तेच झाले. त्यावेळी टिव्हीवर येणारी जाहिरात 'हमारा बजाज' ही जाहिरात लोकांच्या ओठांवर खेळू लागली आणि घरोघरी बजाज चेतक स्कूटर दिसू लागली.
बजाज चेतक ही स्कूटर नाही तर भावना आहे अशीच लोकांची त्यावेळी धारणा होती. अनेकांच्या आयुष्यात आलेले हे पहिले वाहन होते. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी बजाज चेतक म्हणजे स्वप्न साकार होण्यासारखे होते. या सर्व गोष्टींमुळे बजाज चेतकची लोकप्रियता प्रचंड शिखरावर गेली.
एक वेळ तर अशी आली की, बुक केल्यावर ३ महिन्यांनी बजाज चेतक हाती येऊ लागली. पुढे जाऊन हाच वेटिंग पिरियड २०-२० महिन्यांचा झाला. १९७२ ते १९७७ या अवघ्या ५ वर्षांत तब्बल १ लाख स्कूटर्स विकल्या गेल्या. तत्कालीन लोकसंख्या आणि देशाची आर्थिक परिस्थिती यांचा विचार केला तर ही संख्या किती विशेष आहे हे समजू शकते.
जुन्या बजाज चेतकमध्ये ४ स्पीड गियरबॉक्सचा वापर करण्यात आला होता. आजही लोकांना आठवत असेल की या स्कूटरची गियर शिफ्टिंग सिस्टम हँडलबारवर दिलेली असे. ही स्कूटर त्यावेळी लिटरमागे ९० किमीचे मायलेज देत होती. बजाज कंपनी जागतिक बाजारात यशस्वी ठरली त्यामागे बजाज चेतकचा मोठा वाटा होता. फ्रान्स, आफ्रिका आणि इतरही अनेक युरोपियन मार्केट्समध्ये त्यांनी जागा तयार केली.
बजाज चेतकची विक्री पुढच्या १० वर्षांत ८ लाखांवर पोहोचली होती. ९० च्या दशकात महिन्याला लाखभर इतका खप या स्कूटरचा होता. १९९५ साली एक कोटी विक्रीचा आकडा त्यांनी गाठला. विक्रीचे तुफान विक्रम बजाज चेतक करत होती. मग बाजारात ऍक्टिवा आली. सोबतीला इतरही स्कूटर्स आल्या. यांच्या तडाख्यासमोर मात्र बजाज चेतक टिकू शकली नाही.
दिवसेंदिवस या स्कूटरच्या वाढणाऱ्या किंमतीमुळे इतर स्कूटर्सकडे लोकांचा ओढा वाढत गेला. २००२ साली २७ हजारांत ही स्कूटर विकली जात होती, तर २००५ ला हीच किंमत ३१ हजारांवर पोहोचली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. याचवर्षी कंपनीने रितसर प्रॉडक्शन थांबवत यापुढे बजाज चेतकची निर्मिती केली जाणार नाही असे ठरवले.
मधल्या काळात १९९९ साली इलेक्ट्रिक स्टार्ट सिस्टीम आणत या स्कूटरला आधुनिक रूप देण्याचा पण प्रयत्न करण्यात आला. तसेच २००४ साली सरकारने आणलेल्या नव्या नियमांनुसार या स्कुटरला नवे ४ स्ट्रोक इंजिन देऊन पुन्हा बाजारात आणले. बजाज त्यानंतरही अनेक वर्षे रस्त्यावर दिसत असे. पण त्यानंतर हळूहळू करत ही गाडी दिसेनाशी झाली. आजही कधी हमारा बजाज ही जाहिरात लोकांनी ऐकली किंवा, कुठे बजाज चेतक दिसली तरी लोक आठवणीत रमतात.
२०२० साली बजाज चेतक पुन्हा एकदा इलेक्ट्रिक रुपात बाजारात अवतरली आहे. कधीकाळी इतिहास करणाऱ्या बजाज चेतकने पुन्हा एकदा इतिहास केला आहे. कारण यावेळी बजाज चेतकचे निर्माण पूर्णपणे महिलांनी केले आहे. बजाज कंपनीकडून करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यावेळी कौतुक देखील झाले होते.